समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जद्दोजहद करणाऱ्या डॉ. अंजुम कादरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 10 Months ago
डॉ. अंजुम कादरी
डॉ. अंजुम कादरी

 

“ज्या समाजात स्त्रियांना बोलूच दिलं जात नाही, त्या फक्त घरकाम करतात, बाहेर पडत नाहीत, नेतृत्व करत नाहीत असा समज असलेल्या समाजातून मी आली आहे. माझा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला. पण घरचे रूढी-परंपरावादी नव्हते.  त्यांनी माझ्यावर ओझी लादली नाहीत. आज मी पुरुषांच्या बरोबरीने काम करते. माझ्या समाजातील पुरुष सहकारी माझी संधी डावलू शकत नाहीत. काहीजण नाकं मुरडतात. पण त्याने काही फरक पडत नाही.” डॉ. अंजुम कादरी आपला जीवनप्रवास उलगडवून सांगत होत्या. 

उदगीरला झालेल्या १६व्या विद्रोही संमेलनानंतर अंजूम कादरी हे नाव महारष्ट्रात बऱ्यापैकी चर्चेला आले. मराठवाड्यातला मुसलमान समाज तसा सरंजामी वारसा असलेला. निजामशाहीत म्हणजे सरंजामशाहीतून सर्वात शेवटी म्हणजे १९४८मध्ये हैदराबादसोबत भारतीय संघराज्यात सामील झालेला. त्यामुळे मराठी मुसलमानांपेक्षा निराळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि मर्यांदामध्ये त्यांना आपल्या सामाजिक, कौंटुबिक, व्यावसायिक जीवनाची सुरुवात करावी लागली. 

कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातील शाह इस्माईल कादरी या सुफी संतांच्या घराण्यात अंजूम कादरी यांचा जन्म झाला. हैदराबाद विलिनीकरणानंतर दखनेतील मुसललमान मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला स्थलांतरीत होत होता. त्या काळात या दखनी मुसलमानांना भारताविषयी आश्वस्त करुन त्यांना भारतात आपले भवितव्य शोधण्यास भाग पाडणाऱ्या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये अब्दुल्ला कादरी यांचा समावेश होता. 

अब्दुल्ला हे अंजूम कादरी यांचे वडील होते. अब्दुल्ला कादरी यांनी उदगीर शहराती जमहूर या नावाने शाळा आणि महाविद्यालय सुरु केले. जमहूर म्हणजे लोकशाही. हे नाव निवडण्यातूनच त्यांची दूरदृष्टी आणि ध्येयवाद दिसून येतो. अब्दुल्ला कादरी यांना चार मुली. चारही मुली उच्चशिक्षित व्हाव्यात हा अब्दुल्ला कादरी यांचा ध्यास. चारही मुली शिकल्या. त्यापैकी अंजुम कादरी या डॉक्टर झाल्या. 

१९९९मध्ये वडीलांचे निधन झाल्यानंतर वडलांच्या सर्व व्यावसायिक, संस्थात्मक, सामाजिक जबाबदाऱ्या डॉ. अंजुम कादरी यांच्यावर येऊन पडल्या. त्या त्यांनी लिलया पेलल्या. जमहूर शैक्षणिक संस्थेत त्या सचिव म्हणून कार्यरत झाल्या. त्यांनी शाळेत अनेक उपक्रम त्यांनी राबवले.
  

पुढे त्यांनी फातिमा हॉस्पिटल या नावाने त्यांनी रुग्णालय सुरु केले. उदगीरसारख्या ग्रामीण भागात महिला रुग्णालय यशस्वी होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र अंजूम कादरींनी प्रचंड आत्मविश्वास आणि स्वकर्तृत्व यांच्या बळावर फातिमा हॉस्पिटल नावारूपाला आणले.  आज अंजूम कादरी उदगीर आणि परिसरातील यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ  म्हणून ओळखल्या जातात. अनेक किचकट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. हॉस्पिटलसोबत इतर वैद्यकीय सेवा देण्याचा विचारही त्यांनी केला. त्या परिसरातील अनेक रुग्णालयांना सहाय्यक सुविधा देतात. उमरगा येथील शासकीय रुग्णालयात त्या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून भेट देतात.

अंजूम कादरी या विशेषतः महिलांमध्ये कार्यरत असतात. मुस्लिम महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी संस्थात्मक प्रयत्नही केले आहेत. मुस्लीम महिलांना छोट्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. त्यासाठी शिवणयंत्रे भेट देणे, रोजगार गट स्थापन करणे असे उपक्रम त्या कायम राबवत असतात. मुस्लीम महिलांच्या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी काही उपक्रमही राबवले आहेत. महिला सक्षमीकरण, आरोग्याच्या समस्या, रोजगार निर्मिती, अर्थसहाय्य, कौटुंबिक विधी सल्ला अशा पंचसुत्रीवर त्यांचे काम आधारलेले आहे.
 
Dr Anjum Qadri

उदगीर शहरात महिलांसाठी त्यांनी आरोग्य शिबिरांचे सातत्याने आयोजन केले आहे. त्याशिवाय महिलांसाठी व्यवसायिक गटांची स्थापना करताना घरामध्येच त्या छोटे छोटे उद्योग करू शकतील अशी व्यवस्था त्यांनी करून दिली आहे. शिवण यंत्रे वाटप केल्यानंतर त्या महिलांना व्यवसायिक दृष्ट्या एकत्रित करून छोट्या वस्त्रोद्योगांचे कंत्राट घेणे, मजुरीवर राबणाऱ्या महिलांना नफ्यामध्ये भागीदार होण्याची स्वप्ने अंजुम कादरी यांनी दाखवली.  नर्सिंग आणि मॉंटेसरी कोर्सेस त्यांनी सुरु केले आहेत. 

अंजूम कादरी याविषयी म्हणतात, “महिला आर्थिक पातळीवर सक्षम झाल्याशिवाय कौटुंबिक पातळीवर सक्षम होऊ शकत नाही. कारण कौटुंबिक सक्षमता अथवा कुटुंबातील सक्षम स्थान हे शेवटी त्या व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणून आम्ही स्त्रियांच्या आर्थिक सक्षमतेकडे लक्ष दिले आहे. सध्या जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थीनी वेगवेगळ्या उपक्रमात क्रमिक व व्यवसायिक शिक्षण घेत आहेत. पाच बचत गटातून अडीचशेहून अधिक महिला जोडल्या आहेत. व्यवसायिक उपक्रमात २५ महिला प्रायोगिक तत्वावर काम करत आहेत. आमच्या काही स़कल्पना प्रत्यक्षात उतरल्या तर ही संख्या आणखी वाढेल.” 
 
No photo description available.

अंजूम कादरींनी व्यावसायिक क्षेत्रासोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही असे अनेक प्रयोग केले.  २०२०मध्ये त्यांनी उदगीर शहरात राष्ट्रीय उर्दू कवी संमेलन घेतले होते. या संमेलनासाठी शबीना अदीब, जौहर कानपूरी यांसारखे देशभरातील उर्दू कवी- कवयित्री लातूरमध्ये आले होते. संस्थेच्यावतीने २०२२मध्ये अंजूम कादरी यांनी अखिल भारतीय विद्रोही संमेलन घेतले. २०२२मध्ये उदगीरमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन जाहीर झाले होते. त्या संमेलना प्रस्थापितांच्या मांदियाळीत विस्थापितांना संधी मिळणार नाही. वंचित, विस्थापित घटकांचा आवाज साहित्याच्या क्षेत्रात मांडला जावा यासाठी अंजूम कादरी यांनी विद्रोही संमेलनाचे आयोजन केले. त्या स्वतः या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या. 
 
विद्रोही संमेलनाचे नियोजन करताना त्यांनी अनेक सांस्कृतिक प्रयोग करुन पाहिले. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला महात्मा बसवेश्वर प्रवेशद्वार हे नाव दिले होते. तर पुस्तकप्रदर्शनाला दखनेतील सुफी हजरत बंदानवाज यांचे नाव दिले होते. सुफी साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंत सरवर चिश्ती यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी आमंत्रित केले होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी अंजूम  कादरी यांनी शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचे आयोजन केले होते. त्याशिवाय आदिवासी पवरी वादन आणि जात उतरंडीच्या रचनेला तोडून संमेलनाची सुरुवात केली होती. 

या संमेलनात केलेल्या भाषणात त्यांनी उदगीर शहरात संस्कृती विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली होती. दखनी मुसलमान हा उत्तरेतल्या मुसलमानांपेक्षा कसा वेगळा आहे हे सांगताना त्यांनी अनेक सांस्कृतीक भेद स्पष्ट केले होते. त्या म्हणाल्या होत्या. “दखनेतील मुसलमानांनी दखनी भाषेच्या माध्यमातून दक्षिण भारताला संवादाची एक केंद्रीय भाषा दिली आहे. दखनेतील सुफींच्या चळवळी या सामान्य माणसाला जोडणाऱ्या होत्या. इथे कुरआनचे अनुवाद देखील उर्दू किंवा हिंदीत झाले नाही तर ते दखनी भाषेत प्रथमतः झाले आहे.” अशी आठवण त्यांनी करुन दिली. 
 
No photo description available.

त्यांनी २०२२मध्ये सदा फाउंडेशन या संस्थेची स्थापन केली. यावर्षीपासून त्यांनी महाराष्ट्र उर्दू साहित्य संमेलनही सुरु केले. या संमेलनासाठी दिल्ली, अलीगढ, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, मुंबई वगैरे शहरातून उर्दू साहित्यीकांना आमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवसांचे हे संमेलन पार पाडल्यानंतर या संमेलनाच्या समारोपात दखनी मुस्लीमांचे एक ज्ञानकेंद्र उदगीर शहरात सुरु करण्याची त्यांनी घोषणा केली. त्याची संकल्पना स्पष्ट करताना त्या म्हणतात, “सांस्कृतिक भान असल्याशिवाय कोणताही समाज यशस्वी राजकारण करु शकत नाही. दखनेतील मुस्लीमांना स्वतःच्या संस्कृतीचे आत्मभान यावे यासाठी मी ही संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानसाधना हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याकडे मुस्लिमांनी वळले पाहिजे. आज मुस्लिम समाजाविषयी संशोधन करायचे तर अलीगड, दिल्ली वगैरे शहरात जावे लागते. तशाच पातळीवर एक केंद्र इथे दखनेत सुरु व्हावे अशी माझी इच्छा आहे. या मातीत जन्मलेल्या अनेक इतिहासपुरुषांना समाज विसरत चालला आहे. त्यांच्या ऐतिहासिक योगदानाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून माझा हा खटाटोप आहे. ”
 
No photo description available.

उदगीर येथे सुरु केल्या जाणाऱ्या नॉलेज सेंटरसाठी त्यांनी जागा खरेदी केली आहे. सुरुवातील दुर्मिळ ग्रंथांचे संकलन, प्रकाशन संस्था, संमेलने, परिसंवाद, शिष्यवृत्ती योजना अशा माध्यमातून त्यांनी प्रवास सुरु केला आहे. पुढे सदा फाउंडेशनच्या अंतर्गत संशोधन केंद्र सुरु करुन त्या माध्यमातून प्रगत ज्ञानकेंद्राची त्यांची योजना आहे. या ज्ञानकेंद्रासाठी देश-विदेशातील अनेक विद्वानांशी त्यांनी संपर्क साधला आहे. अलिगढ, दिल्ली, हैदराबाद, बंगळूरू आदी शहारांचे सतत दौरे करुन तेथील महत्वाच्या अभ्यासकांना उदगीरला आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. उत्तर भारतातील अनेक ग्रंथ, काहींच्या हस्तलिखित प्रती संकलित केल्या आहेत. शिवाय प्रगत अशा ग्रंथालयासाठी काही योजनाही त्यांनी कार्यान्वित केल्या आहेत. 

आर्थिक सक्षमता, कौटुंबिक आणि सामाजिक नेतृत्व असा विचार महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात होताना दिसत नाही. महाराष्ट्रात विशेषतः मुस्लीम महिलांमध्ये अशा पध्दतीने काम करणारी फार तुरळक उदाहरणे आपल्याला दिसतात. डॉ अंजुम कादरी या त्यात अग्रभागी आहेत यात शंका नाही!      

- सरफराज अहमद