भारतात सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा देखील सुरू आहेत. नुकतीच दुलीप ट्रॉफी स्पर्धा पार पडली. त्यात मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत-अ संघाने ट्रॉफी जिंकली.
आता लगेचच ११ ऑक्टोबर पासून रणजी ट्रॉफीची घोषणा करण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफीसाठी जम्मू आणि काश्मीर संघाने १५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक दिवसांपासून मैदानाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही समावेश आहे.
भारतीय गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे मागच्या काही दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. आयपीएल २०२४ मध्ये उमरान शेवटचा खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर त्याची दुलीप ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली होती. परंतु स्पर्धेच्या काही दिवस आधी उमरानला डेंग्यूशी सामना करावा लागला. त्यामुळे त्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धा देखील खेळता आली नाही.
परंतु उमरान आता जम्मू आणि काश्मीर संघाकडून रणजी ट्रॉफीसाठी खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे स्पर्धेमध्ये तो चांगले प्रदर्शन करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
उमरान मागच्या हंगामात देखील रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळला होता आणि फेब्रुवारीमध्ये इथेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपला शेवटचा सामना खेळला होता. उमरानने आत्तापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याला एकूण १६ विकेट्स घेण्यात यश आले आहे.
जम्मू आणि काश्मीर रणजी संघाचे कर्णधारपद पारस डोग्रा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर पाच वर्ष एकही सामना न खेळलेल्या रसिख सलामला देखील संघात जागा देण्यात आली आहे.
रसिखने २०२४ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून चांगला खेळ केला होता. सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळणाऱ्या अब्दुल शामदला देखील संघात स्थान देण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीर रणजी संघ:
पारस डोग्रा (कर्णधार) शुभम खजुरीया (उपकर्णधार) , अहमद बंदे, अभिनव पुरी, विवरांत शर्मा, शुभम पुंडीर, अब्दुल शामद, शिवांश शर्मा (यष्टिरक्षक), साहिल लोत्रा, अबिद मुस्ताक, उमरान मलिक, रोहित शर्मा, युधविर सिंग, अकिब नबी, रसिख सलाम.