'विनेशची 'सुवर्णसंधी' हुकली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत पोहचून भारतीय कुस्तीप्रेमींचे हृदय जिंकणाऱ्या विनेश फोगाटला १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमधून अपात्र ठरविण्यात आले. सुवर्णसंधी हुकल्यामुळे विनेशसह तमाम भारतीयांचा स्वप्नभंग झाला. विनेशने महिला विभागातील ५० किलो वजनी गटात मंगळवारी मध्यरात्री अंतिम फेरीत प्रवेश करून देदीप्यमान कामगिरी केली. बुधवारी पहाटे मात्र ती अपात्र ठरली. काही तासांच्या अंतरात ही घटना घडली. नेमबाजी, हॉकी वगळता भारतीय खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकमध्ये अपयश येत असताना विनेश फोगाटची अंतिम फेरीतील धडक दिलासा देणारी ठरली होती. 

गेल्या वर्षभरात भारतातील कुस्तीशी संबंधित घडामोडींवर नजर टाकता विनेशची ही मोठी झेप होती. राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांविरुद्ध नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये ती अग्रस्थानी होती. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून आश्वासने देण्यात आली. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. यामुळे तिच्यासह इतर कुस्तीपटूही निराश होते. याच दरम्यान ती पॅरिस ऑलिंपिक निवड चाचणीत सहभागी झाली आणि ५० किलो वजनी गटात यशस्वीही झाली.

तीन किलो वजन वाढले
विनेश फोगाट हिचे मंगळवारी पहाटे ४९.९ किलो वजन होते. या दिवशी तिला तीन लढती खेळावयाच्या होत्या. त्यामुळे थोडीफार न्याहारी तिने केली. यानंतर ती दिवसभरात तीन लढती खेळली. उपांत्य फेरीनंतर तिचे वजन ५२.७ किलो इतके झाले. वजन कमी करण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण १०० ग्रॅम अधिक वजन भरल्याने तिच्या पदक जिंकण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला.

‘तिला’ मिळाली संधी
विनेश फोगाट हिने उपांत्य फेरीच्या लढतीत क्युबाच्या युसनेलिस गुजमान हिच्यावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र विनेश वाढलेल्या वजनामुळे अपात्र ठरली. याचा फायदा गुजमान हिला झाला. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत अमेरिकेच्या साराह ॲन हिच्याविरुद्ध गुजमान हिची निवड करण्यात आली. तसेच विनेशकडून पराभूत झालेल्या सुसाकी युई - ओकसाना लिवाच यांच्यामध्ये एक ब्राँझपदकाची लढत ठरली. दुसऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत फेंग झिकी - डोग्लोजाव ओ. या कुस्तीपटू आमने-सामने आल्या.

वजनी गट बदलल्याने फटका
विनेश फोगाट ही वयाने लहान असताना ४८ ते ५० किलो वजनी गटात सहभागी होत असे. या वजनी गटांमधून खेळताना तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती. कालांतराने वय वाढत गेल्यानंतर तिला ५३ किलो वजनी गटात खेळावे लागले. या वजनी गटामधून खेळताना तिने जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा या सर्वांमधूनच पदकांची लयलूट केली. पॅरिस ऑलिंपिकसाठी मात्र अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटाची पात्रता मिळवली. त्यामुळे तिचे नाव पक्के झाले. तरीही विनेश हिने ५३ व ५० अशा दोन्ही वजनी गटाच्या निवड चाचणीत सहभाग घेतला. ५३ किलो वजनी गटाच्या चाचणीत ती अपयशी ठरली. अंतिम पंघाल ही ५३ किलो वजनी गटात यशस्वी ठरली. याचवेळी विनेश ५० किलो वजनी गटात चमकली. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेशला ५० किलो वजनी गटात खेळावे लागले. वजनी गट बदलल्याचा फटका तिला बसला. त्यामुळे तंदुरुस्तीचा कस लागतो. सातत्याने सरावासोबत वजनावरही लक्ष द्यावे लागते.


विनेशची कारकिर्द
भारतातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या विनेश फोगटचा जन्म १९९४ मध्ये झाला. विनेशचे काका महावीर सिंग यांनी फार कमी वेळात फोगट आणि तिची बहीण बबिता फोगट यांना कुस्तीची ओळख करून दिली.

२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत विनेश फोगटने तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. तिने सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण त्यादरम्यान तिला पदक मिळवण्यात अपयश आले. २०१८ मध्ये विनेशने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.

२०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती टोकियो ऑलिम्पिकचा भाग राहिली. त्यानंतर 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.