प्रज्ञा शिंदे
'केसरिया बालम आओ सा, पधारो म्हारे देश'
राजस्थानच्या मातीत रुजलेल गाण - केसरिया बालम. केवळ ओळख नाही तर राजस्थानच्या संस्कृतीच प्रतीक आहे. राजस्थानाची हीच संस्कृती सातासमुद्रापार पोहचवण्याच काम कोणी केल असेल तर त्या आहेत बेगम बतूल. बतूल यांच्या गोड गळ्यामुळे आणि गायनातील कसबीमुळे ‘बलम केसरिया तब होता है, जब उसे बेगम बतूल गाती हैं!’ अस म्हटल तरी वावग ठरणार नाही.
भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये राजस्थानच्या प्रसिद्ध लोकगायिका बेगम बतूल यांचाही समावेश आहे. बेगम बतूल सांगतात, "माझे मन भजनांमध्ये गुंतल होत, त्यामुळे मी भजन गात राहिले. पण लोक म्हणायचे, 'मंदिरात का जातेस?' पण मी कोणाचं काहीही ऐकलं नाही आणि भजन गात राहिले."
आपल्या अद्वितीय गायकीतून सांप्रदायिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या आणि समाजातील धर्म अन् स्त्रीत्वच्या अनिष्ट चौकटी मोडणाऱ्या, रूढीवादाला तिलांजली देणाऱ्या या कलाकाराला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
संघर्षातून संगीताचा प्रवास
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील केराप गावात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बेगम बतूल यांचा सांगीतिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मिरासी समाजात जन्मलेल्या बतूल यांनी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक बंधनांना झुगारून आपली संगीतप्रेमाची वाट चालली. त्या मिरासी समाजातून येतात, जो समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला समजला जातो. त्यांच्या कुटुंबाकडे सुखकर जीवन जगण्यासाठी फार साधनसंपत्ती ही नव्हती. तरीही अत्यंत लहान वयातच त्यांनी संगीताची आवड जोपासली आणि अवघ्या आठव्या वर्षी भजनगायनास सुरुवात केली.
एका मुस्लिम कुटुंबातील असल्याने, राम आणि गणपतीसारख्या हिंदू देवतांप्रती भक्तीभावाने भजन गाणे यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला. मात्र संगीताला जात- धर्म नसतो अस म्हणत त्यांनी दोन्ही धर्मामध्ये सलोख्याच नात गुंफल. एवढंच नव्हे, तर त्यांनी कट्टरपंथालाही एक प्रकारे आव्हान दिल.
"मांड गाणं सोपं काम नाही. अशा गाण्यांना गाताना अनेक अडचणी येतात. ही कला शिकणाऱ्यांना यातील आव्हाने माहित असतात. मी इतरांना ऐकून गायन शिकले. मला गाण्याची खूप आवड आहे. एक दिवस जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण मी गाणं गायचं चुकवत नाही," असे बेगम बतूल म्हणाल्या.
राजस्थानी मांड गायन
राजस्थानची समृद्ध लोकसंगीत परंपरा अनेक शैलींनी नटलेली आहे, त्यातील एक प्रमुख शैली म्हणजे मांड गायन. मांड हे राजस्थानी लोकसंगीतातील एक पारंपरिक आणि प्रतिष्ठित प्रकार आहे, जो प्रामुख्याने राजस्थानी लोककथा, निसर्ग, प्रेम, वीरश्री आणि भक्तीभाव यांना साजेसा असतो.
मांड गायनात सुरांचे एक अनोखे मिश्रण असते, जे मनाला भारावून टाकते. या गायनप्रकारात प्रेम, शौर्य आणि भक्ती यांचा सुंदर संगम आढळतो. अनेक गाणी ऐतिहासिक वीरगाथा आणि राजस्थानी संस्कृतीचा महिमा गाणारी असतात. मांड गायकांना कठीण स्वर आणि लय सांभाळण्याचे कसब साधावे लागते, त्यामुळे ही कला सहजगत्या आत्मसात करता येत नाही.
राजस्थानातील अनेक प्रसिद्ध लोकगायकांनी मांड गायनाच्या माध्यमातून या परंपरेला पुढे नेले आहे. बेगम बतूल यांसारख्या गायकांनी या शैलीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. आजच्या काळात मांड गायन लोप पावत चालले आहे, मात्र काही समर्पित कलाकार आणि संस्थांच्या प्रयत्नांमुळे ते जिवंत राहिले आहे. हे गायन केवळ मनोरंजनाचे साधन नसून, राजस्थानच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे.
'भजनांची बेगम' – एक अनोखी ओळख
मुस्लिम असूनही भजनगायनाचा वारसा जपणाऱ्या बतूल यांना 'भजनांची बेगम' असे विशेषण लाभले. संगीताच्या प्रेमामुळे त्यांनी धार्मिक आणि सामाजिक अडथळ्यांची पर्वा केली नाही. अवघ्या सोळाव्या वर्षी विवाहबद्ध झाल्यानंतरही त्यांनी आपली कला जपली. पती फिरोज खान हे राजस्थान राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. तीन मुलांचे पालनपोषण सांभाळतानाही बतूल यांनी संगीत साधनेत खंड पडू दिला नाही.
परंपरागत संगीताचा वारसा
राजस्थानच्या मांड गायन परंपरेतील श्रेष्ठ गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. मांड गायन, भजन आणि लोकगीतांबरोबरच त्यांनी ढोल, ढोलक आणि तबला वादनही आत्मसात केले. संगीताच्या या निष्ठेमुळे त्यांना केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली. त्यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ट्युनिशिया, इटली, स्वित्झर्लंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये आपल्या गायकीचा जादूई प्रभाव पसरवला आहे.
'बॉलिवूड क्लेझमर' आणि सांस्कृतिक एकात्मता
संगीत हे धर्म आणि संस्कृतींच्या सीमा ओलांडते, हे बेगम बतूल यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. 'बॉलिवूड क्लेझमर' या आंतरराष्ट्रीय फ्युजन म्युझिक बँडचा भाग बनून त्यांनी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी सांप्रदायिक सलोख्याचा संदेश दिला आणि विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणून उभ्या राहिल्या.
जगभरातून मिळालेले सन्मान
बतूल बेगम यांना २०२१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय अनेक परदेशी सरकारे आणि संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.फ्रान्स आणि ट्युनिशियाच्या सरकारांनीही त्यांच्या कलेचा सन्मान केला आहे. संगीताच्या माध्यमातून त्यांनी मानवतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या गायकीने धर्म, जात आणि संस्कृतीच्या चौकटी मोडून एकसंध समाजाची संकल्पना बळकट केली आहे.
संगीतातून स्त्रीशक्तीचा जागर
बेगम बतूल केवळ एक प्रतिभावान गायिका नाहीत, तर त्या स्त्रीशिक्षण आणि महिलासक्षमीकरणाच्या पुरस्कर्त्या देखील आहेत. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीतून सामाजिक ऐक्य आणि सलोखा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. त्यांची जीवनगाथा संघर्ष, समर्पण आणि यशाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत आपली कला जपली आणि तिच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवले.
पद्मश्री पुरस्काराने गौरव
बेगम बतूल यांच्या सांगीतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या सन्मानामुळे पारंपरिक संगीत जतन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा नमस्कार! आणि पद्मश्री पुरस्काराने आम्हाला सन्मानित केले ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पारंपरिक लोकसंगीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ही परंपरा टिकवून ठेवणे आपली जबाबदारी आहे. हा पुरस्कार या संगीताच्या जतनासाठी मोठी मदत करेल."
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संगीताचा नावलौकिक
जयपूरच्या या प्रसिद्ध गायिकेने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर आपल्या गायकीने रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये हिंदू भजने आणि मुस्लिम मांड यांचे सुंदर मिश्रण असते, जे सांप्रदायिक ऐक्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश देणारे ठरते. त्यांच्या संगीताने अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आहेत.
संगीताचा साधना व सांस्कृतिक वारसा
मांड गायन ही राजस्थानची एक पारंपरिक संगीत कला आहे. मात्र, या कलेला पुढे नेणे सोपे नाही. त्याबाबत सांगताना बेगम बतूल म्हणतात, "मांड गायन करणे सहजसोपे नाही. त्यात अनेक अडचणी असतात. जे ही कला शिकतात, त्यांनाच त्याचे आव्हान कळते. मी इतरांकडून ऐकून गाणे शिकले. माझे गाणे ही माझ्यासाठी साधना आहे. एक दिवस जेवण न मिळाले तरी चालेल, पण मी गाणे गाणे थांबवू शकत नाही."
२०२५ साठी पद्म पुरस्कार विजेते
या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. एकूण १३९ व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला आहे. यामध्ये ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. दिवंगत लोकगायिका शारदा सिन्हा, सुझुकी मोटरचे माजी सीईओ ओसामू सुझुकी यांना पद्मविभूषणने गौरवण्यात आले आहे. कुमुदिनी लक्ष्मीकांत लखिया (कथक नृत्यांगना), लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (ज्येष्ठ व्हायोलिनवादक) यांना देखील पद्मविभूषण मिळाले आहे. प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्यात आला आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये बेगम बतूल, प्रख्यात गायक अरिजित सिंग, हास्य कलाकार अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचाही समावेश आहे.
संस्कार, संगीत आणि सामाजिक एकता
बेगम बतूल यांनी आपल्या गायकीतून सामाजिक एकात्मतेचा विचार रुजवला आहे. त्यांनी संगीताला फक्त करमणुकीचे साधन न ठेवता, ते समाजसुधारणेचे एक प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या सुरांनी हजारो मनं जिंकली आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रेरणा दिली.
पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव झाला असला तरी, त्यांच्या सुरांचा खरा सन्मान लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी राहील!