पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटची पदकाची याचिका फेटाळल्यामुळे कुस्तीप्रेमी नाराज आहेत. पण, भारताच्या युवतींनी १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी चार सुवर्णपदकांची कमाई केली.
अदितीने २०२४च्या जागतिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तिने ४३ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये ग्रीसनच्या मारिया लोईसा ग्किकाचा ७-० असा सहज पराभव केला. जॉर्डन येथे ही स्पर्धा सुरू आहे आणि ५७ किलो वजनी गटात नेहाने निर्विवाद वर्चस्व गाजवताना भारतासाठी दुसरे सुवर्णपदक निश्चित केले. तिने जपानच्या सो त्सुत्सुईचा १०-० असा एकतर्फा पराभव केला.
६५ किलो वजनी गटात अम्मानने अटीतटीच्या लढतीत डारिया फ्रोलोव्हाचा ६-३ असा पराभव करून तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. चौथे सुवर्ण ७३ किलो वजनी गटात आले आणि मानसी लाथेरने ५-० अशा फरकाने हॅन्ना पिर्स्कायाचा पराभव केला.
दरम्यान, श्रृतिका पाटिलने ४६ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करताना कझाकस्तानच्या मेडिना कुनीश्बेकवर २-१ असा रोमहर्षक विजय मिळवला. काजलने ६९ किलो वजनी गटात इजिप्तच्या रहमा मॅगडीचा ४-३ असा पराभव करून सुवर्णपदकाच्या लढतीत एन्ट्री घेतली आहे. बाला राजला ४० किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत एलेक्सांड्रा फेडोरोव्हाकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला.