भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. भारताच्या कसोटी संघात सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांच्या रूपाने प्रथमच नवीन खेळाडूंचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या नेतृत्वाखाली भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण मजबूत दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने सर्वात मोठा सामनाविजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी दिली नाही. अलीकडेच मोहम्मद शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या उपलब्धतेवर शंका निर्माण झाली होती. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने रविवारी सोशल मीडिया हँडल X वर नेटमध्ये आपली गोलंदाजी दाखवत एक व्हिडिओ शेअर केला. मात्र तरीही भारतीय संघ व्यवस्थापनाला मोहम्मद शमीच्या फिटनेसबद्दल शंका आहे. त्यामुळे या स्टार वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.
मोहम्मद शमी घोट्याच्या शस्त्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीत सुधारणा होऊनही निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड केलेली नाही. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने शमीच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले होते की, टाचेच्या दुखापतीतून सावरलेल्या शमीच्या गुडघ्याला सूज आली होती, त्यामुळे तो नव्या मालिकेत टीम इंडियाचा भाग होऊ शकत नाही. गुडघ्याला सूज आल्याने शमीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही स्थान मिळू शकले नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजाशिवाय टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त फक्त मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियात कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी निवड झाली असती तर भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आणखी आक्रमक ठरले असते.