नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच तीन बहिणींच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख.
काही बातम्यांचा पाठपुरावा करीत असताना पालघरमधील सफाळा येथील अस्लम शेख या मित्राचा फोन आला. 'माझी धाकटी कन्या अलियाने मेडिकल अभ्यासक्रमातील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली. ती महाराष्ट्रात सहावी आली.' बातमी सांगताना अस्लमभाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचे कुटुंब व मुस्लिम समाजासाठी ही आश्चर्य व सन्मानाची गोष्ट होती.
मी सहजच विचारले, 'तुमच्या कुटुंबातील ही दुसरी कन्या डॉक्टर आहे ना?' त्यावर अस्लमभाई म्हणाले, 'आलियासोबतच मला आयशा व सिद्दीका या जुळ्या मुलीही आहेत. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून या दोघींनीही वैद्यकीय अभ्यासक्रमातील बीडीएस पदवी संपादन केलीये आणि आता त्या दंतचिकीत्सक (डेंटीस्ट) झाल्या आहेत.' धाकटी कन्या आलियाविषयी ते म्हणाले, 'मुंबईतील सायनच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमधून आलियाने स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रमात एमबीबीएस पदवी मेरिटवर संपादन केली. पुढे परळच्या केईएम मेडिकल कॉलेजमधून मानसोपचार सायकॅट्रीक या विषयात पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन ती एमडी झाली. विशेष म्हणजे ती महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकाने पास झाली.' अस्लमभाई अतिशय अभिमानाने सांगत होते. आलियाचा ज्या मुलाशी निकाह होणार आहे तो भावी जावई डॉ. इम्तियाज काझी हा देखील डॉक्टरच असून एमबीबीएसनंतर त्याच केईएम कॉलेजात एम. एस. आर्थो सर्जन झाल्याचे अस्लमभाईंनी एका क्षणात सांगून टाकले.
तेली मुस्लिम समाजातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तीनही मुली डॉक्टर झाल्याचे हे पहिले उदाहरण आहे. अस्लमभाईंना तीन कन्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील यशामुळे असीम आनंद झाला होता. या साऱ्या यशात या डॉक्टर कन्यांची आई साबिया अस्लम शेख यांचाही मोठा वाटा आहे.
अस्लमभाईंचे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांच्या गरीबीमुळे पूर्ण होऊ शकले नाही. क्रिकेटची उत्तम जाण, आणि या खेळात पारंगत असूनही अस्लमभाई आर्थिक कारणामुळे क्रिकेटपटूही होऊ शकले नाहीत. पण अस्लम यांचे आईवडील आणि त्यांची धर्मपत्नी साबिया शेख यांची आजी आधुनिक विचारांची होती. मुलींना उच्च शिक्षण दिलेच पाहिजे या ठाम मताची होती. त्यामुळे मराठी मुस्लिम कुटुंबातील तीनही मुली आज डॉक्टर बनल्या आहेत. या परिवाराने आणि त्यांतील या तीन मुलींच्या उत्तुंग यशाने मुस्लिम समाजासमोर मोठा आदर्श घालून दिला आहे.
मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सुधारणांबाबत केंद्र व राज्य सरकारचे अनेक अहवाल आले. पण राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या सर्वच राज्यकर्त्यांनी ते बासनात गुंडाळून ठेवले आहेत. मतदान आले की मतांच्या बेगमीसाठी कथित व्होट बँक वापरली गेली असून तीच परंपरा सुरु आहे.
भारतीय मुस्लिमांच्या बहुतेक प्रश्नांवर एक नामी उपाय आहे. तो म्हणजे उच्च दर्जेदार, व्यावसायिक कालानुरुप शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची, ज्ञातीची, परिसराची आणि देशाची प्रगती साधता येऊ शकते. शिक्षण हाच मुस्लिमांच्या आर्थिक शैक्षणिक प्रश्नावर नामी उपाय आहे. अस्लमभाई आणि साबिया भाभी यांनी हे सिद्धही करून दाखवले आहे. साहजिकच आयशा, सिद्दीका या जुळ्या मुली व धाकटी आलियाने खडतर कष्टाने ही साधना पूर्ण केली.
सफाळे भागात बहुजनांच्या विकासाचा ध्यास घेतलेले प्रविण राऊत हे मोठे क्रीडा प्रेमी व्यक्ती. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजनात ते मोठे माहीर. देशी कबड्डी आणि या भागातील युवकांच्या नसानसात भिनलेले क्रिकेट या खेळाच्या निमित्ताने प्रविण राऊत यांनीच अस्लमभाईंशी प्रथम ओळख करुन दिली. क्रीडा स्पर्धांची आवड हा आमच्यातील समान धागा होता.
अस्लमभाईंचे आईबाबा हे अल्पभूधारक शेतकरी. अस्लमभाईंचे वडिल युनूसमिया हे अंधेरीतील लहानशा कंपनीत कामाला होते. तर अस्लमभाईंची आई कुलसूम ह्या घरातील कामे आटोपून छोटी कामे व मच्छि विकून चार मुले, दोन मुली, सासू अशा माणसांच्या मोठ्या कुटुंबाच्या घरखर्चास हातभार लावत असे. काही प्रसंगी उपाशी राहून मुलांच्या शिक्षण, शिस्त, संस्काराकडे जातीने लक्ष देऊन त्यांना मोठे केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलांची शाळा, कॉलेज पूर्ण झाली, पण अस्लमला डॉक्टर करता आले नाही याची खंत डॉक्टर कन्यांच्या आजोबांना शेवटपर्यंत डसत होती. अस्लमभाई यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्याकाळी पूर्णत्वास गेले नाही. पण त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी अशी रस्ते व बांधकामाच्या लहान मोठ्या कंत्राटाची कामे घेऊन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला.
अंधेरी मरोळच्या एका सुसंस्कृत कुटुंबातील मुलीशी अस्लमभाईचा विवाह झाला. त्यांना प्रथम दोन जुळ्या मुली आणि सर्वात धाकटी आलिया अशा तीन कन्या झाल्या. परिस्थिती बेताचीच असली तरी आपल्या मुलींना उच्च शिक्षित बनवण्याचे स्वप्न अस्लमभाई आणि साबिया भाभी यांनी पहिले. कन्यांनीसुद्धा आईबाबांची मनिषा जिद्दीने पूर्ण केली.
मुंबईत टाइम्स समूहात दाखल झाल्यानंतर मुस्लिमांमध्ये तेली समाज असतो हे प्रथमच समजले होते. मुरबाड, शहापूर, भिवंडी, ठाणे शहर, पालघर, जव्हार, डहाणू, सफाळे, सोनावे, दहिसर, मनोर, शिरगाव, तारापूर चिंचणी, वाडा, मथाणे, वेढी, कोरे, एडवण, सातपाटी, मुंबई उपनगर व शहर तसेच विदर्भ मराठवाड्यात काही भागात मुस्लिम तेली समाज आहे. पूर्वीच्या गावगाड्यात बारा बलुतेदारी पद्धतीत तेलबियांपासून तेलाच्या घाणीतून तेल काढून देण्याचा या ज्ञातीचा पूर्वापार व्यवसाय होता. यामुळे गावातील सर्व जाती धर्मांशी मिळून मिसळून राहण्याची कला अवगत आहे. नंतरच्या काळात तेलनिर्मितीत यांत्रिकीकरण आले. परिणामी तेली समाजाचा परंपरागत तेलाचा व्यवसाय मोडीत निघाला. नंतरच्या काळात सेवा क्षेत्रात नोकरी, प्रवासी वाहतुकीसाठी वडापच्या वाहनांवर चालक, कोंबडी अंडी चिकनचा व्यवसाय, खाटिकांचा धंदा असे मुस्लिम तेली समाजाचे आर्थिक स्थित्यंतर झाले.
मुस्लिम तेली समाजातील व्यक्ती राजकारणाच्या उच्चपदावर जाऊ शकला नाही. कारण मतांच्या राजकारणात त्या समाजाचे उपद्रवमूल्य शून्य आहे. ओबीसी चळवळीचे नेते शब्बीर अन्सारी यांच्या मते मुस्लिम तेली समाज आता उच्च शिक्षणात यायला लागला आहे. परिस्थिती सर्व काही शिकवते. जालना जिल्ह्यातील याच समाजातील रिक्षाचालकाचा मुलगा हा भारतीय प्रशासन सेवेतील सर्वात कमी वयात आयएएस बनला आहे. तर औरंगाबादचे वाचन संस्कृती चळवळीतील मिर्झा अब्दुल करीम नकवी यांची कन्या मरियम हिने लहान मुलांसाठी ३२ वाचनालये सुरु केली. त्या मरियमचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे. आता समाजातील हाच यशाचा कित्ता सफाळ्यातील आयशा, सिद्दीका, आलिया या कन्यांनी पुढे नेला आहे.
पालघर जिल्ह्यातील मातृभूमीचा, इथल्या मराठी मातीचा शेख कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे. बहुजन विकास आघाडीच्या परिवारात रमणाऱ्या अस्लमभाईंना तीन कन्यांच्या शैक्षणिक मिशनसाठी मित्रांची मदत झाली. यात आमदार हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, अजीव पाटील, मिलिंद भाते, रमेश कोटी, उन्मेष कुलकर्णी व त्यांच्या घरातील लोकांनी सहकार्य दिल्याचे अस्लमभाई आवर्जून सांगतात.
तीनही मुलींना आपल्या वडलांप्रमाणे क्रिकेटपटू बनायचे होते. क्रिकेटचे तिघींना अफाट प्रेम. आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्याची मुलींना जाणीव होती. मुलींच्या बुद्धीमत्तेचा कल पाहून अस्लमभाई व साबिया यांनी अपार कष्ट सोसत तिघींना डॉक्टर केले. आता याच भागातील सात-आठ मुली या तिघींचा आदर्श घेत मेडिकल अभ्यासक्रमासाठी मार्गक्रमण करीत आहेत.
पहिल्या प्रथम स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व, अस्मिता यांची इस्लामने जाणीवपूर्वक दखल घेतली. मुस्लिम महिलांना अनेक हक्क आणि अधिकार इस्लाम धर्माने दिले. मात्र, धर्माच्या नावावर पुरुषप्रधान संस्कृतीच्या स्वयंघोषित रक्षकांनी हे अधिकार नाकारुन एक वेगळी परंपरा निर्माण केल्याचे वास्तव इस्लामचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांनी त्यांच्या 'इस्लाम ज्ञात आणि अज्ञात' ग्रंथात नमूद केले आहे. मुस्लिम महिलांना द्रव्यार्जनाचा आणि कुटुंबाचे गुजराण करण्यासाठी व्यवसाय करण्याचा अधिकार धर्माने दिला आहे. महत्वाचे म्हणजे महिलांना शिक्षणाचा अधिकारसुद्धा इस्लामने मान्य केल्याचे मुकादम यांनी ग्रंथात म्हटले आहे.
हजरत महंमद पैगंबरांची पहिली पत्नी हजरत खादिजा यांचा स्वत:चा असा व्यवसाय होता. मक्केतील एक श्रीमंत महिला म्हणून त्या ओळखल्या जायच्या. इस्लामची स्थापना झाल्यानंतर तो धर्म स्वीकारणारी ती पहिली महिला अनुयायी होती. आणि इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतरही तिचा व्यवसाय सुरुच होता. हीच परंपरा समाजातील इतर महिलांनी पाळली होती. पैगंबरांना मक्केच्या हिरा गुहेत रमजान महिन्याच्या २६व्या तारखेला पहिला साक्षात्कार झाला. त्याचा तो पहिला हुंकारही ज्ञानार्जन करा असा होता. अल्लाहने लेखणीच्या प्रतिकांद्वारे ज्ञानार्जन करण्याचा संदेश दिला आहे. आणि हा संदेश पुरुष व महिला अशा दोघांनाही लागू आहे, असे इस्लामचे अभ्यासक अ. का. मुकादम यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे.
मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिकली तरी ती पिढी सुधारु शकते असे म्हणतात. या अर्थाने मुस्लिम समाजातील आयडॉल होण्याची क्षमता अस्लमभाई आणि साबिया भाभी यांच्या तिन्ही डॉक्टर कन्यांमध्ये आहे. स्त्री शिक्षण किती आवश्यक व महत्वाचे आहे या मराठी मुस्लिम तेली समाजातील एका कुटुंबाने दाखवून दिले. एकाच कुटुंबात तीनही मुली डॉक्टर असण्याचे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील बहुदा पहिलेच उदाहरण असावे.त्यामुळे या शेख कुटुंबियांचे समाजाने मनापासून आभार व्यक्त करायला हवेत. या संपूर्ण कुटुंबाच्या यशस्वी भरारीला मानाचा सलाम!
- समीर मणियार
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)