कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली, तर आकाशालाही गवसणी घालता येते. याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील रिक्षा चालकाची कन्या आयशा अन्सारी हिने आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या आयशाने आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही फक्त मेहनतीच्या जोरावर मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भरघोस यश संपादन केले आहे.
नुकताच मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने (एमपीपीएससी) राज्य सेवा परीक्षा २०२२चा निकाल जाहीर केला. रेवा येथील आयशा अन्सारी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिला १२वी रॅंक मिळाली आहे. दोनदा अपयश येऊनही हार न मानता आयशाने तिसऱ्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अपयशामुळे हार न मानता, जिद्दीने वाटेतील अडथळे दूर करायला हवेत. ध्येयपूर्तीच्या दिशेने विनाखंड वाटचाल चालू ठेवायला हवी, अशी प्रेरणा आयशा अन्सारीने मिळवलेल्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आयशाचा जन्म मध्य प्रदेशातील रेवा या गावी झाली. तिचे वडील मुस्लिम अन्सारी हे रिक्षाचालक आहेत. तर आई रुक्साना अन्सारी या गृहिणी आहेत. आपल्या कुटुंबात कोणीतरी प्रशासकीय अधिकारी व्हावे, अशी आयशाच्या वडिलांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा आयशाने पूर्ण केली. आयशाला तिची कठोर मेहनत आणि आई-वडिलांच्या पाठींब्यामुळे यश मिळाल्याचे ती म्हणते. आर्थिक अडचणी असूनही तिच्या वडिलांनी कधीही त्याच्या अभ्यासात अडथळा येऊ दिला नाही, असे ती सांगते.
आयशाला मिळालेल्या यशानंतर तिचे वडील मुस्लीम अन्सारी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आयशा अतिशय आशावादी मुलगी आहे. तिच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात असली पाहिजे, जी आपल्या पालकांसोबतच आपल्या शहराला आणि राज्याला अभिमान व्हावा अशी कामगिरी करेल.”
ते पुढे म्हणाले, “ते कष्ट आमचे नव्हते, ते सर्व आयशाचे होते, आम्ही तिच्यासाठी जास्त काहीच केले नाही. तिनेही आमच्याकडे कधी काही मागितले नाही, कधी कसला आग्रह धरला नाही. मला एवढंच सांगायचंय की, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शिकणार असेल तर त्यांना नक्कीच अभ्यास करू द्या, कारण मेहनत एक दिवस नक्कीच फळ देणार आहे.”
आयशाचे प्राथमिक शिक्षण
आयशाने स्पर्धापरीक्षेचे संपूर्ण शिक्षण स्वयंअध्ययनातून केले. तिने आपले प्राथमिक शिक्षण एका खाजगी शाळेतून पूर्ण केले आणि सरकारी कन्या शाळेतून १२वी पर्यंत शिक्षण घेतले. रीवा येथील आदर्श विज्ञान महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने स्पर्धापरीक्षेचा अभ्यास सुरु केला. विशेष म्हणजे तिने कोणत्याही क्लासेस अथवा अॅकडमी शिवाय हा अभ्यास केला.
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास सुरु केल्यावर आयशा सुरुवातीला १२-१३ तास अभ्यास करायची. परंतु, अभ्यासाची गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते हे समजल्यावर तिने अभ्यासाची वेळ कमी करून ६-७ तास केली. कमी वेळात अधिक प्रभावी अभ्यासावर तिने लक्ष केंद्रित केले. पहिल्या प्रयत्नात कोणताही निकाल लागला नाही, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं नाही, परंतु तिसऱ्यांदा मात्र तिने मोठी झेप घेत ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
एमपीपीएससी परीक्षा २०२२ टॉप १० मध्ये मुलींचे वर्चस्व
मध्य प्रदेश लोकसेवा आयोग २०२२ या परीक्षेत एकूण ३९४ पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या निकालात मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. टॉप १० मध्ये ६ मुली आहेत. आयशा अन्सारी, दीपिका पाटीदार, सुरभी जैन, महिमा चौधरी, शानू चौधरी आणि कविता देवी यादव यांचा समावेश आहे.
या निकालात आयशाला एकूण १५७५ पैकी ८७६.५० गुण मिळाले आहेत. मुख्य परीक्षेत तिला १४०० पैकी ७५९.५० तर मुलाखतीत १७५ पैकी ११७ गुण मिळाले आहेत. आयशाला मिळालेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मुलींची प्रेरणा आहे ज्या मुली मोठी स्वप्ने पाहतात.
आयशाला मिळालेल्या यशाचे श्रेय तिने आपल्या घरच्यांना दिले. भावूक स्वरात ती म्हणते, “माझ्या आई-वडिलांनी नेहमीच माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. मुलींना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, असे ते म्हणायचे. त्यांच्या याच विचाराने मी उपजिल्हाधिकारी झाले. परीक्षेच्या काळात माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, परंतु त्यांनी मला कधीच ही गोष्ट भासवू दिली नाही, आणि त्या गोष्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ दिला नाही.”
ती पुढे म्हणते, “माझे वडील हे माझे सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. मॉर्निंग वॉक करताना ते अधिका-यांचे बंगले बघायचे आणि नेहमी म्हणायचे की माझ्या घरीही एखादा अधिकारी असावा. त्यांची ही गोष्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. मी माझ्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी वडिलांच्या रिक्षामध्ये गेले होते. कारण मला तिथूनच प्रेरणा मिळाली आहे.”
स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या इतर मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना प्रेरित करताना आयशा म्हणते,“लहान शहरं किंवा खेडेगावांमध्ये मुलींना केवळ घरकामांपुरतेच मर्यादित मानले जाते, परंतु माझ्या पालकांनी मला अभ्यासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मुलींना शिक्षण व संधी मिळाल्यास त्या मोठे यश संपादन करू शकतात,” असे ती पुढे म्हणते.
महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना आयशा म्हणते, “केवळ मुस्लीम समाजातच नाही तर, इतर समाजामध्ये देखील महिला शिक्षणाच्या बाबतीत तेवढ्या आग्रही नसतात. तर त्या महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते की शिक्षणातूनचं आपला उद्धार होऊ शकतो. आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षण हेच मोठे शस्त्र आहे त्यामुळेच समाजाचा विकास होऊ शकतो.
ती पुढे म्हणते, “महिलांनी चूल आणि मुल या आवाक्याच्या बाहेर पडले पाहिजे. मुलींच्या कुटुंबाने सुद्धा त्यांना या संधी दिल्या पाहिजेत. विशेषतः मुलींनी शिक्षणाच्या बाबतीत सीमा तोडून पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो, परंतु न घाबरता तुम्ही शिक्षणाचा हक्क बजावला पाहिजे.”
शेवटी बोलताना आयशा म्हणते, “अपयशाला कधीही शेवट समजू नये, कारण यशाचा मार्ग हा अपयशातून जातो. कठोर परिश्रम आणि समर्पणाने केलेले प्रयत्न नेहमीच फळ देतात. माझे यश हे त्याचे उदाहरण आहे.”
आपल्या मुलांना यश मिळाल्यानंतर पालकांची मान उंचावते. गरिबीशी झुंज देऊन मुलाने आपले स्वप्न साकार केलेले असते त्यांना विशेष अभिमान वाटत असतो. आयशा अन्सारी ही एक अशीच तरुणी आहे जिने कलेक्टर होऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन बदलवून टाकले आहे. तिची यशोगाथा प्रत्येकाला कठीण परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करते.