टीम इंडियाला आर अश्विनचा अलविदा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
आर अश्विन
आर अश्विन

 

बुधवारचा दिवस भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरला. भारताचा ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर लगेचच भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अश्विनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले की अश्विनने यापूर्वीच तो निवृत्ती घेणार असल्याची कल्पना दिली होती. दरम्यान ३८ वर्षीय अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याचे यशस्वी कारकि‍र्दीबद्दल अभिनंदन केले आहे.

भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने लिहिले की 'एक युवा गोलंदाज ते दिग्गज होण्यापर्यंतचा प्रवास पाहण्याची मला संधी मिळाल्याचा आनंद आहे. तू असा क्रिकेटपटू आहे, ज्याला कधीही ट्रेड करू शकत नाही. मला माहित आहे अशी एक पिढी येईल, जी म्हणेल की आम्ही अश्विनला पाहून गोलंदाज झालो. तुझी कमी जाणवेल.'

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने लिहिले, 'मी तुझ्यासोबत १४ वर्षांपासून खेळलो आहे. जेव्हा तू मला सांगितलंस की तू निवृत्त होत आहेत, तेव्हा मी भावुक झालो आणि मला आपण एकत्र खेळतानाचे अनेक क्षण आठवले. तुझ्यासोबत खेळतानाचा संपूर्ण प्रवासाचा मी आनंद घेतला.'

'तुझे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदान आणि कौशल्य कोणापेक्षाही कमी नाही आणि तू नेहमीच भारतीय क्रिकेटमधील दिग्गज म्हणूनच लक्षात राहशील. तुला आणि तुझ्या कुटुंबाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तुला आणि तुझ्या जवळच्यांसाठी खूप प्रेम. तू दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार.'

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज नॅथन लायनने म्हटले आहे की 'माझ्या मनात अश्विनबद्दल फक्त आदर आहे. अश्विनचा गेली अनेक वर्षे मैदानात आणि मैदानाबाहेर जसा वावर राहिला आहे आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य अतुलनीय आहे. आमचे वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळी मतं आहेत, पण यात कोणीच बरोबर आणि चुकीचं नाही.'

'पण अश्विनसारख्या खेळाडूसोबत माझा जो गोलंदाज म्हणून संवाद होतो, तो मस्त आहे. आम्ही दोघेही खूप वेगळे आहोत. आमची आज सकाळी झालेली चर्चाही छान होती. मला आशा आहे या मालिकेत आणि यापुढेही आमच्या अशा चर्चा होत राहतील.'

अश्विन भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकांचा गोलंदाज आहे. अश्विनने त्याच्या कारकि‍र्दीत १०६ कसोटी सामने खेळले असून कसोटीमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ६ शतकांसह ३५०३ धावाही केल्या आहेत.

अश्विनने ११६ वनडे सामने खेळले असून १५६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ७०७ धावाही केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ६५ सामने खेळलेत. त्याने ७२ विकेट्स घेतल्या आहेत.