भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. या लढतीत विराट कोहलीने ८४ धावांची सुंदर खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. याशिवाय, विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी काही विक्रमही केले.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८४ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना ८,००० धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकर यांच्यानंतर विराट कोहली धावांचा पाठलाग करत ८,००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने २३६ सामन्यांत ८,७२० धावा केल्या, तर विराट कोहलीने १६६ सामन्यांत ८,०६३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने १५५ सामन्यांत ६,११५ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२३), एकदिवसीय विश्वकरंडक (२०२३), टी-२० विश्वकरंडक (२०२४) आणि चॅम्पियन्स करंडक (२०२५) या चारही मालिकांच्या अंतिम फेरीत संघाला स्थान मिळाले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार आहे.
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत १६१ झेल घेतले आहेत. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या १६० झेलांना मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल महेला जयवर्धनेच्या नावावर आहेत. त्याने २१८ झेल घेतले आहेत.
रोहित शर्माने आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने ४२ डावांमध्ये ६५ षटकार मारले आहेत. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ५१ डावांमध्ये ६४ षटकार मारले होते. आता रोहित शर्मा याचा विक्रम पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकर यांच्या आयसीसी स्पर्धांमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही मागे टाकला आहे. सचिन तेंडुलकर यांनी २३ अर्धशतकं केली होती. तर विराट कोहलीने २४ अर्धशतकं करून पहिल्या स्थानावर झेप घेतली. याशिवाय, विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये सातव्यांदा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. सर्वाधिक सामनावीर पुरस्कार सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकर यांनी १० सामनावीर पुरस्कार पटकावले आहेत.