आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने नारी न्यायअंतर्गत पाच गॅरंटी देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. यात महालक्ष्मी गॅरंटी, आधी आबादी - पुरा हक, शक्ती का सन्मान, अधिकारी मैत्री व सावित्रीबाई फुले हॉस्टेल या पाच हमींचा समावेश आहे.
महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या योजना महत्त्वाच्या ठरणार आहे. महालक्ष्मी गॅरंटीअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला एका वर्षात एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. 'आधी आबादी व पुरा हक' अंतर्गत केंद्र सरकारच्या नव्या नियुक्तीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण राहणार आहे. 'शक्ती का सन्मान मध्ये अंगणवाडी, आशा व मिड डे मिल कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले वसतिगृह योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये श्रमिक महिलांसाठी वसतिगृहाची उभारण्यात येणार आहे. खर्गे म्हणाले, 'आमच्या गॅरंटीची पूर्तता प्रत्येक सरकारमध्ये होत आहे. भाजपसारखे आम्ही जुमले देत नाही."