हिंदू महिला यात्रेकरूंना आपल्या खांद्यावर वाहून नेताना स्थानिक काश्मिरी मुस्लीम. फोटो - अहमद निसार
'अमरनाथ' हे हिंदूंच्या पवित्र श्रद्धास्थानांपैकी एक महत्त्वाचे स्थान. काश्मीर येथे असलेली बाबा अमरनाथांची ही गुहा शिवभक्तांचे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात. ही यात्रा अतिशय खडतर असते. भक्तांचा शारीरिक आणि मानसिक कस तपासणारी असते. त्यामुळे या यात्रेसाठी अर्ज करताना भक्तांना अनेक शारीरिक अटींची पूर्तता करावी लागते. १ जुलैपासून या यात्रेला सुरूवात झाली असून साधारणतः ३१ ऑगस्टला ही यात्रा संपन्न होईल.
ही यात्रा कशी सुरु झाली याची आख्यायिकाअमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. बुटा मलिक नावाचा एक मुस्लिम व्यक्ती या परिसरात गुरे चारत होता. त्यावेळी त्याला एक साधू भेटला. त्या साधूने बुटा मलिकला कोळशाने भरलेली एक पिशवी दिली. घरी गेल्यावर बुटाने ती पिशवी उघडली. पाहतो तर पिशवीतल्या कोळशाचे रुपांतर सोन्याच्या नाण्यांमध्ये झाले होते. साधूचे आभार मानायला तो गुहेत गेला, मात्र त्याला तो साधू तिथे दिसला नाही. गुहेत त्याला बर्फाचे मोठे शिवलिंग दिसले, नैसर्गिकपणे तयार होणारे बर्फाचे शिवलिंग. त्याने गावात येऊन ही घटना सर्वांना सांगितली. अशा रीतीने, बाबा अमरनाथांच्या या गुहेचा शोध एका मुस्लीम व्यक्तीने लावला आणि तेव्हापासून अमरनाथ यात्रा सुरू झाली.
अतिशय खडतर आणि दुर्गम म्हणून प्रसिद्ध असलेली अमरनाथ यात्रा आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ही यात्रा हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे आणि सहजीवनाचे प्रतिक बनले आहे. काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्य प्रदेश. साहजिकच यात्रेत सेवा देणाऱ्यांमध्ये स्थानिक मुस्लीमांचे प्रमाण अधिक आहे. यात्रा सुरु होण्याची ते उत्सुकतेने वाट बघत असतात आणि ती सुरु झाली की हिंदू यात्रेकरुंच्या स्वागतासाठी सज्ज होतात. ते यात्रेकरूंचे आदरातिथ्य तर करतातच, पण यात्रेदरम्यान सर्वतोपरी मदतही करतात. भारतातील इतर राज्यांपेक्षा काश्मीरमधील वातावरण थोडेसे तणावपूर्ण असल्यामुळे यात्रेकरूंचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित कसा होईल याकडे ते जातीने लक्ष देतात. आदरातिथ्याची ही परंपरा अजूनही अखंडपणे सुरु आहे.
यात्रा मार्ग दुर्गम असल्यामुळे यात्रेकरूंना येणाऱ्या अडचणीही मोठ्या असतात. त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करावा लागतो. स्थानिक लोक यात्रेकरूंसाठी तंबू उभारतात. बाबा बर्फानी उर्फ अमरनाथ यांची गुहा ३८८८ मीटर उंचीवर आहे. अनेकांना हा खडतर प्रवास पायी करणे शक्य नसते. अशा भक्तांसाठी पालखीची किंवा खेचराची व्यवस्था करणारे बहुतांश मुस्लिमच असतात. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत सर्वांत आधी मदतीला धावून येणारे हे स्थानिक मुस्लिमच असतात.
स्थानिकांच्या या मदतीचे मूल्य इतर कोणत्याही आर्थिक मदतीपेक्षा कैक पटीने अधिक आहे. ही यात्रा पूर्ण करण्यासाठीया मुस्लिम बांधवांकडून सर्व प्रकारची व्यवस्था केली जाते. सोबतच अनेक गोष्टींची काळजीही घेतली जाते. बंधुभावाचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असल्याची भावना इथे येणारे यात्रेकरू बोलून दाखवतात. यात्रा यशस्वी व्हावी म्हणून मुस्लिम बांधव कसलीही कसर सोडत नाहीत. ते न मागताही मदतीला तत्पर असतात, अशा शब्दांत भाविक समाधान व्यक्त करतात.
अमरनाथ यात्रा अनेकांना उदारनिर्वाह देते. २५ किलोमीटरचा हा प्रवासात भाविक सामान घेऊन करू शकत नाहीत. त्यावेळी स्थानिक लोक यात्रेकरूंच्या प्रवाशांची ओझी वाहून मोबदला मिळवतात. अनेकजण तर बंधुत्वाच्या भावनेतून अगदी मोफत सेवा पुरवतात. पालखीतून विशेषतः वृद्ध यात्रेकरूंना नेण्यात येते. या कामातून पुण्य मिळते अशी स्थानिकांची भावना असते. ते सुद्धा अमरनाथ यात्रेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानतात. ते वर्षभर यात्रेकडे डोळे लावून बसलेले असतात. देशभरातील भाविकांनी यात्रेसाठी नि:संकोचपणे यावे असे आवाहन करतानाच काश्मीरमध्ये कोणताही धोका नसल्याची शाश्वतीही ते देतात.
- पूजा नायक