'एज्युकेट गल्स' या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सफिना हुसेन यांना मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिष्ठित 'वाईज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील खेड्यांमधील १४ लाख शाळाबाह्य मुलींना पुन्हा मुख्य प्रवाहातील शिक्षणात आणण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
'वर्ल्ड इनोव्हेशन समिट फॉर एज्युकेशन ची (वाईज) ११ वी परिषद दोहा येथे नुकतीच झाली. त्यामध्ये सफिना हुसेन यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. कतारमधील संस्थेतर्फे देण्यात येणारा हा शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे. पाच लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हुसेन म्हणाल्या, " सोळा वर्षापूर्वी जेव्हा 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' हो घोषणाही ऐकली नव्हती, त्यावेळी शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एज्युकेशन गल्स' या सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय मी घेतला. जेथे शेळ्यांना संपत्ती मानली जाते; पण मुलींना लोढणे मानले जाते, अशी गावे एकविसाव्या शतकातही भारतात आहेत. गरिबीपासून पितृसत्ताक पद्धत अशा विविध कारणांमुळे मुलींना शाळेपासून दूर ठेवले जाते किंवा शिक्षण मध्येच थांबविले जाते. घरच्या कठीण परिस्थितीमुळे मला माझे शिक्षण तीन वर्षे थांबवावे लागले, तेव्हा मला याचे महत्त्व कळाले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर मला घरी राहणे भाग पडले होते."
शिक्षण सोडल्यानंतर तीन वर्षांनंतर सफिना यांच्या आयुष्यात एक चळण आले. मावशीच्या मदतीमुळे त्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. सफिना यांना 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये प्रवेश मिळाला. "माझ्यासारख्या शालाबाह्य मुलीसाठी असे प्रयत्न करण्याचा निर्णय मी त्यावेळी घेतला," असे सफिना म्हणाल्या, मुलींच्या शिक्षणाची मोहीम प्रथम राजस्थानमध्ये सुरू केली, तेव्हा कौटुंबिक उदासीनता, प्रेरणेचा अभाव आणि मुलींची स्वतःचीअनिच्छा या प्रमुख अडथळ्यांचा सामना त्यांना करावा लागला होता.
शिक्षण क्षेत्राला महत्त्व
कतारच्या माननीय शेख मोझा बित नासेर यांनी 'बाईज'ची स्थापना २०११ मध्ये केली आहे. शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर वैशिष्टपूर्ण काम करणारी व्यक्ती किंवा समूहाला हा पुरस्कार दिला जातो. यासाठी 'प्रथम' चे सहव्यवस्थापक माधव चव्हाण यांना २०१२ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.