अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान विवाहबंधनात अडकला आहे. २६ वर्षीय राशिदने २०१५ मध्ये अफगाणिस्तानकडून पदार्पण केले होते आणि तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. तो जगभरातील सर्वच व्यावसायिक लीगमध्ये खेळतो... राशिद खान याने ३ ऑक्टोबर रोजी एका शानदार सोहळ्यात लग्न केले. राजधानी काबूलमध्ये झालेल्या लग्नात राशिदने पारंपरिक पश्तून प्रथा स्वीकारल्या.
त्याच्यासोबत त्याचे तीन भाऊ झकीउल्ला, नुमान आणि नसीम खान यांनीही निकाहसाठी हाच दिवस निवडला. काबूलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. अफगाणिस्तान संघाचे सीनियर खेळाडू मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई तसेच नजीबुल्ला झदरन, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान यांसारखे उदयोन्मुख खेळाडू या लग्नाला उपस्थित होते.
राशिदने अफगाणिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर लग्न करणार असल्याचे म्हटले होते. पण, त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत काल लग्न केले. राशिद खानने अफगाणिस्तानसाठी १०५ वन डे तसेच ५ कसोटी आणि ९३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ३७६ विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमधून ब्रेक
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या वने डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाठीवर शस्त्रक्रिया झाल्याने राशिद चार महिने मैदानाबाहेर होता. त्यानंतर झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले होते. तो संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने पाठीच्या दुखापतीमुळे कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठीच्या संघात त्याचा समावेश नव्हता.
शस्त्रक्रियेनंतर कामाचा ताण कमी करण्याला राशिदने प्राधान्य दिले आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला यूकेमध्ये द हंड्रेड स्पर्धेदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने पुढील सहा महिने ते एक वर्षापर्यंत कसोटी फॉरमॅट न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.