आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पुढल्या वर्षी (२०२५) पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्थात तेथील सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्यास व इतर क्रिकेट मंडळांचा तेथे खेळण्यास होकार असल्यास त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे सध्या तरी या स्पर्धेचे अंतिम स्थळ निश्चित झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा संघ पाकिस्तानात खेळायला जाणार की नाही, असा प्रश्न बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना केला असता ते म्हणाले, चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानात खेळायला जायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
केंद्र सरकार याबाबतचा निर्णय घेईल. राजीव शुक्ला याप्रसंगी स्पष्ट करतात की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकांबाबतचा निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून असतो. कोणत्या मालिकांमध्ये खेळायचे आणि कोणत्या मालिकांमध्ये खेळू नये याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच घेते. पाकिस्तानातील चॅम्पियन्स करंडकाबाबतही आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहोत. त्यांच्या निर्णयाचे आम्ही पालन करू.
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात येणार असले तरी तेथील सुरक्षा व्यवस्था व इतर क्रिकेट मंडळांच्या नाराजीमुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशियाई करंडकही याच पद्धतीने खेळवण्यात आला. भारतीय संघाच्या लढती श्रीलंकेत पार पडल्या, तसेच पाकिस्तानातही काही सामने खेळवण्यात आले. बीसीसीआयसह इतर देशांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यास श्रीलंका किंवा दुबई येथे ही स्पर्धा हलवण्यात येऊ शकते.
आयसीसी स्पर्धांमध्येच आमने-सामने
■ भारतामध्ये २००८ मध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात द्विपक्षीय मालिका खेळायला गेलेला नाही, तसेच गेली अनेक वर्षे भारत - पाकिस्तान यांच्यामध्ये फक्त आयसीसी स्पर्धाअंतर्गत लढत पाहायला मिळत आहे. मागील वर्षी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वकरंडकात सहभागी होण्यासाठी भारतात आला होता. त्या वेळी सात वर्षांनंतर त्यांचा संघ भारतात आला.