शहनाज हुसेन... बस नाम ही काफी है!

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. किंबहुना सर्वच क्षेत्रात त्यांनी पुरुषांपेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र दिसते. एकेकाळी 'चूल आणि मूल' इतक्याच परिघात बंदिस्त असणाऱ्या महिला वर्गाने स्वतःच्या हिमतीवर हे बंधन जुगारून दिले आणि सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या व्यवसायविश्वातही महिलांनी नवनवीन क्षितिजे पादाक्रांत केली. त्यात मुस्लीम समाजातील महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशाच मुस्लीम महिला उद्योजिकांची (woman entrepreneurs) यशोगाथा 'आवाज मराठी'वरून प्रसिद्ध होत आहे. त्यापैकीच एका कर्तृत्ववान उद्योजिकेची आणि तिच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख

 
देश-विदेशात उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज हुसेन यांना आपण सगळेच जण ओळखतो, परंतु अजूनही त्यांच्या अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊयात शहनाजच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून ते लग्नापर्यंतच्या तर, घराच्या व्हरांड्यात सुरु केलेल्या उत्पादन विक्रीपासून ते ‘शहनाज हुसेन ग्रुप’पर्यंतच्या उद्योजकीय प्रवासाविषयी...

महिला उद्योजकांच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या भारतातील प्रमुख महिला उद्योजकांपैकी शहनाज हुसेन एक आहेत. त्या ‘शहनाज हुसेन ग्रुप’च्या संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा टर्नओव्हर ५०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. शहनाजच्या उद्योजकीय यशाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी भारताचा हर्बल वारसा, आयुर्वेद जागतिक स्तरावर लोकप्रिय केला. २००६ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशीही त्यांची मैत्री होती.

सुरुवातीला शहनाजने त्यांच्या घराच्या व्हरांड्यातून आपली उत्पादने विकायला सुरुवात केली. आपला स्टार्टअप इतका यशस्वी होईल याची त्यांनादेखील कल्पना नव्हती. यानंतर शहनाज जणू यशाच्या रथावर स्वार झाल्या आणि ते रथ असे दौडू लागले कि आजतागायत कधीही थांबलेले नाही. शहनाज अल्पावधीतच सौंदर्यक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव बनल्या. ७९ वर्षीय शहनाजने सोशल मीडिया नसतानाही आपला ब्रँड ‘शहनाज हुसेन ग्रुप’ ज्याप्रकारे जागतिक स्तरावर पोचवला त्याबद्दल जगभरातील लाखो तरुण उद्योजक आज त्यांची प्रेरणा घेतात. 

शहनाज भारताच्या पाच हजार वर्ष जुन्या प्राचीन सभ्यतेला प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधक वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जागा बनवणाऱ्या महिलांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. 

त्वचा आणि केसांच्या समस्यांवरील उपचारांसाठी शहनाज ओळखल्या जातात. केमोथेरपी आणि रेडिएशनचे त्वचा आणि केसांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी केमोलिन श्रेणी तयार केली आहे. २४ कॅरेट सोने, डायमंड, पर्ल, प्लांट स्टेम सेल्स, प्लॅटिनम रेंज आणि फ्लॉवर बोटॅनिक रेंज यासारख्या प्रीमियम लक्झरी रेंजने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी जागा बनवली आहे. सेल्फ्रिज येथील लॉयड्स फार्मसी आणि लंडनच्या प्रसिद्ध स्टोअरमध्ये शहनाजच्या उत्पादनांची विक्री सुरू झाल्यावर ‘शहनाज हुसेन ग्रुप’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर गती मिळाली. 

कौटुंबिक पार्श्वभूमी 
शहनाज यांचा एका अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात ५ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्म  झाला. त्यांचे वडील नासिर उल्लाह बेग हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. तर आई सईदा बेगम या हैदराबाद सैन्याच्या कमांडर-इन-चीफच्या कन्या होत्या. तर, शहनाजचे आजोबा न्यायमूर्ती समिउल्ला बेग हे एकेकाळी हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

शैक्षणिक पार्श्वभूमी 
शहनाज यांचे प्रारंभिक शिक्षण हैदराबाद येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट इंटर कॉलेज येथून पूर्ण झाले. पती नासिर हुसेन तेहरानमध्ये तैनात असताना त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला व पुढे वडिलांच्या मदतीने न्यू यॉर्कमधील मॅडम हेलेना रुबिनस्टाईनच्या ब्युटी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. येथून सौंदर्य तंत्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये कॉस्मेटिक थेरपी आणि कॉस्मेटोलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 
 
वैवाहिक जीवन 
वयाच्या १४ व्या वर्षी शहनाज यांचे न्यायमूर्ती नासिर हुसेन यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्या काही महिन्यानंतर नासिर यांची इराणमध्ये पोस्टिंग झाली. लग्नाच्या दोन वर्षानंतर म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी शहनाज आई बनल्या. त्यांना समीर हुसेन आणि नेलोफर हुसेन ही दोन मुले झाली. वैवाहिक जीवन अगदी सुखात सुरु असताना त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला जेव्हा त्या पूर्णपणे ब्लँक झाल्या. त्यांच्या आयुष्याचा उद्देश काय आहे, हेच जणू त्यांना कळत नहोते. त्याच क्षणी त्यांनी सौंदर्यप्रसाधने या क्षेत्रात व्यवसाय करायचे ठरवले. 

पुढे १९९९ मध्ये शहनाजच्या पतीचे म्हणजे नासिर हुसेन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शहनाजसाठी हा एक हृदयद्रावक क्षण होता, परंतु त्या कोसळल्या नाही. व्यवसायावर आणि मुलांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. परंतु काळाने त्यांचा परत एकदा घात केला. २००८ साली त्यांच्या मुलाने, समीर हुसेनने पटना येथे आत्महत्या केली. समीर हा व्यवसायाने रॅपर होता. 

पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर काही वर्षांनी शहनाज यांनी प्रेमाला आणखी एक संधी द्यायचे ठरवले. उद्योजक राज कुमार पुरी उर्फ आरके पुरी आणि शहनाज यांचे प्रेम जुडले. पुढे त्या दोघांनी लग्नही केले. मात्र, शहनाजच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नहोते. पण, शहनाजने आपला स्वतंत्र मार्ग निवडला. 
 
आणि असे सुरु झाले पहिले हर्बल क्लिनिक 
शहनाजने भारतात परतल्यानंतर नवी दिल्लीतील त्यांच्या घरी १९७१ मध्ये पहिले कॉस्मेटिक फर्म उघडले. पुढच्या काही वर्षांत त्यांनी 'द शहनाज हुसेन ग्रुप'ची स्थापना केली. पुढे त्यांची सौंदर्य उत्पादने जगातील अनेक देशांमध्ये विकली जाऊ लागली. त्यांची उत्पादने नैसर्गिक घटकांसाठी ओळखली जावू लागली. ते बनवताना कोणत्याही प्रकारचे रसायने त्या वापरत नसत. हाच त्यांच्या उत्पादनांचा यूएसपी बनला. 

सौम्य आणि मृदुभाषी शहनाजच्या जेव्हा लक्षात आले कि संरक्षणात्मक, प्रतिबंधात्मक आणि अगदी सुधारात्मक कॉस्मेटिक-केअरसाठी भारतीय आयुर्वेद उपयुक्त ठरू शकते तेव्हा त्यांचा निसर्गावरील विश्वास दृढ झाला.  

‘शहनाज हुसेन ग्रुप’ हे एका तरुण महिला उद्योजकाचे स्वप्न म्हणून सुरू झालेले आज कॉस्मेटिक केअर क्षेत्रातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे. आज, जवळपास १३८ देशांमध्ये शहनाज ग्रुपचे ४०० पेक्षा जास्त शहनाज हुसेन फॉरएव्हर ब्युटीफुल लाइफस्टाइल शॉप्स, ब्युटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, फ्रेंचाइज्ड क्लिनिक्स, दुकाने, शाळा आणि आयुर्वेदिक स्पा आहेत. ज्या वेळी इंटरनेट प्रचलित नव्हते त्यावेळी घरच्या घरी एक लहान व्यवसाय म्हणून सुरू झालेला हा आयुर्वेद क्षेत्रातील व्यवसाय जगभरात एक मोठा ब्रँड बनला आहे.

या उत्साही महिलेने अलीकडेच लंडनमधील फिंचले आणि मिडलसेक्स येथे आणखी दोन फ्रँचायझी सलून तसेच हार्ले स्ट्रीटवर शहनाज आयुर्वेद सौंदर्याचे क्लिनिक उघडून यूकेमध्येही आपले काम वाढविले आहे. तसेच कंपनीने सौदी अरेबिया, इस्रायल, म्यानमार आणि बांगलादेशमध्येही प्रवेश केला आहे. 

सामाजिक जाणीवा 
आपल्या कारकिर्दीत, नियमित स्तंभलेखन आणि पुस्तकांच्या माध्यमातून शहनाजने शरीरावर परिणाम करणाऱ्या रासायनिक उपचारांच्या धोक्यांबद्दल जनजागृती केली. त्यांची कारकीर्द म्हणजे त्यांनी आपल्या कल्पनांना वास्तवात केलेले रूपांतरण आहे. आपल्या मूल्यांवर आणि अद्वितीय तत्त्वज्ञानावर आधारित त्या जीवन जगत आहेत. 

CSR उपक्रमांचा भाग म्हणून त्यांनी तयार केलेली केमोलिन उत्पादने कर्करोग रुग्णालयांना मोफत दिली जातात. शहनाजने आतापर्यंत अनेक गृहिणींना स्वतःच्या घरात सलून उघडण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. तसेच, आर्थिक स्वातंत्र्य मिळवून त्यांना करिअर करण्याची संधी दिली आहे. त्यांनी शारीरिकदृष्ट्या विकलांगांना तसेच अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांना मोफत सौंदर्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे.

विविध देशांच्या अभ्यासक्रमात समावेश   
जाहिरातींच्या माध्यमातून उत्पादनाची मागणी टिकून राहते हे माहित असूनही शहनाज व्यावसायिक जाहिरातींवर कधीच विसंबून राहिल्या नाहीत. ब्रँडची एक वेगळी वाट तयार करण्याची त्यांच्यात क्षमता होती. आज शहनाज हुसेनची ब्रँड निर्मितीसाठी हार्वर्डमध्ये केस स्टडी केली जाते. तसेच विविध देशांमध्ये ‘शहनाज हुसेन ग्रुप’चा ‘इमर्जिंग मार्केट्स’ या विषयात अभ्यास केला जातो. 

जागतिक स्तरावर दिलीयेत भाषणे 
हार्वर्ड बिझनेस स्कूलने कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीशिवाय ब्रँड कसा स्थापित करायचा, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी शहनाज यांना आमंत्रित केले होते. शहनाजने ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एमआयटी येथे व्याख्याने दिली आहेत. ब्रिटीश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ब्रँड इंडिया आणि आयुर्वेदावरही त्यांनी भाषणे केली आहेत. जानेवारी २०२० मध्ये लंडन येथील इंडिया हाऊस येथे आयोजित आयुर्वेद परिषदेतही त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर COSMEXPO हे सौंदर्य क्षेत्रातील सर्वात मोठे जागतिक कार्यक्रम २००९ मध्ये इटली येथे आयोजित केले होते. शहनाज त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.  

पुरस्कार
केंब्रिजच्या इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटरचा ‘लिओनार्डो द विंसी डायमंड अवॉर्ड’  
यूएसस्थित बिझनेस मॅगझिनचा ‘जगातील महान महिला उद्योजक पुरस्कार’
स्पेनमधील ‘आर्क ऑफ युरोप इंटरनॅशनल गोल्ड स्टार’ 
लंडनचा ‘पायनियरिंग आयुर्वेद वर्ल्डवाइड पुरस्कार’ 
लंडनमधील ‘उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार’
कॅलिफोर्नियाचा ‘वुमन ऑफ द इयर पुरस्कार’
पॅरिसचा ‘WQC इंटरनॅशनल स्टार अवॉर्ड’
न्यूयॉर्कमधील ‘गोल्डन अमेरिका अवॉर्ड’
ब्रिटिश संसदेतील ‘उत्कृष्टता पुरस्कार’ 
भारत सरकारचा ‘पद्मश्री पुरस्कार’ 
‘वुमन ऑफ द मिलेनियम अवॉर्ड’
‘क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड’

आता त्यांची मुलगी निलोफर त्यांचा वारसा पुढे नेत आहे. मुलीने शहनाज हुसेन यांचे 'फ्लेम' हे आत्मचरित्रही लिहिले आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या मुस्लीम महिला उद्योजिकांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 मिरजची निलोफर झाली सेलिब्रिटी फॅशन डिझायनर

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube