ऑलिम्पिकचे यजमानपद हेच लक्ष्य - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारत २०३६ मधील ऑलिंपिक यजमान पद भूषवण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याबद्दलचे संकेत वेळोवेळी देण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले, ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असताना तेथील आयोजनाचा आढावा घ्या. २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तुमच्याकडून मिळालेली माहिती ऑलिंपिक आयोजन यशस्वी होण्यासाठी मोलाची ठरणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन व्हिडीआेद्वारे भारतीय खेळाडूंना ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सर, हॉकी, नेमबाजी या खेळांतील खेळाडू उपस्थित होते. तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा व केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया हेही उपस्थित होते. 

नरेंद्र मोदी यांनी या वेळी भारतीय खेळाडूंकडे आवाहन केले की, ऑलिंपिकदरम्यान तुमची स्पर्धा सुरू असताना फक्त खेळाकडे लक्ष द्या, पण तुम्हाला मोकळा वेळ मिळाल्यास तेथील वातावरण, सुविधा, व्यवस्थापनावर नजर टाका. आपण २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनासाठी प्रयत्न करीत आहोत. ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धांच्या आयोजनात आपण कुठेही कमी पडलो नाही पाहिजे.

नीरज चोप्रा याने भारतीय पथकात असलेल्या इतर खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढवला. तो म्हणाला, टोकियो हे माझे पहिले ऑलिंपिक होते, पण माझा सराव चांगला झाला होता. त्यामुळे बिनधास्त होऊन स्पर्धेत उतरलो. सुवर्णपदक पटकावले. मला भारतीय खेळाडूंना एवढेच सांगावेसे वाटते की, कुणालाही घाबरू नका. स्वत:वर विश्‍वास ठेवा. युरोपियन किंवा अमेरिकन ही आपल्यासारखीच माणसे आहेत. आपण प्रदीर्घ काळ कुटुंबीयांपासून दूर राहतो. ५० किलो वजनी गटात सहभागी होणारी महिला बॉक्सर निखत झरीन हिनेही देशवासीयांचा विश्‍वास सार्थ ठरवायचा आहे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच भारतीय हॉकीपटूंकडून सलग दुसरे पदक पटकावण्याची इच्छा बोलून दाखवण्यात आली. दरम्यान महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सलग तिसरे पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करीन, असे विश्‍वासाने सांगितले.

१५ ऑगस्टला भेटू
नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकविजेती कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचसोबत पॅरिस ऑलिंपिक संपल्यानंतर १५ ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये खेळाडूंना बोलावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आश्‍वासनही नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter