कला ही माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही असे म्हटले जाते. कलेच्या माध्यमातून आजवर अनेक लोकांनी त्यांचे करिअर घडवले आहे. आपली आवड आणि छंद जोपासत अनेक लोक यशस्वी झाले आहेत. याची कित्तेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. त्यापैकीच एक आहेत आपल्या कलेच्या माध्यमातून मुली आणि महिलांच्या जीवनात रंग भरणाऱ्या सोलापूरच्या हाफिजा अन्सारी. हाफिजा अन्सारी यांनी आपल्या कलेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाफिजा यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी माहिती देणारा हा विशेष लेख…
‘गरीबीमुळे काही महिलांची स्वप्न पूर्ण होत नाही. त्या महिलांसाठी मला काम करायचे आहे,’ असं म्हणणारी हाफिजा अन्सारी मुळची सोलापूरची. लहानपणापासूनच तिला चित्रकला आणि आर्टवर्कचा छंद होता. तिने आपला छंद जोपासला आणि पुढे त्यालाच करिअर म्हणून निवडले.
छंदाला करियरम्हणून निवडणे तसे धोक्याचे. मात्र घरून पाठींबा मिळाला की मोठा भावनिक आधार मिळतो. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी हाफिजा म्हणते, “आई वडील, भाऊ आणि बहीण असे आमचे छोटेखानी कुटुंब. आम्ही मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येतो.. आमच्या खानदानात सर्वच उच्चशिक्षित आहेत. बहुतांश जण डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक आहेत.”
पुढे ती म्हणते, “प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेमध्ये अनेक विषय शिकवले जात. सर्वांप्रमाणेच मलाही लहानपणी चित्र काढायला आवडायचे. मीही तेव्हापासूनच चित्र काढत आहे. आठवीत असताना मी एका चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत माझा नंबरही आला होता. मला बक्षीस म्हणून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळाली होती. तेव्हापासूनच मला चित्रकलेविषयी विशेष आवड निर्माण झाली असं म्हणता येईल.”
शिक्षण आणि करिअर
सोलापूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना हाफिजाने चित्रकलेचा छंद जोपासला. छंद म्हणून चित्रकला जरी योग्य असली तरी करिअर म्हणून या क्षेत्रात येऊ अस तिलाही वाटलं नसेल. हाफिजा म्हणते, “मला पहिल्यांदा बक्षीस मिळाल्यानंतर मलाच माझ्या चित्रकलेचं अप्रूप वाटल्यासारखं झालं. इतर विषयातही मी चांगली होते. घरचे बहुतांश लोक डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक आहेत. मला मात्र तेच तेच करायचे नव्हते. म्हणून मी आर्टवर्कच्या, चित्रकलेच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मला त्या स्पर्धांमध्येही बक्षीसं मिळत गेली. अभ्यासात हुशार असूनही दहावी पास झाल्यानंतर मी आर्टस् ला प्रवेश घेतला. ”
हाफिजा पुढे सांगते, “माझ्या या निर्णयाला घरच्यांनी अजिबात विरोध केला नाही. घरातील इतरांप्रमाणेमी पण डॉक्टर, इंजिनियर व्हावं असा कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. मुलांना आवडीचे शिक्षण घेण्याचे आणि काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य घरच्यांनी मला दिलं.
करियर म्हणून या क्षेत्राची निवड करण्याविषयी ती म्हणते, “मलाही काहीतरी वेगळं करायचं होतं. डिझाईनिंग आणि आर्टवर्कमध्येही आवड होतीच. त्यामुळे मी या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघायचं ठरवलं. घरातून मला यासाठी सर्वांचे प्रोत्साहन मिळाले. महेरातून आणि पुढेसासरहूनही मला सर्वांचा पाठींबा आणि मदत मिळत राहिली”
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर हाफिजाने ए.टी.डी आणि जे.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण केले आहे. हे दोन्ही कोर्सेस चित्रकला, आर्टवर्क आणि डिझाईन विषयीचेच आहेत. हेकोर्स पूर्ण केल्यानंतर शाळा किंवा कॉलेजमध्ये कलाशिक्षक म्हणून तुम्ही पात्र ठरता.
हाफिजामुळे शेकडो महिलांना मिळाला रोजगार
शिक्षण पूर्ण केल्यानंतर हाफिजाने सोलापूरमध्ये काम सुरु केले. मेहंदीपासून ते आर्टवर्क पर्यंतच्या ऑर्डर घ्यायला तिने सुरुवात केली. इथूनच तिच्या व्यवसायाचीही सुरुवात झाली. ती इतक्यावरच थांबली नाही तर आपली कला तिने इतर महिलांनाही शिकवली. या कलेमुळे सोलापुरातील शेकडो महिलांना आर्टवर्कचे शिक्षण तर मिळालेच पण रोजगारही मिळाला.
महिलांना ही कला शिकवण्याचा आणि स्वावलंबी बनवण्याचा विचार कसा आला या विषयी बोलताना हाफिजा म्हणते, “माझ्या घरचे वातावरण चांगले असल्याने त्यांनी मला सपोर्ट केला. माझ्या सर्व गरजा त्यांनी पूर्ण केल्या. परंतु मी शाळेत आणि महाविद्यालयात असताना माझ्या मैत्रिणींना गरीब परिस्थितीमुळे अडचणी यायच्या. घरगुती अडचणींमुळे आणि आर्थिक क्षमता नसल्याने मुलींना शिक्षणात पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे ते त्यांच्या स्वप्नांपासून दूर राहायच्या. त्यामुळे मला वाईट वाटायचे.”
पुढे ती म्हणते, “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळे महिलांना हा अपमान सहन करावा लागतो हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच मी मुलींना स्वयंपूर्ण बनवण्याचं ठरवलं. मी सोलापुरातील महिलांना आर्टवर्कची माहिती दिली. त्यांना मेहंदीपासून ते सर्व प्रकारचे आर्टवर्क शिकवले. ही कला शिकल्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आणि त्या स्वयंपूर्ण झाल्या याचा मला आनंद आहे.”
मुली आणि महिलांना प्रशिक्षण देणारी हाफिजा
चित्रकार हाफिजा सोलपुरच्या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देते. यात ती पंधरा दिवसांचे कोर्सेस घेते. बऱ्याच महिला गरीब घरातील असल्यामुळे या कोर्सेससाठी ती नाममात्र दोनशे रुपये फी घेते. याविषयी ती म्हणते, “केवळ गरिबीमुळे मुली मागे राहता कामा नये असं मला वाटायचं. त्यामुळे कोर्सचे शुल्क मी अगदी कमी ठेवले. या प्रशिक्षणात महिलांना आणि मुलींना बेसिकपासून ते आर्टवर्क आणि डिझाईन अशा सर्व गोष्टी शिकवते. गेल्या ८-१० वर्षांपासून मी हे काम करत आहे. महिलांना शिकवण्यासोबतच मी त्यांना ऑर्डरही मिळवून देते.”
हाफिजा ही विविध टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ आणि आकर्षक गोष्टी बनवते. यामध्ये पोट्रेट कॅलेंडर, पेंटिंग, मेहंदी, लग्नाचे बुकलेट, मंडल आर्ट, क्राफ्टवर्क, मिररवर्क आणि विविध आर्टवर्कचा समावेश आहे.
ती म्हणते, “माझ्या कलेमुळे लोक मला ओळखू लागले आहेत. येणाऱ्या काळात मला महिला आणि मुलींसाठी आणखी काम करायचे आहे. महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांची स्वतःची ओळख निर्माण व्हावी यासाठी मला काम करायचे आहे.”
हाफिजा ने स्वतःच्या छंदाचे यशस्वी करियरमध्ये आणि पुढे व्यवसायामध्ये रुपांतर केले. तिची ही जिद्द आणि स्वतःवरील आत्मविश्वास निश्चितच कौतुकास्पद असला तरी त्याहून प्रेरणादायी आहे ती महिलांना स्वावलंबी बनवण्याची तिची धडपड! तिच्या या जिद्दीला आणि धडपडीला ‘आवाज मराठी’चा सलाम!