मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत पाच फलंदाज बाद करीत पुनरागमन केले. भारताचा वेगवान गोलंदाज सिराजने त्याच्या यशाचे श्रेय सहकारी जसप्रीत बुमराला दिले.
मोहम्मद सिराज याप्रसंगी जसप्रीत बुमराने पर्थ कसोटीआधी दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली. तो म्हणाला, मी नेहमी जस्सी भाईसोबत बोलत असतो. पर्थ कसोटीआधीही त्याच्याशी बोललो. माझ्या कामगिरीबाबत त्याच्याशी संवाद साधला. त्याने मला एक सल्ला दिला. तो म्हणाला, विकेट मिळवण्याच्या मागे धावू नकोस. त्यापेक्षा एकाच ठिकाणी सातत्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न कर. गोलंदाजीचा आनंद घे. त्यानंतरही तुला विकेट मिळत नसतील, तर माझ्याकडे ये. दरम्यान, त्याचा हा सल्ला कामी आल्याचे सिराजने स्पष्टपणे सांगितले.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे
मोहम्मद सिराजने या वेळी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांचे मार्गदर्शनही मोलाचे असल्याचे आवर्जून नमूद केले. तो म्हणाला की भरत सरांनी मला गोलंदाजीचा आनंद घेण्यास सांगितले. दिलीप सरांसोबत सराव करताना मजा येते. मॉर्नेकडूनही मला वारंवार प्रोत्साहन मिळत असते. ते म्हणतात की तू योद्धा आहेस. भारताला तू विकेट मिळवून देशील. या सर्व कारणांमुळे चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.
गुलाबी चेंडूसह सराव महत्त्वाचा
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी दिवसरात्र असणार आहे. तसेच या कसोटीत गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. याप्रसंगी मोहम्मद सिराज म्हणाला की, गुलाबी चेंडू हा लाल चेंडूपेक्षा भिन्न आहे. गुलाबी चेंडूची शिवण ही कठीण असते. त्यामुळे गुलाबी चेंडूने सराव करणे गरजेचे आहे. फ्लडलाईट्समध्ये गुलाबी चेंडू अधिक प्रमाणात स्विंग होतो असे ऐकले आहे. पण प्रकाशझोतात अद्याप मी गोलंदाजी केली नाही. त्यामुळे अॅडलेड येथे जाईन आणि सराव करीन तेव्हा मला याबाबत समजेल. त्यामुळे सध्या सरावाची नितांत गरज आहे.