रोहित शर्मा प्लेईंग ११ मधून बाहेर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सिडनीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शुक्रवारपासून (३ जानेवारी) सुरू होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या सामन्यात नाणेफेकीसाठी भारताचा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह आला होता. त्यामुळे या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान रोहित शर्माने विश्रांती घेतली असल्याचे जसप्रीत बुमराहने नाणेफेकीवेळी सांगितले.

दरम्यान आता रोहितने हा निर्णय का घेतला, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या जागेवर शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

दरम्यान, भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत रोहित शर्माबाबतच्या प्रश्नावर प्लेइंग इलेव्हन अजून ठरली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तेव्हापासूनच रोहित शर्मा खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाले होते.

गेल्या काही दिवसात भारतीय संघाच्या आणि रोहित शर्माच्या नेतृत्वावर आणि कामगिरीवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता रोहित सिडनी कसोटीत खेळणार नसल्याचे समजत आहे.

या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. रोहितव्यतिरिक्त आकाश दीप देखील प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. तो दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागेवर प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियानेही संघात एक बदल केला आहे. त्यांनी अष्टपैलू बियू वेबस्टर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याला मिचेल मार्शच्या जागेवर संधी मिळाली आहे. हा एकमेव बदल ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये झाला आहे. वेबस्टर याचे हे कसोटी पदार्पण देखील आहे.

या कसोटी मालिकेत पहिल्या चार सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला शेवटच्या कसोटीत विजय गरजेचाच आहे. तर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला तरी ते मालिका जिंकतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन
भारत - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसीद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया - सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, बियू वेबस्टर, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिच स्टार्क, नॅथन लायन, स्टॉट बोलंड