जगभरातील विविध भाषा आणि संस्कृती यांचा भारतात संगम झालेला आहे आणि तरीही विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रतीक आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच आसाममध्येही हे वैविध्य पाहायला मिळते. धार्मिक सौहार्द, बंधुत्व आणि ऐक्याचा अनोखा वारसा लाभलेल्या या राज्यातील एक मुस्लिम मुलगी सौहार्द आणि एकतेचे अप्रतिम उदाहरण बनली आहे.
मुस्लीम कुटुंबात जन्मलेली पण वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी संस्कृत या भाषेवर प्रभुत्व मिळवत गीतेतील श्लोक स्पष्टपणे आणि सुंदरपणे उच्चारणारी, सोबतच कुराणातील सूरा व कलिमाही तोंडपाठ असणारी ही चिमुकली आहे आसामची आलिया नसरीन रहमान. आलिया ही नलबारी जिल्ह्यातील शांतिपूर येथील रहिवासी आहे.
आलियाचे कौशल्य आणि पालकांचे योगदान
मोकिबुर रहमान आणि पापरी बेगम यांची कन्या आलिया, संस्कृत श्लोकांसोबतच अरबी भाषेतील दुवाही अगदी अस्खलितपणे उच्चारते. याशिवाय ती नृत्य, गायन आणि चित्रकलेतही प्रवीण आहे.
आलियाच्या गीतापठणाविषयी वडील मोकिबुर रहमान सांगतात, “आपण सर्वांनी सर्व धर्मांचा आणि संस्कृतींचा आदर केला पाहिजे. सहिष्णू व्हायला हवे. आपल्याला प्रत्येक धर्माबद्दल माहिती असायला हवी. माझ्या मुलीला गीतेतील श्लोक शिकवण्यामागे माझा हाच हेतू होता.”
ते पुढे म्हणतात, “नव्या गोष्टी शिकण्याबाबत मुलांवर बंधने घालू नयेत. शाळेत शिकवलेल्या गीतेतील श्लोकांचा मी घरी सराव करू घेतो आणि स्वतःही शिकवतो. मुस्लिम असल्यामुळे आपसूकच कुराणाचे शिक्षणही मी तिला देतो. ती मौलवींकडून अरबी शिकते आणि घरी माझ्यासोबत नमाजही अदा करते.”
आलियाने विविध कलांमध्ये मिळवलेय नैपुण्य
आलियाच्या आवडीविषयी सांगताना मोकिबुर रहमान म्हणतात, “आलिया सध्या मौलवींकडून कलिमा, नमाज, रोजा आणि इतर धार्मिक धडे घेत आहे. भविष्यात मी तिला सर्व धर्मांबद्दल माहिती देण्याचा विचार करत आहे. नृत्यातही तिला विशेष आवड आहे. लहानपणापासून ती गाण्याच्या तालावर ताल धरत असे. शाळेतील विविध कार्यक्रमांमध्ये तिने नृत्य सादर केले आहे. यावर्षीच मी तिला डान्स क्लासला टाकले आहे. आता तिथून ती नृत्याचे अधिकृत प्रशिक्षणही घेणार आहे.”
समाजातून प्रतिक्रिया
आलियाला गीतेच्या श्लोकांच्या सादरीकरण करताना पाहून हिंदू समाजातील अनेकजण प्रभावित झाले आहेत. तिच्या ओळखीच्या मुस्लिम समाजातून मात्र संमिश्र प्रतिक्रिया आली. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी टीकाही केली. याविषयी मोकिबुर रहमान म्हणतात, “माझ्या मुलीच्या कौशल्यांचे कौतुक होत असते, तेव्हा खूप आनंद होतो. मुस्लिम समाजातील काही व्यक्तींकडून तिच्यावर टीकाही झाली. तर अनेकांनी कौतुकही केले. टीका करणाऱ्यांच्या अज्ञानाला दूर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी प्रेमाने आणि एकोप्याने राहायला हवे.”
आलियालाने आणि तिच्या पालकांनी समाजापुढे ठेवला नवा आदर्श
आलिया नसरीनने विविधस्पर्धांमध्ये सहभाग घेत यश मिळवले आहे. तिची यशाची परंपरा यापुढे ही सुरु राहणार आहे. नुकतेच तिला नलबारी जिल्ह्यातील बिहानपूरच्या काझीपारा क्लबकडून ‘शिल्पी साधना’ पुरस्कार देण्यात आला. इतक्या लहान वयातच तिने विविध कलांमध्ये मिळवलेले प्राविण्य आणि तिच्या यशासाठी तिने आणि तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. तिच्या पालकांनी तिला केवळ शिक्षण देण्याटच धन्यता मानली नाही, तर भाषा, संस्कृती, धर्म, आणि एकोप्याचे धडे देऊन एक सच्चा माणूसही घडवला आहे.
- आरीफुल इस्लाम, गुवाहाटी