भक्ती चाळक
जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा उद्या १९ जानेवारीला मोठ्या दिमाखात होणार आहे. मुंबईत होत असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या मॅरेथॉनचे यंदाचे हे १९वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून धावपटू मुंबईत दाखल झालेले आहेत. परंतु कोलकत्ता येथून आलेला आसिफ इक्बाल नावाचे व्यक्ती त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे कारणही तसेच आहे कारण आसिफ हे दृष्टिहीन आहेत आणि तरीही ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
४८ वर्षांचे आसिफ कोलकत्ता येथे स्थायिक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहार येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. पुण्यातील सिंबायोसिस कॉलेजमध्ये त्यांनी एमबीए केले. आता कोलकत्ता येथील PWC या नामांकित कंपनीत असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करतात.
असा सुरु झाला आसिफ यांचा धावण्याचा प्रवास…
आसिफ हे २०२३ व २०२४ मध्ये अर्ध मॅरेथॉन धावले होते. पण आता ते त्यांच्या दोन धावपटू मित्रांसोबत त्यांची पहिली पूर्ण मॅरेथॉन धावणार आहेत. संपूर्ण मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवणार असल्याचे त्यानी सांगितले आहे. संपूर्ण मॅरेथॉन ८:१५ वेगाने धावून ५ तास ५० मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
या मॅरेथॉनमध्ये धावण्याविषयी आपले उद्दिष्ट स्पष्ट करताना आसिफ म्हणाले, “माझ्यासाठी मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही. तर, स्वतःला आणि जगाला दाखवून देण्याची ही एक संधी आहे की आपल्याला वाटत असलेल्या मर्यादा फक्त आपल्या मनात आहेत.”
पुढे ते म्हणतात, “मी माझी पहिली शर्यत दुसर्यांच्या हाताला धरून धावलो आणि तेव्हा मी १० मीटरही धावू शकलो नव्हतो. तेव्हापासून ते आत्ता २५ किलोमीटरचे अंतर धावण्यापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला आहे. यासाठी मी माझ्या कुटुंबियांचा आणि सर्व सहाय्य करणाऱ्यांचा आभारी आहे. तसेच यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची आणि पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले आहेत. त्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार.”
आसिफ यांच्या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेतात. ते एक असे घड्याळ वापरतात जे वेग, सरासरी वेळ आणि अंतरावर रिअल-टाईम ऑडिओ अपडेट देते. त्यादरम्यान त्यांच्या धावपटू मित्राच्या कमरेला जोडलेल्या वायरलेस स्पीकरमधून सतत गाणे वाजते, ज्यामुळे आसिफ यांना सोबतच्या धावपटूंची नेमकी स्थिती कळते.
आसिफ यांचे धावण्यासाठीचे प्रशिक्षण अतिशय बारीक, मेहनतीचे आणि सर्वांगीण आहे. ते आठवड्यातून तीन वेळा धावतात. त्यांच्या प्रशिक्षकाने ठरवलेल्या काटेकोर वेळापत्रकानुसार आणि त्याचा मित्र धावपटू सुमित दाससोबत ते दर रविवारी सराव करतो. त्यांच्या सोबत धावणाऱ्या मित्रांना ते बडी रनर्स म्हणून संबोधतात.
अलीकडेच आसिफ यांनी त्यांच्या पहिल्या पूर्ण मॅरेथॉनचा सराव पूर्ण केला. त्यांचा सात वर्षांचा हा प्रवास ते सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाने करत आहेत. धावण्याच्या सरावाविषयी बोलताना आसिफ सांगतात, “मी यासाठी अनेक वर्षे सराव केला आहे. माझा हा प्रयत्न केवळ शर्यतीसाठी नाही तर, इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेले कष्ट आणि सातत्यासाठील आहे. जर मी लक्ष केंद्रित केले आणि माझे १०० टक्के प्रयत्न केले तर मला आत्मविश्वास आहे मी माझे ध्येय साध्य करू शकतो.”
आसिफ पुढे म्हणतात, “वयाच्या १६व्या वर्षापर्यंत माझी केवळ ५० टक्के दृष्टी होती आणि त्यानंतर मी ती पूर्णपणे गमावली. परंतु यामुळे मला माझे लक्ष्य साध्य करण्यापासून कुणीही रोखले नाही. मी गेली सात वर्षे विविध शर्यतींमध्ये धावत आहे.”
तंदुरुस्त जीवनशैलीविषयी आसिफ म्हणाले, “मला गेल्या काही वर्षांपूर्वी हायपरटेंशन आजाराचे निदान झाले. त्यानंतर मी चालणे, धावणे आणि फिटनेसला गांभीर्याने घेतले. डॉक्टरांनी मला सांगितले की मी माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे जीवनशैलीत बदल करावा, आणि त्यामुळे मी नियमित चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर धावण्यापर्यंतचा माझा हा प्रवास सुरु झाला.”
आसिफ शेवटी म्हणतात, “मी तुम्हाला आरोग्याबाबत एकाच सल्ला देईल की तुम्ही तुमच्या आरोग्याला सर्वोच्चस्थानी ठेवा. कारण आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही कोणतीही लढाई लढू शकता.”
आसिफ यांनी एक आशियाई रेकॉर्ड देखील बनवला आहे. ते असे पहिले दृष्टिहीन धावक आहेत ज्यांनी २५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. आता आसिफ यांनी मुंबई ४५ किलोमीटर धावून आणखी एक रेकॉर्ड बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असिफ आता मुंबई मॅरेथॉनसाठी सज्ज झाले आहेत. त्यांची मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास नक्कीच त्यांना बळ देत राहील.