Ranji Trophy: जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदचे दोन्ही डावांमध्ये शतक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 30 d ago
अब्दुल समद
अब्दुल समद

 

भारतात सध्या रणजी ट्ऱॉफी २०२४ स्पर्धा सुरू असून दुसऱ्या फेरीत जम्मू-काश्मीर आणि ओडिशा संघात सामना सुरू आहे. हा सामना २२ वर्षीय अब्दुल समदने दोन शतकं करत गाजवला आहे. त्याने यासह एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. कटकमधील बाराबाती स्टेडियमवर हा सामना होत आहे.

पहिल्या डावात समद चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यावेळी त्याने आक्रमक खेळी करताना ११७ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ९ षटकार मारले.

त्याचबरोबर दुसऱ्या डावातही समदने चौथ्या क्रमांकावर खेळताना आक्रमकच फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात १०८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी केली. त्यामुळे समद एकाच रणजी ट्रॉफी सामन्यात दोन शतके करणारा जम्मू-काश्मीर संघाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

याशिवाय त्याने दोन्ही डावात फलंदाजी करताना एकूण १५ षटकार खेचले. त्यामुळे एका प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो युसूफ पठाणसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. युसूफने २००९-१० हंगामात वेस्ट झोनकडून साऊथ झोनविरुद्ध खेळताना १५ षटकार मारले होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर तन्मय अग्रवाल आहे, त्याने हैदराबादसाठी २०२३-२४ हंगामात अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना तब्बल २६ षटकार मारले होते. तसेच दुसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत असून त्याने दिल्लीसाठी २०१६-१७ हंगामात झारखंड विरुद्ध २१ षटकार मारले होते.

सामना रोमांचक वळणावर
जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात समदच्या शतकानंतर सर्वबाद २७० धावा केल्या होत्या. समद व्यतिरिक्त कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. ओडिशाकडून सुमीत शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ओडिशाकडूनही पहिल्या डावात कर्णधार गोविंदा पोद्दारने नाबाद १३३ धावा केल्या. त्यामुळे ओडिशा सर्वबाद २७२ धावांपर्यंत पोहचू शकले. यामुळे ओडिशाला २ धावांची आघाडीही मिळाली.

दुसरा डाव जम्मू-काश्मीरने समदच्या शतकानंतर ७ बाद २७० धावांवर घोषित केला. त्यामुळे अखेरच्या दिवशी ओडिशासमोर विजयासाठी २६९ धावांचे लक्ष्य आहे. मात्र या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अखेरीस ओडिशाने १५ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या आहेत. त्यांना आता उर्वरित दोन सत्रात अद्याप २५४ धावांची विजयासाठी गरज आहे.

इरफान पठाणने समदमधील कौशल्य ओळखले
समद जम्मू-काश्मीर संघातील आता नियमित खेळाडू आहे. पण त्याच्यातील क्षमता सर्वात आधी ओळखली ती भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने. २०१८ दरम्यान इरफान जम्मू काश्मीरचा मेंटॉर होता, तेव्हा त्याने त्याला एका कॉलेज ग्राऊंडवर खेळताना पाहिले होते.

त्यानंतर २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात संधी दिली. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ५० सामन्यांमध्ये ५७७ धावा केल्या आहेत, तर २ विकेट्स घेतलया आहेत. त्याने २५ प्रथम श्रेणी सामने आत्तापर्यंत खेळले असून ६ शतकांसह १२०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ७ विकेट्सही घेतल्या आहेत.