छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं रयतेचं राज्य नष्ट करण्यासाठी प्रचंड फौज घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या बादशाहे हिंदोस्ताँ समशेरबहादूर आलमगीर औरंगजेबाला विरोध करण्यासाठी इथल्या गवतालाही भाले फुटले. एवढंच नव्हे, तर औरंगजेबाच्या विपरीत वागणुकीवर इथल्या साधुसंतांनी तर थेट कोरडे ओढले. त्यापैकी एक आहेत, छत्रपती संभाजीनगर येथील निपट निरंजनबाबा. जाचक जकात- जिझिया करावरही आपल्या कवितेतून कठोर टीका करणाऱ्या या 'जलाली फकिरा'च्या भजनी औरंगजेबही लागला, आणि इथल्या सर्वधर्मसमभावाच्या परंपरेपुढं झुकला.
माझ्या घरापासून जेमतेम २०० मीटरवर निपट निरंजन या नाथपंथी साधूचं समाधीस्थळ आहे. लेणीच्या डोंगरातून वाहत आलेल्या पावसाळी नाल्याच्या काठावर लिंब, वड, चिंच, कवठ, खिरणीच्या भल्या मोठ्या वृक्षांच्या दाटीत दडलेल्या निपटबाबांच्या समाधी मंदिरात जाणं हा अगदी लहानपणापासून आम्हा भावंडांचा आवडीचा विषय.
मार्गशीर्षातल्या दुसऱ्या एकादशीला इथं भरणाऱ्या यात्रेची तर आम्ही अगदी वाट पाहून असायचो. त्याचं कारण रेवड्या. एरवी काही कुणी खास जाऊन भोयाकडून रेवड्या आणून द्यायचं नाही. त्यामुळं आम्हाला त्या वर्षातून दोनदाच मिळायच्या.
चंपाषष्ठीला साताऱ्याच्या खंडोबा यात्रेत एकदा आणि दुसरं निपट बाबांच्या यात्रेत. त्यासोबत बोरं, पेरू आणि गोडी शेव. हे आजही तसंच सुरू आहे. बाबांच्या प्रसादात बोरांना फार महत्त्व. त्यांना भेटायला आलेल्या बादशहा औरंगजेबाला बाबांनी पोपटाच्या रूपात जाऊन मक्केतली बोरं आणून दिली होती म्हणतात.
बरं, या यात्रेची आणखी दोन वैशिष्ट्यं. हेल्यांच्या टकरी आणि कुस्त्यांची दंगल. समाधी मंदिराच्या आवारातच दोन भलीमोठी लिंबाची झाडं आहेत. तीन माणसांनी कवळा घातल्याशिवाय त्यांचं खोड कवेत येत नाही. त्या लिंबाखालीच लाल मातीचा आखाडा खणला जातो. तिथं हलगीच्या तालावर दिवसभर कुस्त्या चालतात.
छत्रपती संभाजीनगर शहरालगत हसूल, मुकुंदवाडी आणि निपट निरंजन या तीनही ठिकाणच्या कुस्त्यांची दंगल फार प्रसिद्ध. सगळ्या मराठवाड्यातून इथं मल्ल येतात. त्यांच्या कुस्त्या पाहायला मोठी गर्दी होते. अगदी आसपासच्या झाडांच्या फांद्याही वानरांच्या टोळीवाणी कुस्तीप्रेमींनी लगडलेल्या दिसतात.
जवळच बादशहाच्या दिलरसबानू बेगमचा मकबरा आणि तिच्या नावानं वसलेला बेगमपुरा आहे. मोगलांच्या छावणीसोबत आलेल्या ओरछा संस्थानच्या पहाडसिंग राजानं इथंच डोंगराच्या पायथ्याशी डेरा टाकला. तोच आजचा पहाडसिंगपुरा. त्याच्या जोडीला जवळच्या जयसिंगपुरा, भावसिंगपुरा वगैरे सगळ्या भागातून अहिर नंदवंशी गवळी समाजाची मोठी वस्ती आहे.
म्हशींचे मोठाले गोठे आणि चांगले पोसलेले मस्तवाल हेले हे त्यांचं भूषण. यात्रेच्या दिवशी बाबांच्या दर्शनाला आणलेल्या हेल्यांच्या टकरी इथं खेळवल्या जायच्या. आता काही वर्षापासून त्या बंद झाल्या; पण तरी गवळ्यांची पोरं आजही वाजतगाजत दर्शनाला सजवलेले हेले घेऊन येतात.
पूर्वी इथं जंगलात फक्त छोटंसं समाधी मंदिर. वीसेक समाध्या झाडीत दडलेल्या होत्या. समाधी मंदिरापुढं ७०-८० वर्षापूर्वी उभारलेलं साधं पत्र्याचं शेड होतं. त्यासाठीही इथल्या कारभाऱ्यांना त्या काळी टिकमगढ संस्थानच्या महाराजांची परवानगी आणावी लागली होती, अशी आठवण इथले विश्वस्त दयाराम बसैये यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितली.
आता इतर देवस्थानांप्रमाणे इथेही 'विकास' पोहोचला. खिरणीच्या भल्यामोठ्या झाडाखालचं शेड त्या झाडासह गेलं आणि भव्य सभामंडप उभा राहिला. पण आजही निसर्गरम्य परिसरातला आश्रम म्हणून अख्ख्या छत्रपती संभाजीनगरला याची ओळख आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी बुंदेलखंडच्या चंदेरी गावातून जिझौतिया गौड ब्राह्मण कुळातून आलेल्या या तारकसी (जरीकाम) करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या पन्नाशीनंतर वैराग्य आलं आणि एकांतसाधना करत असताना त्या काळी दौलताबादेत देवगिरी किल्ल्याजवळ, शुलिभंजनच्या डोंगरावर होणाऱ्या संतसमागमात दत्तगुरू आणि चर्पटनाथांचा अनुग्रह मिळाला.
गुरूनं 'निपट ले' म्हणताच गोम, विंचू, साप, खेकडे, पाली, सरडे गोळा करून शिजवलेल्या प्रसादाची कढई निपटून निपटून खाल्ल्यामुळे 'निपट' हे नाव मिळालं. त्या काळी या भागात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या नाथपंथाच्या परंपरेशी ते जोडले गेले.
आपल्या साधनेच्या बळावर त्यांनी एवढा अधिकार मिळवला, की साक्षात 'बादशाहे हिंदोस्ताँ समशेरबहादूर आलमगीर' औरंगजेबालाही खडे बोल सुनावायला मागंपुढं पाहिलं नाही. इतकंच नव्हे, तर सच्च्या मुसलमानाची कर्तव्यं आणि बादशहाची विपरीत वागणूकही आपल्या कवनांमधून थेट ऐकवली. आता पाहा,
सुनो सुलतान जहाँ, कौन है मुसलमान,
खुदा की न पहचान, खुदा जिक्र छेडा है।
कलमा पढे भराभर, मलमा तो भरा अंदर,
सौ सौ चूहे खाय के, बोका हज को दौडा है।
करे नमाज रोजा, न रूह का रकान खोजा,
जकात का लिये बोजा, जग से बखेडा है।
कहे 'निपट निरंजन', सुनो आलमगीर,
नाचना तो आवे नहीं, कहे आंगन टेढा है।।
'रूह का रकान' शोधून 'खुदा की पहचान' करण्याऐवजी सुलतान त्याचं कसं अवडंबर माजवतोय, हे खुद्द सुलतानालाच सांगणारा हा काफिरांचा संत समकालीन बादशहाच्या जकात- जिझियावरही कवितेतून कोरडे ओढण्याची हिंमत ठेवतो, हे चकित करणारं आहे.
जी जुर्रत केल्याबद्दल तत्काळ शिरच्छेद, कारावास किंवा धर्मातर, अशी कुठलीही शिक्षा मिळावी, त्या साधूचा हा तडाखा ऐकून बादशहाही "ऐसा जलाली फकीर देखने में नहीं आया है।" म्हणत आश्रमातच डेरा टाकून २१ दिवस राहिला, असे म्हटले जाते. त्या वेळी आलमगीर आणि निपटबाबा यांच्यात झालेला संवाद बाबांचा शिष्य निरंजन यानं काव्यरूपात लिहून ठेवला. कविराज भूषणाच्या ब्रज भाषेतल्या छंदांसारखी ही कवनं फारच रंजक आहेत.
निजामीत राजाबाजारात राहणाऱ्या व्यंकटेशस्वामी सद्गुरे यांनी बुऱ्हाणपूरपासून बुंदेलखंडात कुठं कुठं पसरलेल्या या बाबांच्या कवनांचं संकलन केलं होतं. निपट-आलमगीर संवादाची ११४ कवनं, आलमगीराप्रती उद्गारांचं एक कवन, एक पद आणि दोन दोहे, त्याखेरीज नसीहतनामाचे २२ छंद, ४० दोह्यांची फकीर चालिसा, उर्दू बाराखडीच्या आद्याक्षरांना गुंफून रचलेला ३० दोह्यांचा अलीफनामा आणि उपदेशपर आध्यात्मिक बानीची १३८ कवनं, ५० दोहे, १९ सवाया आणि १५ भजनं मिळाली होती.
शहरात त्या काळी गणेशोत्सवाच्या मेळ्यांमधले गवई बल्लू पांडे, छन्नू पांडे आणि दुर्गा पांडे यांच्याकडे निपटबाबांची कवनं मौखिक परंपरेने आली होती. भीमस्वामींचं भक्तलीलामृत, कवी नारायण यांचं श्री गुरुलीलामृत (मध्वमुनीश्वर चरित्राचं हस्तलिखित), औरंगजेबाचे समकालीन कवी कालिदास त्रिवेदी यांच्या 'कालिदास हजारा'त निपट महाराजांच्या लीला वाचायला मिळतात.
ग्रियर्सन, आचार्य भिकारीदास यांनीही निपट निरंजन यांचा उल्लेख केला आहे. हैदराबादच्या आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेजचे सफीउद्दीन सिद्दिकी यांनी १९५५ मध्ये दिल्लीच्या 'आईना' या उर्दू साप्ताहिकात 'औरंगजेब से गुस्ताखी करनेवाले संत कवि, हिन्दी और उर्दू के शायर' या शीर्षकाखाली सविस्तर लेखही लिहिला होता.
तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातले - प्रोफेसर डॉ. भालचंद्रराव तेलंग आणि राजमल बोरा यांनी संशोधन करून चरित्र आणि कवनांचं हे संकलन १९५२ मध्ये प्रसिद्ध केलं. पुढं आणखी कवनं मिळाल्यानंतर प्रा. बोरा यांनी १९९२ मध्ये 'निपट निरंजन की बानी' हा ग्रंथ सिद्ध केला. ते पुस्तक आता दुर्मिळ झालंय. अर्थात माझ्याकडे ते होतंच.
एकीकडे औरंगजेबाची जिहादी, जिंदा पीर, बुतशिकन् अशी आलम हिंदुस्थानची बलाढ्य सत्ता इस्लामच्या प्रसारासाठी वापरणारा, तब्बल ५० वर्षांची कारकीर्द एतद्देशीयांचं दमन करण्यात घालवणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य धुळीला मिळवण्यासाठी पाच लाखांची फौज आणि दिल्लीचा सगळा खजिना घेऊन दख्खनेत सगळी शक्ती पणाला लावणारा, संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा अशी सर्वश्रुत प्रतिमा डोळ्यांसमोर असताना, या अशा बादशहाला आपल्या भागातल्या एका साधूनं कसं सरळ केलं, वगैरे खुमारीनं वाचण्यासाठी कितीकदा त्याची पारायणं केलेली. मित्रांमध्ये मोठमोठ्यानं ते दोहे वाचून दाखवलेले.
पण तो तेव्हाचा अल्लडपणाचा भाग सोडला, तरी आता पुन्हा ते उघडून बसलो तर मला काय दिसतं निपटबाबांच्या साहित्यात? तर हे पुस्तक तसं फार इंटरेस्टिंग आहे तो काळ, माणसं, त्यांचे विचार, धार्मिक कल्पना आणि नाथ संप्रदायाची एक अल्पपरिचित फांदी जाणून घेण्यासाठी.
देवगिरी किल्ल्यावर संत एकनाथांचे गुरू किल्लेदार जनार्दन स्वामी यांनी सुरू केलेल्या संत संमेलनाचे उल्लेख अनेक मध्ययुगीन संतांच्या साहित्यात आले आहेत. त्यांचे गुरू म्हणवले जाणारे चाँद बोधले, पुढे स्वतः संत एकनाथ, थेट मुलतानहून येऊन दौलताबादेत मठ करून राहिलेले योगानंद मानपुरी, दासोपंत, दूलनदास, रज्जब, बुल्लेशाह, दरिया साहब, यारी साहब, मलूकदास, गुलाल साहब, जगजीवन आणि शेवटी शुकमुनी शिष्य चरणदास यांनी हा सत्संग पुढे चालू ठेवला.
वारी विशेष : 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेले हे लेखही जरूर वाचा -
सूफी संतांचं दख्खनेतलं प्रमुख केंद्र खुलताबाद हे राजधानी दौलताबादच्या नजीक असल्यामुळे सूफींचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे शाहनूर मियाँ हमदानी, मोमीन आरिफ, लंगोट बिन अन्सारी हेही या संत समागमात सामील झाल्याचे उल्लेख आढळतात.
छत्रपती संभाजीनगर परिसरात निपट निरंजन यांच्याबरोबरच शेंदूरवाद्याचे मध्व मुनीश्वर, अनंतनाथ, कृष्णदास आणि विनायकानंद सरस्वती या संतांच्या रचनाही इकडच्या भागातला तो काळ दाखवणाऱ्या आहेत. बहुतांश काव्य हे भक्तिसंप्रदायाला वाहिलेलं आणि दृष्टांतरूप असलं, तरी त्यात आढळणाऱ्या समकालीन उल्लेखांचं ऐतिहासिक संदर्भमहत्त्व नाकारता येत नाही; आणि म्हणूनच तो काळ डोळ्यांपुढे उभा करणारा, हिंदू धर्म किंवा नाथपंथाचा अंगीकार करूनही सूफी-मुसलमान परंपरेचीही चर्चा करणारा निपट निरंजनांचा काव्यसंभार मला आता महत्त्वाचा वाटतो.
बाबांच्या साहित्यातला अनेकधर्मी आशय आणि समन्वयाची, अद्वैताची भाषा शुद्ध इहवादी असल्याचं पानोपानी जाणवतं. वर्षानुवर्षे इथं येणाऱ्या मराठी-अमराठी-मुसलमान लोकांशी बोलतानाही ते लक्षात येतं. शिवाय त्यातून होणारी तत्कालीन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासाची ओळख महत्त्वाची आहे.
लोकांमध्ये भक्त्ती वाढावी म्हणून त्यांनी देवाची मूर्ती रस्त्यात आणून ठेवली. मंदिर बांधलं, पण त्या देवाच्या दर्शनासाठी फक्त हिंदूच येऊ लागले. म्हणून त्यांनी मंदिराची केली मशीद. पण पुन्हा अडचण झाली. मुसलमानांची रीघ लागली; पण हिंदू ढुंकूनही पाहिनासे झाले. दोन्हीकडचे लोक एकत्र आणायला काय करावं, या विचारात या साधूनं मशीद पाडली आणि त्या जागी संडास बांधला पाहतो तो काय, या सार्वजनिक शौचकूपात मात्र कसलाही भेद न करता हिंदू आणि मुसलमान दोघेही आपापली गरज पूर्ण करण्यासाठी येऊ लागले.
पण धर्मावरचा हा आघात समजून गावचा पठाण हाकीम संतापला. मशीद पाडून संडास बांधणाऱ्या निपटबाबांना बोलावणं धाडलं. बाबा काय म्हणाले, याचं वर्णन शिरगावच्या भीमस्वामींनी आपल्या 'भक्तलीलामृत' ग्रंथात केलं आहे. ते म्हणाले,
देव केला तेथे न येती यवन।
मशिदींत जाण हिन्दू न ये।।
मग शोचे कूप केला तेथे येती।
भेदातीत होती नर्क द्वारा।।
आम्हीं काय यासी करावा उपाय।
नर्क जातां प्रिय जनांलागी ।।
हे चिरंतन खरमरीत सत्य सांगणारा नाथ परंपरेतला; पण तरीही परंपरांचं कुठलंही गारूड न दाखवता एक स्वतंत्र प्रतिभाप्रभावळ असलेला एक दुर्लक्षित दमदार साधू या भागात होऊन गेला आहे. आता इथं मी पण किती सांगावं याला शब्दमर्यादा असली तरी, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या या भागातल्या अनुयायांबद्दल लिहायचंच तर आणखी एक पुस्तक होईल, एवढं सांगण्यासारखं आहे.
छत्रपती संभाजीनगरला आले की लोकं बीबी का मकबरा, लेणी, पाणचक्की, अजिंठा, वेरूळ, दौलताबाद वगैरे पाहतात. पण इथल्या या छोट्या छोट्या दडलेल्या इतिहासकथासुद्धा फार रंजक आहेत. येणारा माणूस तितका दर्दी असेल, तर निपटबाबांच्या सान्निध्यात मैफलीला खरोखर रंग भरेल.
कोण येतंय बोला?
~ संकेत कुलकर्णी
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ विठाई विशेषांक २०१९)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -