T20 World Cup 2024 : भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौर

 

भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यातील पराभव हरमनप्रीत कौरच्या संघाला महागात पडला. तरीही भारताने सलग दोन सामने जिंकून आशा पल्लवीत केल्या होत्या, पंरतु गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघाला कधी नव्हे ते पाकिस्तानवर विसंबून राहावे लागेल. त्यांनीही विश्वासाला तडा दिलाच.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड हा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. भारत आणि न्यूझीलंड हे प्रत्येकी ४ गुणांसह अ गटातून उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते. ऑस्ट्रेलियाने मागील सामन्यात भारताला नमवून उपांत्य फेरी पक्की केली होती. त्यामुळे पाकिस्तानने विजय मिळवला असता तर भारत सरस नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचला असता. पाकिस्तानने प्रतिस्पर्धी न्यूझीलंडला ११० धावांवर रोखून भारतीयांना स्वप्न दाखवले.

पाकिस्तानी संघाने या सामन्यात ८ झेल टाकले. तरीही त्यांनी न्यूझीलंडला ६ बाद ११० पर्यंतच पोहोचू दिले. सुझी बॅट्स ( २८), ब्रूक हेलिडे (२२), सोफी डिव्हाइन ( १९) आणि जॉर्जिया प्लिमर ( १७) यांनी धावसंख्येत हातभार लावला. पाकिस्तानच्या नाश्रा संधूने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने १११ धवांचे लक्ष्य ११.३ षटकांत पार केले असते तर ते उपांत्य फेरीत पोहोचले असते. पण त्यांनी ११.४ षटके खेळली. मात्र न्यूझीलंडला हरवण्यात ते अपयशी ठरले.

पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५६ धावांत तंबूत परतला आणि न्यूझीलंडने ५४ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताचे आव्हानही संपले. २०१६ च्या ट्वेन्टी २० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ प्रथमच साखळी फेरीतून बाहेर गेला, तर न्यूझीलंडने २०१६नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter