विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट टीमचे मायदेशी जल्लोषात स्वागत

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 4 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

T20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाचे मायदेशी आगमन झाले. दिल्लीत संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिल्लीत उतरताच टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदन करत खेळाडूंचा सत्कारही केला. यावेळी इंडियन टीमने मोदींना वर्ल्डकपची ट्रॉफी दाखवली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. यासंदर्भात मोदींनी ट्वीटदेखील केले आहे. या ट्वीटमध्ये पंतप्रधान लिहितात,'आपल्या चॅम्पियन्सशी अविस्मरणीय भेट झाली. यावेळी स्पर्धेतील अनुभवांविषयी खेळाडूंशी संस्मरणीय संवाद झाला.'
पंतप्रधानांच्या भेटीनंतर भारतीय संघ मुंबईला निघण्यासाठी रवाना झाला आहे.  

तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. तब्बल दशकाचा दुष्काळ संपवून भारताने हा वर्ल्डकप जिंकला. यामुळे संपूर्ण देशभर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज पहाटेच्या वेळी विजयी ट्रॉफीसह टीम इंडिया मायदेशात दाखल झाली. यावेळी दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून मोठा जल्लोष करत टीमचे स्वागत करण्यात आले. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली गर्दी, चाहत्यांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. यासंदर्भातील काही व्हिडिओ  सोशल मिडियावर वायरल होत आहे. टीम इंडियाचे दिल्लीमधील आयटीसी मोर्य हॉटेलमध्ये आगमन होताच याठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पाहायला  मिळाली. 

मुंबई येथे टीम इंडियाची भव्य रॅली 
मुंबईमध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. निश्चितच मोठ्या प्रमाणात चाहते आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. वानखेडे स्टेडीयमवर टीम इंडियाला  बीबीसीआयने जाहीर केलेल १२५ कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहेत.  

चार दिवसानंतर आगमन
गेले चार दिवस टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. याठिकाणी आलेल्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे टीम इंडियाला आपल्या रुमच्या बाहेर येणे देखील कठीण झाले होते. अखेर टीम इंडियाचा मायदेशी येण्याचा मुहूर्त लागला. एअर इंडियाचे चार्टड फ्लाईट टीम इंडियाला घेण्यासाठी गेले होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारस हे विमान दिल्ली विमानतळावर उतरले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter