नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत तब्बल २७ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले आहे. भारतीय जनता पार्टीने दिल्लीची सत्ता रेखा गुप्ता यांच्याकडे हाती सोपवण्याचे निश्चित केले आहे.
काल १९ फेब्रुवारीला होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाची निवड निवड करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते इतर आमदारांसह अनेकांकडून राजधानीत सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला. मात्र भाजपने रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे.
आज २० फेब्रुवारीला रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे इतर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला झाल्या. तर ८ फेब्रुवारीला लगेच निकाल जाहीर झाले. भाजपाने आम आदमी पार्टीचा पराभव करून मोठा विजय मिळवला आणि २७ वर्षांनी पक्ष पुन्हा सत्तेत आला. ७० जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८ जागांवर विजय मिळाला तर आप ला २२ जागांवरच समाधान मानावे लागले.
रेखा गुप्ता यांची राजकीय कारकीर्द
रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. संघाच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माध्यमातून त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. १९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या. १९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या.
रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.