T20 : भारताचा बांगलादेशवर सहज विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 18 d ago
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या

 

भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. ग्वाल्हेरला झालेल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने ११.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केला.

भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. या दोघांनीही सुरुवात आक्रमक केली. मात्र दुसऱ्याच षटकात ७ चेंडूत १६ धावांवर असताना अभिषेक धावबाद झाला. पण त्यानंतर संजू सॅमसनला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली.

सूर्यकुमारनेही सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात केली. त्यांनी भारताला ५ षटकांच्या आतच ६० धावांचा टप्पा पार कडून दिला होता. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच सूर्यकुमारला मुस्तफिजूरने जाकर अलीच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे सूर्यकुमार १४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह २९ धावा करून बाद झाला.

त्यानंतर लगेचच मेहदी हसन मिराजने आठव्या षटकात संजू सॅमसनलाही बाद केले. सॅमसनने १९ चेंडूत २९ धावा केल्या. नंतर हार्दिक पांड्या आणि पदार्पणवीर नितीश कुमार रेड्डी यांनी आणखी विकेट जाऊ न देता आक्रमक शॉट्स घेत भारताला विजयापर्यंत नेले. हार्दिक १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला. नितीश रेड्डी १६ धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताचे गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने चांगली झुंज दिली.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहदी हसन मिराजने शेवटपर्यंत नाबाद राहत ३५ धावांची खेळी केली. ही बांगलादेशच्या डावातील सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्याशिवाय फक्त कर्णधार नजमुल हुसैन शांतोने २५ धावांचा टप्पा ओलांडला. त्याने २७ धावांची खेळी केली. तसेच तौहिद हृदोयने १२, रिशाद हुसैनने ११ आणि तस्किन अहमदने १२ धावा केल्या. बांगलादेशचा डाव १९.५ षटकात १२७ धावांवर संपला.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. आता पुढील सामना ९ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे खेळवला जाणार आहे. हा सामना देखील भारतीय प्रमाणेवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता चालू होईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter