शमीचं टीम इंडियात पुनरागमन होणार कधी?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी

 

वन-डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये धमाकेदार कामगिरी करणारा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या मैदानाबाहेर आहे. त्याने २०२३ वन-डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर सामना खेळलेला नाही. पायाच्या दुखापतीमुळे वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मैदानाबाहेर असून तो आता ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पुनारागमन करण्याची शक्यता आहे. ३४ वर्षीय शमी सद्यस्थितीतील एक अनुभवी गोलंदाज असून तो आगामी मालिकांमध्ये भारतीय कसोटी संघाचा भाग असणे महत्त्वाचे राहणार आहे.

पुढील आठवड्यात चेन्नई येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो संघात परतण्याची अपेक्षा होती. परंतु दुलीप ट्रॉफी न खेळल्याने निवड समितीकडून बांगलादेश कसोटीसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. जिथे तो ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बंगाल संघामधून रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळेल व न्यूझीलंडविरुद्ध तीनपैकी एक कसोटी सामना खेळेल.

परंतु कोलकाता येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, शमीने त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल मत व्यक्त केले होते. शमीने सांगितले की तो १०० टक्के तंदुरुस्त झाल्यावरच राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल म्हणजे पुन्हा दुखापत होण्याचा धोका असणार नाही.

शमी म्हणाला, “मी शक्य तितक्या लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला माहित आहे की मी बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर आहे. पण मी परतण्यापूर्वी मला माझ्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे पुन्हा दुखापत होण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे मी बांगलादेश, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी पुनरागमन करणार की नाही हे महत्त्वाचे नाही. मी आधीच गोलंदाजी सुरू केली आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे मला कोणताही धोका पत्करायचा नाही. जोपर्यंत मला १०० टक्के तंदुरुस्त वाटत नाही तोपर्यंत मी परत येण्यास सहमत नाही. त्यासाठी जर मला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागले तर मी तेही करेन.”

असे असले तरी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी शमीच्या पुनरागमनावर आश्वासन दिले की शमी बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाचा भाग असेल. शाह म्हणाले की, "शमी बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघामध्ये असेल कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि आम्हाला त्याची ऑस्ट्रेलियामध्ये गरज आहे."

"आमचा संघ बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी आधीच सज्ज आहे. आम्ही जसप्रीत बुमराहला मालिकेसाठी आता काही काळ विश्रांती दिली आहे. मोहम्मद शमीही तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. रोहित आणि कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू तंदुरुस्त आहेत. त्यामुळे हा भारताचा अनुभवी संघ असेल." जय शाह पुढे म्हणाले.