दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कप फायनलनंतर तो टेनिस कोर्टवरून निवृत्ती घेणार आहे. स्पॅनियार्ड गेल्या काही वर्षांत दुखापतींशी झुंजत आहे आणि २०२३ मध्ये त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. आज त्याने तशी घोषणा केली.
३८ वर्षीय राफेलने कारकीर्दित २२ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्याने म्हटले की,'मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मागील काही वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक होती, हे सत्य आहे. मला वाटत नाही की मी मर्यादांशिवाय खेळू शकलो आहे.हा साहजिकच कठीण निर्णय आहे, ज्यासाठी मला थोडा वेळ लागला आहे.''
राफेलने २००९ व २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वोत्तम १४ जेतेपदं नावावर केली आहेत. विम्बल्डनची( २००८ व २०१०) दोन आणि अमेरिकन ओपन ( २०१०, २०१३, २०१७ व २०१९) चार जेतेपदं त्याने जिंकली आहेत.
- सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये राफेल नदाल ( २२) दुसऱ्या स्थानावर आहे
- टेनिसच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदं जिंकणाऱ्या खेळाडूंमध्येही राफेल नदाल ( ५९) दुसऱ्या स्थानावर आहे
- ATP Ranking मध्ये राफेल नदाल ९१२ आठवडे टॉप टेनमध्ये होता.
- लाल मातीत त्याने सर्वाधिक ६३ जेतेपदं जिंकली आहेत आणि त्यात १४ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदांचा समावेश आहे.
राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या तीन दिग्गजांचा खेळ पाहून टेनिसच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. फेडररनंतर नेस्ट बेस्ट असे नदालला म्हटले गेले आणि त्याने त्याच्या खेळातून ते सिद्धही केले. त्याला टक्कर देण्यासाठी नोव्हाक कोर्टवर होताच. पण, या तिघांनी एक दशक गाजवले आणि आता त्यांच्या निवृत्तीचे सत्र सुरू झाले आहे. वयाची २० ओलांडण्यापूर्वीच राफेलने १६ जेतेपदं नावावर केली होती आणि त्यात फ्रेंच ओपन स्पर्धेचाही समावेश होता.२००८च्या विम्बल्डन फायनलमध्ये फेडररला पराभूत करून तो चर्चेत आला आणि त्यावेळी त्याने जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानही पटकावले.