महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यात काहींच्या पदरी यश येतं, तर अनेकांना अपयशही सहन करावे लागते. मात्र तरीही ते खचत नाहीत. तर या अपयशाला यशाची पहिली पायरी बनवतात आणि मोठ्या जिद्दीने आणि प्रामाणिक कष्टाने ते यशाला गवसणी घालतात. अशाच विद्यार्थ्यांपैकी एक नाव म्हणजे अकलूजमधील शंकरनगरची अन्न सुरक्षा अधिकारी बनलेली साजिदा अब्दुल रशीद मुल्ला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आहे. या परीक्षेत साजिदाने यश मिळवले आहे. यामुळे तिचे आणि कुटुंबियांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
साजिदाच्या यशाबद्दल बोलताना वडील अब्दुल रशीद मुल्ला म्हणतात, "साजिदा पूर्वीपासून अभ्यासात हुशार होती. काहीतरी करून दाखवण्याची तिच्यात जिद्द होती. स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवल्यानंतर तिने अतिशय जिद्दीने आणि सातत्य ठेवून अभ्यास केला. तिने कोणत्याही अकॅडमीविना हे यश मिळवलं आहे. याचा एक वडील म्हणून मला आणि कुटुंबाला खूप अभिमान वाटतो."
साजिदाला दिलेल्या पाठिंब्याविषयी ते म्हणतात, "मला पाच मुली आहेत. त्यातली साजिदा सर्वात लहान. मी आधी पोस्टमनची नोकरी करायचो. परंतु तिसऱ्या मुलीच्या लग्नावेळी मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी साजिदा आणि तिच्या मोठ्या बहिणीच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत. मुलींनी शिक्षण घ्यावं मोठं व्हावं असं वडील म्हणून मला नेहमी वाटायचं. शिक्षणासाठी मी त्यांना नेहमी प्रोत्साहित करायचो. माझ्या सर्व मुली शिकलेल्या आहेत. मुलींनी शिकलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते. "
साजिदाचे कुटुंब आणि सुरुवातीचा प्रवास
साजिदा आपल्या कुटुंबाविषयी माहिती देताना म्हणते, "माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आम्ही पाच बहिणी आहोत. माझे वडील पोस्टमन म्हणून काम करत होते त्यानंतर ते पोस्ट मास्तर झाले. त्यांनी राजीनामा दिला आहे. ते घरी असतात. आई घर काम करते. वडील पोस्टमन असल्यामुळे त्यांच्या बदल्या होत असत. वडिलांची बदली झाली की आम्हाला दुसऱ्या गावी जावे लागायचे.”
पुढे ती म्हणते, “माझे चौथीपर्यंतचे शिक्षण माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळेत झाले. त्यानंतर अकलूजमधील यशवंतनगर येथे वडिलांची बदली झाली. मग पाचवीपासून दहावीपर्यंत शिक्षण लक्ष्मीबाई कन्या शाळेत झाले. पाचवीपासून माझा शाळेत पहिला नंबर यायचा. दहावी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मी माळशिरस तालुक्यातीलच सदाशिवराव माने महाविद्यालयात प्रवेश घेतला. मला अकरावी आणि बारावीमध्ये देखील चांगले मार्क मिळाले. यामुळे मी हुशार होते असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मला बीएचएमएससाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी मी NEETची परीक्षा दिली. तिथेही मला मार्क मिळाले परंतु मला बीएचएमएस साठी ऍडमिशन घेता आली नाही."
महाविद्यालयातूनच मिळाली अधिकारी होण्याची प्रेरणा
कोणतेही ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक कष्ट, मेहनत आणि सातत्य महत्त्वाचं असतं. परंतु आपल्या ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यामागे आपल्याला कोणाची तरी प्रेरणा मिळालेली असते. साजिदा अधिकारी बनवण्याच्या प्रेरणेविषयी सांगताना म्हणते, "बीएचएमएसमध्ये मला ऍडमिशन मिळाले नव्हते. दुसऱ्या कोर्ससाठी ऍडमिशन घेणं गरजेचं होतं. माझ्या एका भावाने बीएससी ऍग्री केली होती. त्यानंतर तो कृषी अधिकारी झाला. त्याकडे बघून मी देखील बीएससी ऍग्री करण्याचा ठरवलं. बारावीला चांगली टक्केवारी होती त्यामुळे ॲग्री कॉलेजला लगेच ऍडमिशन मिळाले. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण याच महाविद्यालयात पूर्ण केले. मग पुन्हा राहुरीतील विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन साठी प्रवेश घेतला."
ती पुढे म्हणते, "आमच्या विद्यापीठात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध आहे. या ठिकाणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. विद्यापीठातून शिक्षण घेऊन अधिकारी झालेले सर्वजण त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. तिथे लेक्चर देखील घेतले जातात. या अधिकाऱ्यांकडे बघून आणि माझ्या भावाकडे बघूनच मला अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली."
स्पर्धा परीक्षांची तयारी
आज पुणे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात देखील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. साजिदा तिच्या तयारीविषयी बोलताना म्हणते, "विद्यापीठात प्रवेश मिळवल्यानंतर २०२१मध्ये मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा Plan B स्ट्रॉंग ठेवायला हवा अस मी ऐकलं होत. त्यामुळे माझा Plan B स्ट्रॉंग हवा असं मला नेहमी वाटायचं. म्हणून मी विद्यापीठात राहून पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोबत केला. दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळी हाताळणे अवघड होतं. पण स्पर्धा परीक्षेत काहीच नाही झालं तर MSCपूर्ण करून जॉब करायचे मी ठरवले होते."
साजिदा अभ्यास करताना आलेल्या अडचणींविषयी बोलताना म्हणते, “मला पीसीओडीचा त्रास आहे. दोन्ही विषयांचा अभ्यास करत असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायचा.”
पुढे ती म्हणते, “घरातदेखील काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. माझ्या आईला मेंदूत गाठ असल्याचे निदान झालं होतं. त्यानंतर मला अपयश देखील आलं. मी ॲग्री एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये मी प्रीलियम कॉलीफाय झाले होते. त्यानंतर मेन्स दिली होती. परंतु त्यावेळी मला पॉईंट पंचवीस मार्क्स कमी असल्याने मी मुलाखत देऊ शकले नाही. माझ्या सर्व मैत्रिणी त्यामध्ये पास झाले होत्या. या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत गेल्या. त्यामुळे खूप टेन्शन यायचं. परंतु मला स्वतःला स्थिर राहायचं होतं. अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. तेच मी केलं आणि पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली.”
आणि साजिद यशस्वी झाली
साजिदाने २०२१मध्ये पहिल्यांदा एमपीएससीची परीक्षा दिली होती. तिने पहिल्याच प्रयत्नात प्रीलियम आणि मेन्स एक्झाम क्लियर केली होती. तिने सांगितल्याप्रमाणे पॉइंट पंचवीस मार्क कमी असल्याने तिला इंटरव्यू देता आला नाही. यामुळे तिने पुन्हा २०२२मध्ये परीक्षा देण्याचे ठरवले. तिने परीक्षा देखील दिली परंतु त्यावेळी मी प्रीलियम पास होऊ शकले नाही. मग २०२३ला तिने अन्नसुरक्षा विभागासाठी घेण्यात येणारी परीक्षा दिली. या परीक्षेत ती पास झाली आहे. आता साजिदा अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणार आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवाचा सल्ला
अपयशातून बाहेर निघण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील असे विचारले असता साजिदा म्हणते, "स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच प्लॅन बी स्ट्रॉंग ठेवायला हवा. त्यानुसार त्यांनी अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वजण सल्ले देत असतात. विद्यार्थ्यांनी त्याकडे न बघता अधिकारी झालेल्या व्यक्तींकडूनच मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसा अभ्यास केला पाहिजे.”
पुढे ती म्हणते, “ही परीक्षा देणारे विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतात. तस न करता त्यांनी किती वर्ष स्पर्धा परीक्षेला दिली पाहिजे हे ठरवलं पाहिजे अस मला वाटतं. अपयश येत असतं त्यावर आपण चिंतन केले पाहिजे. मोघम अभ्यास न करता स्मार्ट स्टडी केला पाहिजे. यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास करता येतो. याचा आपल्याल फायदा देखील होतो.”