वायनाड दुर्घटनेतील शेकडोंचा जीव वाचवणाऱ्या सबीना

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
ए. सबीना
ए. सबीना

 

भक्ती चाळक
 
वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनात अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिका ए. सबीना यांच्या कामगिरीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ३० जुलैला पहाटेच्या सुमारास केरळमधील वायनाड येथील डोंगराळ भागात भूस्खलन झाले. चालियार नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूची काही गावे उध्वस्त झाली. या दुर्घटनेनंतर देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. दुर्घटनाग्रस्तांसाठी धावून जाणाऱ्यांपैकीच एक होत्या पेशाने नर्स असलेल्या ए. सबीना त्यांनी या संकट काळात दाखवलेल्या धैर्याचे देशभर कौतुक होत आहे.  

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसाच्या बातम्या येत असतानाच सकाळी ११ वाजता निलगिरी येथे राहणाऱ्या सबीना यांना एनजीओ मधून फोन आला आणि ताबडतोब भूस्खलनग्रस्त भागात जावे लागेल असे सांगण्यात आले. वेळ ना दवडता सबीना  वायनाडच्या दिशेने  निघाल्या. तिथे पोहोचताच त्यांनी जे पाहिले ते फारच भयानक होते. भूस्खलनामुळे मुंडक्काई आणि चुरमलाई दरम्यानचा पूल कोसळला होता. यामुळे अनेक लोक नदीच्या मध्यभागी अडकलेले होते.

नदीच्या दुसऱ्या बाजूला लोकांपर्यंत पोहोचणे अवघड होते. परंतु लोक इतके जखमी झाले होते की त्यांना प्राथमिक उपचार न देता त्यांना उचलणे कठीण होते. पाण्याचा प्रवाह वाढतच चालला होता. दुसरीकडे  वाढता गाळ पाहता अडकलेल्या लोकांना तातडीची मदत पोहोचवणे अशक्य वात होते. या निर्वाणीच्या वेळी  सबीना यांनी दाखवलेले धैर्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.

त्यादिवशीचा थरारक प्रसंग सांगताना सबीना म्हणतात, “त्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास मला सांगण्यात आले की राज्य सरकारला वायनाडमध्ये काही परिचारिकांची गरज आहे. मी विध्वंसाची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहिले होते. भूस्खलनग्रस्त भागात अस्तव्यस्त अवस्थेत मृतदेह पडलेले होते. परंतु तिथे असे बरेच लोक ज्यांना त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. मला तिथे जाऊन अधिकाधिक लोकांना मदत करायची होती.”

त्या पुढे सांगतात, “मी तिथे पोहोचले तेव्हा पाण्याच्या जोरदार प्रवाहात काही लोक पलीकडच्या बाजूला अडकलेले दिसले. तेथे पोहोचण्याचे किंवा वैद्यकीय मदत देण्याचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की तिथपर्यंत जाणे कठीण झाले होते. त्याठिकाणी बचाव पथकाने नदी ओलांडण्यासाठी झिप लाइन तयार केली होती. म्हणजे दोरीने नदी ओलांडावी लागणार होती. त्यामुळे नदीच्या दुसऱ्या बाजूला पुरुष परीचारकाने जावे असे NDRF च्या जवानांचे म्हणणे होते.”

त्यांनी ही जोखीम का पत्करली हे सांगताना त्या म्हणतात, “मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदी ओलांडायला कोणी तयार नव्हते. सर्व महिला कर्मचारीही घाबरल्या होत्या. नदी ओलांडण्यास कुणीही तयार नसल्याचे पाहून 'मी त्यांना वाचवायला जाईन' असे मी NDRFच्या अधिकाऱ्यांना सांगितले. झिपलाईनच्या मदतीने मी तिथे गेले. त्यावेळी मी जीवाची पर्वा केली नाही. लोकांचे प्राण वाचवणे हे तेव्हा माझे एकमेव उद्दिष्ट होते.”

“झटपट रेनकोट घालून मी निघाले तेव्हा लष्कराच्या जवानांनी मला नदी पार करताना खाली न पाहण्याचा सल्ला दिला. नदी पार करायला तब्बल दोन मिनिटे लागायची. त्यावेळी मी डोळे बंद करून ईश्वराकडे प्रार्थना करायचे. नदीच्या दुसऱ्या बाजूस पोहोचताच सर्वत्र विध्वंसाचे दृष्य दिसले. आजूबाजूला माणसांचे मृतदेह विखुरलेले होते. काही लोक स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते. अनेकांना साप चावले होते, तर दरड कोसळल्याने अनेक जण जखमी झाले. भूस्खलनातून वाचलेल्यांना प्रथोमपचार देऊन मला  त्यांना तिथून बाहेर काढायचे होते.” सबिना सांगत होत्या.

सबीना यांनी तब्बल पाच दिवसांत या झिप लाइनच्या मदतीने दहाहून अधिकवेळा ही नदी ओलांडली. त्या सकाळी अकरा वाजता नदीच्या मध्यभागी असलेल्या त्या भागात पोहोचायच्या. मग दिवसभर जखमींवर उपचार करायच्या आणि संध्यकाळी तिथून परतायच्या.. पहिल्या दिवशी त्यांनी ३५ जखमींवर उपचार केले. त्यानंतर त्या सर्वांना NDRF च्या टीमने सुखरूप बाहेर काढले. 
 

सबीना यांच्या शौर्याची ही कहाणी तेव्हा समोर आली जेव्हा स्थानिक लोकांनी त्यांच्या झिप लाइन ओलांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आणि बघता बघता ते व्हायरल झाले. देशभरातून सबीना यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक होऊ लागले. सबिना यांच्या साहस आणि शौर्याची तामिळनाडू सरकारने दखल घेतली. नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनी  मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी ए. सबीना यांचा साठी कल्पना चावला पुरस्काराने गौरव केला. 
 
भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter