नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणातील एका दोषीने निर्दोष सुटल्यानंतर गुजरातमध्ये वकिली सुरू केल्याचे कळताच सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. न्यायमूर्ती उज्वल भुईया यांनी बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना, बलात्कारासारख्या गुन्ह्यात शिक्षा झालेला व्यक्ती वकिलीसारखा पवित्र व्यवसाय कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाला सांगण्यात आलं की, दोषींपैकी एक राधेश्याम शहा वकील आहे. त्यावर न्यायाधीशांनी विचारलं की, बलात्काराच्या दोषीने वकिली करणे योग्य आहे का?
या टिप्पणीवर, दोषींचे वकील ऋषी मल्होत्रा यांनी उत्तर दिले की शिक्षा म्हणजे सुधारणा. शिक्षेदरम्यान, शहा यांनी सुधारात्मक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रही मिळाले. साडेपंधरा वर्षांच्या कारावासात शहा यांनी कला, विज्ञान आणि ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. कारागृहातील सोबतच्या कैद्यांना त्यांनी ऐच्छिक पॅरा कायदेशीर सेवाही दिली. या प्रकरणात आरोपी होण्यापूर्वीही ते मोटार वाहन अपघातातील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी वकील म्हणून सराव करत होते.
तेव्हा न्यायमूर्ती नागरत्ना यांनी विचारले की, शहा अजूनही वकिली करत आहेत का? यावर मल्होत्रा म्हणाले की, होय, त्यांनी पुन्हा सराव सुरू केला आहे, कारण आरोप होण्यापूर्वी आणि सुटकेनंतरही ते वकिली करत होते.
दरम्यान न्यायमूर्ती भुयान यांनी गंभीर प्रकरणातील दोषीला वकिली करण्याचा परवाना देता येईल का, अशी विचारणा केली. कारण वकिली हा एक पवित्र व्यवसाय आहे. त्यावर मल्होत्रा यांनी उत्तर दिलं की, खासदार आणि लोकप्रतिनिधी असणे देखील पवित्र आणि आदर्श असते. तरीही त्यांना दोषी ठरवून शिक्षा भोगल्यानंतर निवडणूक लढवता येते. त्यावर न्यायमूर्ती भुयान म्हणाले की, हा चर्चेचा विषय नाही. बार कौन्सिलने दोषीला वकिलीचा परवाना द्यायला नको होता. येथे बार कौन्सिल दोषी आहे, यात शंका नाही.
मल्होत्रा यांनी सांगितलं की, दोषीने आपली शिक्षा पूर्ण केली. त्यावर न्यायमूर्ती नगररत्न म्हणाले की, शहा यांनी पूर्ण शिक्षा भोगली नाही. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. केवळ त्यांची शिक्षा कमी करण्यात आली आहे, निर्दोष ठरविण्यात आलेलं नाही.