शहरात गुरुवारी रमजान ईद साजरी होत आहे. रमजान ईदसाठी पोलिस, महानगरपालिका व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला शहर पोलिस दलाने आज शहरातून सशस्त्र संचलन केले. जिल्ह्यासह नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्षातून अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त येथे दाखल झाला. बंदोबस्तासाठी एक हजारहून अधिक अधिकारी, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे व गृहरक्षक दलाचे जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल विभागाने नमाजपठण होणाऱ्या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने गुरुवारी पहाटे शहरात दाखल होणार आहेत. संचलनानंतर बुधवारी रात्री अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत विविध सूचना दिल्या. पोलिस ठाणे निहाय बंदोबस्ताची वाटप करण्यात आली आहे.
पहाटे ते सकाळी अकरापर्यंत शहरात येणारी वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. पोलिस कवायत मैदानासह नमाजपठण होणाऱ्या मैदानांकडे जाणारे जोड रस्ते बॅरेकेटींग लावून बंद करण्यात आले आहेत. अवजड वाहनांना सकाळी बंदी असेल. पोलिस प्रशासनाने शहरातील मुल्ला, मौलवी, प्रार्थनास्थळ व ईदगाहांचे विश्वस्त आदींशी चर्चा करुन सोयी-सुविधा व अन्य बाबींचा आढावा घेतला आहे.
रमजान ईद शांततेत पार पडेल. पर्याप्त बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी ‘सकाळ’ला सांगितले. श्री. भारती, सहाय्यक अधिक्षक तेगबिरसिंह संधू, श्री. गुंजाळ आदींसह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बंदोस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी चहा, पाणी, भोजन, मोबाईल शौचालयासह विविध व्यवस्था करण्यात आली आहे. .(latest marathi news)
महनगरपालिका प्रशासनाने पाणी, पथदीप, वजु करण्यासाठी तात्पुरत्या नळजोडण्या, स्वच्छता, मोकाट जनावरांचा बंदोबस्त यासह सर्व व्यवस्था केल्या आहेत. मैदानांवरील स्वच्छता, मैदाने व नजीकच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम यापुर्वी झाल्याचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी सांगितले.
ईदच्या पुर्व संध्येला सायंकाळच्या अखेरच्या रोजा अफ्तारीनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठा व रेडीमेड कपड्यांच्या दुकानांवर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. प्रमुख बाजारपेठेत पाय ठेवण्यासही जागा नव्हती. यंत्रमाग व्यवसायाची स्थिती समाधानकारक असल्याने यावेळी ईदचा मोठा उत्साह जाणवत आहे.
रमजान ईदसाठी बंदोबस्त
अप्पर पोलिस अधिक्षक - १
सहाय्यक पोलिस अधिक्षक -२
उपअधिक्षक - २
पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक - ५०
हवालदार, पोलिस कर्मचारी - ३००
वाहतूक पोलिस - ३०
गृहरक्षक दलाचे जवान - ४००
राज्य राखीव दल तुकड्या - २ (हिंगोली व पुणे)
बॉम्ब शोधक-नाशक पथक - १