महाराष्ट्राच्या निवडणुकीत 'महायुती'चा अभूतपूर्व विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 h ago
'महायुती'चा अभूतपूर्व विजय
'महायुती'चा अभूतपूर्व विजय

 

महाराष्ट्रातील निवडणुक निकालांचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीने न भुतो न भविष्यती यश मिळवले आहे. राज्यातील सर्व निकाल अजून हाती आले नसले तरी आता फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. 

२० नोव्हेंबरला मतदान पार पडल्यानंतर सर्वच नामांकित संस्था, वृत्तवाहिन्या, राजकीय कार्यकर्ते आणि स्वतः उमेदवार राज्यात सरकार कुणाचे येणार याविषयी सर्वांनीच 'निवडणूक चुरशीची होणार' असा अंदाज वर्तवला होता. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनीही यंदा भाजपच्या जागा ९०च्या आसपास विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र सगळ्यांचेच अंदाज सपशेल चुकवत महायुती आणि विशेषता शंभरी पार करणाऱ्या भाजपने निवडणूकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवलय.

'म्हातार जिकड फिरतय तिकड चांगभल होतय'यांसारखी वाक्ये सोशल मीडियावर मोठी लोकप्रिय ठरत होती. शरद पवार यावेळी राजकारण फिरवतील अशीच सर्वत्र चर्चा होती. यावेळी सत्ता बदलणार असा सोशल मीडियावरचे कौलही सांगत होते. मात्र शेवटी गुलाल उधळला तो महायुतीनेच.

महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचे गणित 
जरांगे फॅक्टरचे आव्हान, लाडकी बहीणची ओवाळणी,  'बटेंगे तो कटेंगे'चा ईशारा ते 'एक है तो सेफ है'चा 'सर्वसमावेशी' नारा...  महागाई, बेरोजगारीपासून वोट जिहादच्या आरोपापर्यंत... हा निवडणुकीचा प्रचारकी धुरळा खाली बसलाय आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालेय... महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकल्यामुळे त्यांची वाटचाल अभूतपूर्व विजयाच्या दिशेने सुरु आहे. 

महायुतीने लोकसभा निवडणुकीत  सेट झालेलं नरेटिव्ह बदलण्यासाठी जीवाचं रान केलं.  त्यासाठी लोककल्याणकारी योजनांचा हुकुमी एक्का वापरण्याचं त्यांनी ठरवलं आणि युतीच्या पोतडीतून बाहेर आल्या लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजमाफी, लाडका भाऊ , ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, प्रत्येक समाजघटकासाठी महामंडळे यांसारख्या योजना. एकनाथ आणि देवा भाऊंनी या योजनेची प्रसिद्धी उत्तम केली आणि अजित पवारांच्या गुलाबी गँगने घड्याळाचे काटे असे फिरवले की 'तुमची आमची' म्हणणारी भाजपा सर्वांची झाली.

राज्यात १९९५ नंतर म्हणजेच मागील ३० वर्षांत प्रथमच ६५ हून अधिक टक्के मतदान झालेय. त्यात महिलांच्या मतांचे प्रमाण मोठे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.लाडकी बहीण योजनेमुळे मतांची ही टक्केवारी वाढली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महायुतीलाला पुन्हा एकदा ओबीसी समाजाचे मोठे समर्थन मिळाल्याचे सांगितले जातेय. जरांगे फॅक्टरमुळे ओबीसी समाजात मोठ्याप्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे लक्ष्मण हके, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणविसांच्या पाठीमागे ओबीसी जनता उभी राहिल्याच पाहायला मिळतंय. 

या निवडणुकीत अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरही या निकालांनी शिक्कामोर्तब केलंय. दोन्ही पक्षांच्या विजयाच्या स्ट्राईक रेटवरून ही बाब सिद्ध होत आहे. गेल्या वीस वर्षांत झाली नाहीत ती कामे अजित पवारांनी दोन वर्षांत करून दाखवली असा सूर त्यांचे मुस्लीम कार्यकर्ते लावत होते. दादांनी पाच मुस्लिमांना प्रतिनिधित्वही दिले होते. त्यामुळे मुस्लीम समाजाने अजित पवारांच्या पक्षालाही मोठे मतदान केल्याची शक्यता आहे. 

योगींच्या बटेंगे तो कटेंगेमुळे पसरलेली अस्वस्थता पंतप्रधानांच्या 'एक हे तो सेफ है'च्या आश्वासक घोषणेने कमी झाली. ही साद घालत मोदींनी हिंदू मते तर मिळवलीच पण इतरांची निराशाही दूर केली. एकीकडे धर्मयुद्धाच्या नावाखाली हिंदू समाज एकवटला, तर दुसरीकडे कायम गृहीत धरल्यामुळे नाराज झालेल्या मुस्लीम समाजानेही यावेळी महाविकास आघाडीवरच्या पारड्यात एकगठ्ठा मतं टाकण्याचे टाळले.

या सगळ्या बाबी जुळून आल्यामुळे राज्यात महायुतीला ऐतिहासिक विजय मिळालाय. जनतेने महायुतीच्या हाती सूत्रे सोपवली आहेत. मात्र मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यातच नव्या सरकारचा शपथविधी येत्या दोनच दिवसांत वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा सामना अटीतटीचा झाला नसला पराज्यात येत्या काळात घडणाऱ्या घडमोडी उत्कंठावर्धक राहणार यात शंका नाही. 
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter