हायका अवटी : शिवजन्मभूमी जुन्नरची हिरकणी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
हायका अवटी
हायका अवटी

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले गडकिल्ले आजही राजांच्या लढवय्या वृत्तीची साक्ष देत असतात. महाराजांच्या चरित्राची आणि त्यांनी घडविलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्यातून प्रेरणा मिळवण्यासाठी अनेकजण गडकिल्ल्यांची भटकंती करत असतात. याच प्रेरणेतून शिवजन्मभूमी जुन्नरची कन्या हायका अवटी ही तरुणी गडकिल्ल्यांच्या ट्रेकच्या माधम्यातून समाजाला काही संदेश देऊ इच्छित आहे…     

‘हिजाबी ट्रेकर’ नावाने उदयास येत असलेली हायका ट्रेकिंगच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करतेय. समृद्ध इतिहास लाभलेल्या जुन्नर तालुक्यात जन्मलेल्या हायकाला लहानपणापासून गडकिल्ल्यांबद्दल आकर्षण होते. महाराजांच्या धाडसी इतिहासाबद्दल तिला जास्त आपुलकी वाटते. शाळेत असल्यापासूनच हायकाला मैदानी खेळांची आवड निर्माण झाली. शिवइतिहासातून प्रेरणा घेऊनच लहानपणापासूनच धाडसी खेळांकडे वळल्याचे ती सांगते. 

हायकाचा भटकंतीचा प्रवास सुरू झाला तो तिच्या खेळाच्या आवडीमुळेच. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून तायक्वांदो खेळत असलेली हायका ब्लॅक बेल्ट मिळवणारी जुन्नर तालुक्यातील पहिली मुस्लीम महिला ठरली.

हायकाला खेळ खेळण्याची प्रेरणा कशी मिळाली याबाबत बोलताना ती सांगते, “मी शिवजन्मभूमीत जन्मले असल्याने लहानपणापासून माझ्या अंगी साहसी वृत्ती आहे. मला भाऊ नसल्याने माझ्यावर स्वतःच्या आणि बहीणींच्या संरक्षणची जबाबदारी होती… त्या दृष्टीने मी खेळाच्या आवडीतून स्वसंरक्षणच्या उद्देशाने तायक्वांदो शिकले… त्याच आवडीतून माझ्यात पुढे ट्रेकिंगचा छंद निर्माण झाला.” 
 
 

खेळाच्या आवडीतून ट्रेकिंगचा छंद 
हायकाचे बालपण खेडेगावात गेले. वडिलांचा छोटेखानी टेलरिंगचा व्यवसाय तर आई शाळेत शिक्षिका. तीन बहीणींमध्ये हायका सर्वात थोरली. सामान्य कुटुंबात जन्मलेली हायका उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली. तिच्या समाजात क्रीडा आणि ट्रेकिंग तर लांबच, पण महिलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. अशा परिस्थितीत आपली खेळाची आवड जपत तिने शिक्षण पूर्ण केले.  

हायकाला खेळ खेळण्याची प्रेरणा कशी मिळाली याबाबत बोलताना ती सांगते, “मी शिवजन्मभूमीत जन्मले असल्याने लहानपणापासून माझ्या अंगी साहसी वृत्ती आहे. मला भाऊ नसल्याने माझ्यावर स्वतःच्या आणि बहीणींच्या संरक्षणची जबाबदारी होती… त्या दृष्टीने मी खेळाच्या आवडीतून स्वसंरक्षणच्या उद्देशाने तायक्वांदो शिकले… त्याच आवडीतून माझ्यात पुढे ट्रेकिंगचा छंद निर्माण झाला.”  
 
खेडेगावातून पुण्यात येऊन आझम कॅंपससारख्या नामांकित कॉलेजमध्ये तिने एमबीए चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याच क्षेत्रात काही नोकरी सुरु ठेवली. खेळाची आवड असल्याने तिने शालेय मुलांना खेळांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आपली नोकरी सांभाळत शनिवार रविवारचा वेळ ती आपल्या भटकंतीला देत असत. शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांचे स्मरण करून तिने आपल्या ट्रेकिंगच्या प्रवासाला प्रारंभ केला. आजवर तिनेतोरणा, हरिश्चंद्रगड, कोरीगड, कोकणदिवा, राजमाची यासारखे भुईकोट, सागरी किल्ले, डोंगरी किल्ले अशा बऱ्याच ठिकाणी भटकंती करून ती माहिती संकलित केली. तिचे  भटकंतीचे व्लाॅग्स युट्युब आणि इंस्टाग्रामवर लोकप्रियही ठरू लागले आहेत.   

 
ही कल्पना कशी सुचली याविषयी विचारले असता ती सांगते, “माझी आई शिक्षिका असल्याने ती नव्या विचारांची आहे. तिला सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीबद्दल बरीच माहिती आहे. त्यामुळे तिनेच मला चॅनेल सुरु करण्याची संकल्पना दिली. त्यानंतर मी सोशल मीडियावर ‘हिजबी ट्रेकर’ नावाने माझा चॅनेल सुरु केला.” 

‘हिजाबी ट्रेकर’ हायकाचा प्रवास 
हायका तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सह्याद्रीचे सौंदर्य दाखवण्यासोबतच, महाराष्ट्राची संस्कृती, गड-किल्ल्यांनी जपलेला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते. एखादा उंच किल्ला किंवा डोंगर ठरवायचा आणि त्यावर मजल-दरमजल करत चढत जाण्यासाठी जंगलाशी एकरूप होणारे सुटसुटीत कपडे असावेत. परंतु त्यापलीकडे जात धार्मिकतेतून आधुनिकतेची कास धरत हायकाने हिजाब परिधान करून ट्रेक करण्याचे ठरवले. ती फक्त ट्रेकिंगच करत नाही, तर यामाध्यमातून हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबद्दलची समाजात असलेली चुकीची प्रतिमाही ती मोडीत काढत आहे.

प्रबोधन काळानंतर अनेक समुदायांनी आधुनिक विचार स्विकारला असला, तरीही धार्मिकता जपूनही आधुनिकता कशी स्वीकारता येते हे हायकाने दाखवून दिले आहे. हायकाला हिजाब परिधान करून ट्रेकिंग करण्याबद्दल अनेकांकडून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर हायका म्हणते, “मी जेव्हा २०१९ साली जेव्हा उमराह करून आले तेव्हा हिजाब बद्दल माझ्या मनात अजूनच आदर निर्माण झाला. तेव्हा मला समजले की धर्म किंवा संस्कृती कधीही तुमच्या महत्वाकांक्षेच्या आड येत नाही. हिजाब परिधान करूनही आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. कारण हिजाब ही सक्तीची नसून निवडीची बाब आहे.”

हायका पुढे म्हणते, “आपल्या समाजात बऱ्याच लोकांचा असा समज असतो की धार्मिक असल्यावर आपल्याला आपल्या आवडीनिवडी जपता येत नाही. परंतु लोकांच्या या गैरसमजावर मला छेद द्यायचा होता. त्यामुळे मी माझी धार्मिक ओढ आणि ट्रेकिंगचा छंद सोबत पुढे घेऊन जाण्याचे ठरवले आणि त्यातून निर्मिती झाली ती ‘हिजाबी ट्रेकर’ संकल्पनेची. 

हिजबी ट्रेकरच्या लोगो बाबत बोलताना ती सांगते, “ आपल्या तिरंग्याबद्दल प्रचंड आदर आहे. ते प्रेरणास्थानही आहे. तिरंग्यातील तीन रंगांची प्रेरणा घेऊन मी माझ्या हिजबी ट्रेकरच्या लोगोची निर्मिती केली.”
 

महिलांसाठी ट्रेकिंगचा ग्रुपची संकल्पना 
खेळाच्या आवडीपासून ते ट्रेकिंगपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना हायका सांगते, “मी या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाला दाखवून देत आहे की मुस्लिम महिला सुद्धा क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. आज माझे सोशल मीडियावरील फॉलोवर्स मला हिजबी ट्रेकर म्हणून संबोधतात. हिजाबी ट्रेकर ही आता माझी ओळख बनली आहे”

एक महिला म्हणून ट्रेकिंगच्या सुरुवातीच्या दिवसात तिला काय अडचणी आल्या हे विचारले असता ती सांगते, “ट्रेकिंग करताना सुटसुटीत पण आखूड कपडे घालावे लागतात. परंतु मला अंगभर झाकलेल्या कपड्यात साजेसे वाटते. त्यामुळे त्या एका गोष्टीची मला अडचण वाटली, परंतु सुदैवाने केरळ मधील काही कंपन्यांनी ट्रेकिंगदरम्यान वापरले जाणारे अंगभर कपडे बाजारात आणले. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक मुलींचे प्रश्न यातून सुटले.”

पुढे ती म्हणते, “मला अशा भरपूर मुली भेटल्या की ज्यांना ट्रेकिंग करायची इच्छा आहे. परंतु ट्रेकिंगच्या बाबतीत अनेक मुलींच्या मनात जाण्यापासून ते राहण्यापर्यंत अनेक प्रश्न उद्भवत असतात. ट्रेकिंग करताना आपल्यासोबत मुले सुद्धा असतील वैगेरे वैगेरे… अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मला आल्या. यात काही अयोग्य नाही परंतु विशेषतः मुस्लीम कुटुंबात या गोष्टी जास्त पाळल्या जातात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना माझ्या मनात विचार आला की आपणच महिलांसाठी असा एक ट्रेकिंगचा ग्रुप तयार केला पाहिजे. ज्याद्वारे महिला निश्चिंत होऊन मुक्तपणे ट्रेक करू शकतील.”

स्वतःला न्याय देण्यासाठी वकिलीचे शिक्षण…
शिक्षण हा विकास आणि सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दुर्दैवाने भारतातील मुस्लिमांचे शिक्षणातील विशेषतः उच्च शिक्षणातील प्रमाण फारसे समाधानकारक नाही.. शिक्षणाच्या अभावामुळे हा समाज काहीसा मागे राहिला असला तरी  आज त्यात पुष्कळ सकारात्मक बदल होत असल्याचे दिसते. 

शिक्षणाअभावी महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शिक्षण किती गरजेचे आहे यावर हायकाने आपले ठाम मत मांडले आहे. महिलांनी शिक्षण घेऊन सक्षम झाले पाहिजे असे सांगताना हायका पुढे म्हणते, “२०१७ मध्ये माझे लग्न झाले. मत लग्नानंतर एकाच वर्षात मला माझ्या नवऱ्यापासून विभक्त व्हावे लागले. त्यानंतर नातेवाईक, समाज या सगळ्यांच्या प्रश्नांना मला सामोरे जावे लागले. जोडीला घटस्फोटासाठीची मोठी न्यायालयीन लढाईही सुरु झाली आणि ती लढाई अजूनही सुरूच आहे. कायद्याचे ज्ञान नसल्याने ही लढाई तितक्या समर्थपणे लढता येत नसल्याची जाणीव मला झाली.”

ती पुढे म्हणते, “आपल्या देशात महिलांसाठी अनेक कायदे आहेत. मात्र  त्या कायद्यांचा वापर कसा करायचा हे मला माहिती नव्हते. त्यामुळे मी स्वतःची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले.” 

हायका आता पुण्यातील नामांकित कॉलेजमधून एलएलबी चे शिक्षण पूर्ण करत आहे. यासोबतच तिला तिचा खेळाचा आणि ट्रेकिंगचा छंद देखील जोपासायचा आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर महिलांसाठी ट्रेकिंगचा ग्रुप तयार करायचा आहे. त्यासोबतच वयस्कर महिलांच्या आरोग्यासाठी तिला फिटनेस ट्रेनिंग सेंटर सुरु करायचे आहे. 

अशारितीने महिलांनी सगळ्याच बाजूने सक्षम असणे किती महत्वाचे आहे हे हायकाच्या उदाहरणातून शिकणे गरजेचे आहे. समाजाच्या चौकटीतून बाहेर पडून जिद्दीने शिक्षण घेऊन आपला छंद जोपासणारी हायका तमाम महिलांसाठी एक आदर्श आहे. 
 
- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter