दहा वर्षांनंतर बॉर्डर गावसकर करंडक पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ.
भारतीय क्रिकेट संघावर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. यजमान ऑस्ट्रेलियन संघाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर गुंडाळून समोर उभे राहिलेले १६२ धावांचे आव्हान अवघे चार विकेट गमावत पूर्ण केले. पॅट कमिंसच्या कांगारू संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली. तब्बल दहा वर्षांनंतर त्यांनी बॉर्डर गावसकर करंडक पटकावला. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांनी प्रवेश केला. सिडनी कसोटीतील पराभवानंतर आता भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.
स्कॉट बोलंड आणि पॅट कमिंस या दोघा गोलंदाजांनी मिळून ३२ षटके मारा केला आणि ९ भारतीय फलंदाजांना बाद केले. एवढेच नव्हे तर भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर संपवून ऑस्ट्रेलियन संघाला विजयाची संधी निर्माण करू दिली. पाठीच्या दुखापतीने त्रस्त जसप्रीत बुमराला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. मनात भीती निर्माण करणारा गोलंदाज मारा करायला समोर नाही म्हटल्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी संधी साधली. खूप सहजी नाही पण गरजेच्या १६२ धावा चार विकेट्स गमावून यजमान संघाने सिडनी कसोटीत विजय संपादला. सामन्याचा मानकरी स्कॉट बोलंड, तर मालिकेचा मानकरी जसप्रीत बुमराला घोषित करण्यात आले.
रविवारी १४५ धावांच्या आघाडीत किती भर पाडणार, याच विचारांनी खेळाडू आणि प्रेक्षक सिडनी क्रिकेट मैदानाकडे उत्साहाने लागले सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या चालू होते.खेळातील पहिला तास महत्त्वाचा असल्याची सगळ्यांची भावना होती. कर्णधार पॅट कमिंसने आपल्या गोलंदाजीचा दर्जा, कौशल्य सिद्ध करून दाखवताना रवींद्र जडेजा आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरला बाद केले. एका बाजूने कमालीची सातत्यपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या स्कॉट बोलंडला यश मिळवायला थोडी वाट बघायला लागली; पण मोहम्मद सिराजला बाद केल्यावर जसप्रीत बुमराला बोल्ड करायला त्याने वेळ घेतला नाही. भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर संपला तेव्हाच ४०-५० धावा कमी असल्याची भावना मनात आली.
बोलंडने ६ बळी घेऊन दर्जा दाखवून दिला.कर्णधार बुमराच्या पाठीची दुखापत गंभीर असल्याने तो गोलंदाजी करायला मैदानावर आला नाही, तिथेच पहिला धक्का भारतीय संघाला लागला. जबाबदारीचे ओझे सिराज आणि प्रसिध कृष्णावर आले. छोट्या धावसंख्येचा बचाव करायला एकच तरणोपाय होता तो म्हणजे सतत फलंदाजांना बाद करायचे. त्यासाठी अचूक मारा करणे अपेक्षित असताना झाले उलटे, सिराज आणि प्रसिध कृष्णाने पहिल्या काही षटकांत दिशाहीन भारा केला, ज्याचा फायदा फलंदाजानी उचलला. नशिबाचा हवाला ठेवून फलंदाजी करणाऱ्या सॅम कॉनस्टास प्रसिध कृष्णाने बाद केले, तरीही ६.२ षटकांत ५० धावा लागल्या, ज्यात १३ धावा अतिरिक्त होत्या.
उगाचच आडवेतिडवे फटके मारणारा कॉनस्टास २२ धावांवर प्रसिधला बाद झाला. मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथची डाळ जास्त काळ शिजली नाही. दोघांनाही प्रसिधनेच झेल द्यायला भाग पाडले. स्मिथ १० हजार कसोटी धावांपासून फक्त एक धाव लांब राहिला. बुमराच्या गैरहजेरीत सिराज प्रसिधला प्रदीर्घ काळ गोलंदाजी करायला लागली. दोघांच्या गोलंदाजीच्या टप्प्यात सातत्य नसल्याने मध्येच मारायला सोपा चेंडू त्यांच्या हातून निसटत होता. उपाहाराला ३ बाद ७३ धावसंख्येवर एकच चर्चा चालू होती, ती म्हणजे बुमरा गोलंदाजीला हवा होता.
उपाहारानंतर सिराजला ख्वाजाची विकेट मिळाली. संपूर्ण मालिकेत साफ अपयशी ठरलेल्या ख्वाजाने जाता जाता ४१ धावा केल्या. दोन प्रमुख गोलंदाज प्रत्येकी १० षटकांचा सलग मारा करून थकून गेले. बो वेबस्टर आणि ट्रॅव्हीस हेडने त्याचा फायदा घेत पटापट धावा जमा करणे चालू केले. दोघा फलंदाजांनी कडक फटकेबाजी करून संघाला विजयी केले.
... अन् संधी दूर गेली
पाच कसोटी सामन्यांच्या नऊ डावांत ज्या जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हादरवून सोडले होते, त्याच बुमराला अगदी नको त्या वेळी पाठीत चमक भरली आणि सिडनी कसोटी सामन्यात काही तरी कमाल करून दाखवायची संधी लांब गेली. बुमराच्या पाठीची दुखापत वाढली त्या पेक्षा गंभीर निघाली. असे समजले की बुमराने त्याच्या पाठीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी रात्री संपर्क साधला ज्याने विचारांती बुमराला खेळू नकोस, कारण दुखापत अजून गंभीर रूप धारण करू शकते, असा सल्ला दिला. तिसऱ्या दिवशी खेळ चालू होण्याअगोदर बुमराने वॉर्मिंग अप केले नाही, तेव्हाच कळून चुकले की तो चौथ्या डावात गोलंदाजी करणार नाही.
कसोटी सामना बघायची महिलांची परंपरा
कसोटी सामन्याला उत्साहाने हजेरी लावणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांत खूप मोठ्या प्रमाणात महिला दिसतात. आम्हाला कसोटी सामन्यांचे बाळकडू पालकांकडून मिळाले आहे, सिमोन नावाची महिला सांगत होती. आमच्याकडे कसोटी सामना बघायला संपूर्ण कुटुंब जात असे. लहान असताना मैदानावर आले की नुसते वडीलच नाही तर आईसुद्धा क्रिकेटचे बारकावे सहजी समजावून सांगायची. त्यामुळे कसोटी क्रिकेटची गोडी अगदी लहान वयात लागली ती अजून कायम आहे. अर्थात एकदिवसीय आणि बिग बॅशसुद्धा आम्ही बघतो; पण खरे मन फक्त कसोटी सामन्यात रमते, कारण कसोटी सामन्यात क्रिकेटचे आणि खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू बघायला मिळतात, असे सिमोन म्हणाली.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव १८५ धावा, ऑस्ट्रेलिया डाव १८१ धावा, भारत पहिला दुसरा डाव १५७ धावा, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव चार बाद १६२ धावा (सॅम कॉनस्टस २२, उस्मान ख्वाजा ४१, ट्रॅव्हीस हेड नाबाद ३४, बो वेबस्टर नाबाद ३९, मोहम्मद सिराज १/६९, प्रसिद्ध कृष्णा ३/६५).