बांगलादेश संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात नुकतीच बांगलादेशने भारताविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली, ज्याच भारताने २-० असा विजय मिळवला. पण असं असलं तरी मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांकडून खिलाडूवृत्तीचे दर्शन झाले, विशषत: विराट कोहलीकडून. विराटने मालिकेनंतर बांगलादेशच्या शाकिब अल हसनला बॅट भेट दिली.
या मालिकेतील दुसरा सामना कानपूरला पार पडला. या सामन्यात भारताने मंगळवारी (१ ऑक्टोबर) ७ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना कदाचीत बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनचा अखेरचा कसोटी सामना असू शकतो, अशी चर्चा आहे.
तथापि, शाकिबने मायदेशात अर्थातच बांगलादेशात अखेरचा कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण बांगलादेशमधील सध्याचे वातावरण पाहाता आता तिथे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल, यावर सांशकता आहे. अशात तो कानपूरमध्येच अखेरचा कसोटी सामना खेळेल, अशी चर्चा आहे.
अशातच आता विराटने कानपूर कसोटीनंतर प्रेझेंटेशनवेळी त्याची बॅट शाकिबला भेट दिली. यावेळी तो शाकिबशी चर्चा करतानाही दिसला. तसेच दोघेही एकमेकांबरोबर बोलताना हसतानाही दिसले, त्यामुळे मैदानात किंवा मैदानाबाहेर काहीही होत असले, तरी यातून खेळाडूंमध्ये एकमेकांबद्दल असलेली आदराची भावना दिसून आली आहे.
दरम्यान, ही मालिका विराट कोहलीसाठी विक्रमी ठरली. त्याने या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने ५९४ डावातच हा पराक्रम केलाय त्यामुळे तो सर्वात कमी डाव खेळताना २७ हजार धावा करणारा फलंदाज ठरला.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने ६२३ डावात २७ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. शाकिबसाठी मात्र ही मालिका फारशी चांगली ठरली नाही. त्याला ४ डावात ६६ धावाच करता आल्या, तर ४ विकेट्सच घेता आल्या.
शाकिबची कारकिर्द
शाकिबने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७१ सामने खेळले आहेत. त्याने १३० डावात ३७.७७ च्या सरासरीने ४६०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५ शतकांचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २४६ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने १९ वेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोनवेळा सामन्यांमध्ये १० विकेट्सही पूर्ण केल्या होत्या.