ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 भारतीय संघाची नुकतीच बीसीसीआय कडून घोषणा करण्यात आली. या संघात अनेक नवोदितांना आणि उत्कृष्ठ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड यालाही संधी मिळाली आहे. परंतु सर्वांचे लक्ष वेधले ते सहारनपूरच्या मोहम्मद अमानने. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अमानची अंडर-19 संघाच्या कर्णधार पदी निवड झाली. त्याच्या आजवरच्या प्रवासची ओळख करून देणारा हा विशेष लेख...
सहारनपुरच्या खानलमपुरा येथे २००६ मध्ये मोहम्मद अमानचा जन्म झाला. अमानचे वडील ट्रक ड्रायव्हरचे काम करायचे. त्याची घरची परिस्थिति अत्यंत नाजुक होती. अशा परिस्थितीत त्याने आई साहिबा आणि वडील मेहताब यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याचा आग्रह धरला. आई आणि वडिलांनी त्याला अकादमीत पाठवण्याचे मान्य केले, परंतु वस्तू विकत घेण्यासाठी पैसे नव्हते.
याविषयी बोलताना अमान म्हणतो, “आज माझ्या किटमध्ये सर्वात महागड्या बॅट आहेत. परंतु आईने मला दिलेली बॅट आजही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आणि खास आहे. ती बॅट ११०० रुपयांना खरेदी केली होती.” घराची आर्थिक परिस्थिति बेताची असताना क्रिकेटर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा अमान आज भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे.
अमानच्या क्रिकेटची सुरुवात
सहारनपूरच्या भुतेश्वर क्रिकेट मैदानापासून अमानने २०१४ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. याठिकाणी त्याला राजीव गोयल यांच्याकडून सुरुवातीचे क्रिकेटचे धडे मिळाले. अमानचा खेळ पाहून एसडीसीएचे अध्यक्ष मोहम्मद अक्रम यांनी त्याला प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवले. अमनने २०१६-१७ मध्ये अंडर-14, २०१७-१८ मध्ये १४ वर्षाखालील, २०१८-१९ मध्ये १६ वर्षाखालील, २०१९-२० मध्ये १६ वर्षाखालील आणि २०२२-२३ मध्ये अंडर-19 क्रिकेट खेळले आहे.
आई-वडिलांचा मृत्यू आणि घरची जबाबदारी
कोविड मध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यातीलच एक अमानचे कुटुंब. २०२० मध्ये अमानच्या आईचे तर २०२२ मध्ये वडिलांचे निधन झाले. अमानला तीन लहान भाऊ-बहिणी आहेत. त्या सगळ्यांची जबाबदारी पूर्णपणे अमानवर आली. या प्रसंगाची आठवण करून देताना अमान म्हणतो, "जेव्हा मी माझे वडील गमावले, तेव्हा मला असे वाटले की मी रातोरात मोठा झालो आहे. मी घरचा प्रमुख झालो.अंगावर येऊन पडलेल्या जबाबदारीमुळे मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी सहारनपूरमध्ये नोकरी शोधली, पण काहीच काम मिळाले नाही.”
या विषयी अमानचे प्रशिक्षक राजीव गोयल सांगतात,”अमानने कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी नोकरीची मागणी केली होती. त्याने मला ‘कोई कपडे के दुकन पे नौकरी लगा दो, घर में पैसे नहीं है’ असे सांगितले. या नंतर मी त्याला माझ्या अकादमीत येऊन तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सांगितले. मला जे जमलं ते मी केलं. त्यामुळे तो रोज आठ तास मैदानावर असायचा. या मेहनतीचे फळ मिळाले याचा मला आनंद आहे.” या कामाच्या माध्यमातून अमान खेळ आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत राहीला.
भुकेपेक्षा मोठे दुसरे दुःख नाही....
गरिबीने दिलेल्या चटक्यांमुळे अमान आणि त्याच्या भावंडांनी कित्तेक रात्री उपाशी पोटी काढल्या. या भयानक प्रसंगाविषयी बोलताना अमान म्हणतो, “भुकेपेक्षा मोठे दुसरे दुःख नाही...परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्न सुद्धा मिळत नव्हते. आजही मी माझे अन्न वाया घालवत नाही.”
पुढे तो म्हणतो,”आमच्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत कानपूरमध्ये चाचण्या सुरू होत्या. मी ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करायचो. आज जेव्हा मी विमानाने प्रवास करतो आणि चांगल्या हॉटेलमध्ये राहतो तेव्हा या सगळ्यासाठी मी देवाचे आभार मानतो.”
आई वडिलांच्या आठवणीत गहिवरला अमान
बीसीसीआय कडून भारतीय अंडर-19 संघाची घोषणा झाली. कर्णधार झाल्यानंतर मोहम्मद अमान आपल्या आई आणि वडिलांना आठवून रडला. तो म्हणाला, “आज आई आणि वडील हयात असते तर किती आनंद झाला असता. पुढे तो म्हणाला सहारनपूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अक्रम यांना येथे पोहोचण्याचे सर्वात मोठे श्रेय देतो. “अक्रम सर माझ्या पालकाप्रमाणे प्रत्येक पाऊलावर माझ्यासोबत उभे राहिले. तसेच माझे प्रशिक्षक राजीव गोयल सर यांनीही मला भरपूर मदत केली त्यासाठी मी त्यांचे देखील आभार मानतो.”
.. तरीही अमन ध्येयापासून दूर गेला नाही : मोहम्मद अक्रम
एसडीसीएचे अध्यक्ष मोहम्मद अक्रम म्हणतात की, “अमानला केवळ क्रिकेटची आवड नाही, तर तो पूर्णपणे क्रिकेटला समर्पित आहे. यामुळेच आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही तो आपल्या ध्येयापासून भरकटला नाही. त्याच्या यशाने मी खूप आनंदी आहे.”
निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले...
मोहम्मद अमान उत्कृष्ट फलंदाज आहे हे त्याने विविध स्पर्धेत दाखवून दिले. २०२३ मध्ये त्याला प्रथम उत्तर प्रदेश अंडर-19 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या कामगिरीच्या आधारे बीसीसीआयने त्याची चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत अ संघात निवड केली. अमानने चॅलेंजर ट्रॉफीमध्ये दोन शतके झळकावून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे त्याला आशिया कपसाठी अंडर-19 भारतीय संघात स्थान देण्यात आले. अमान सध्या यूपी टी-20 स्पर्धेत खेळत आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी अनाथ झालेल्या अमानपुढे दोनच पर्याय होते. एकतर क्रिकेट खेळत रहा, नाहीतर स्वप्न सोडून रोजंदारी मजूर बना. दोन वर्षांपूर्वी अनाथ झालेल्या अमानला क्रिकेट खेळण्यासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गरिबी आणि संकटांचा सामना करावा लागला. परंतु जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्याला जग जिंकता येते हेच मोहम्मद अमान याने सिद्ध केले आहे. पुढील प्रवासासाठी आवाज मराठी कडून अमानला शुभेच्छा.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा , हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter