मणिपूरमधील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच शुक्रवारी मध्यरात्री कुकी उग्रवादीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत.
याबाबत माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री उशिरा ते मध्यरात्री २.१५ च्या दरम्यान कुकी उग्रवादीयांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला. हे दोन्ही जवान मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते.
मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. मतदान संपल्यानंतर काही तासांनी हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाह्य मणिपूर सीटवर मतदान संपल्यानंतर काही तासांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या चौकीवर कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या नरनसेना गावात डोंगरी भागातून दरी भागाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यावेळी कुकी अतिरेक्यांनी बॉम्ब फेकला.
या स्फोटात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले. इतर जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.