भारताच्या दिव्यांग संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय क्रीडासंस्कृतीला एक मोठा आदर्श मिळाला आहे आणि देशभरात दिव्यांग क्रीडापटूंसाठी एक प्रेरणा बनली आहे. मंगळवारी भारत आणि इंग्लंड संघात हा अंतिम सामना पार पडला.
दोन्ही संघ तुल्यबळ संघ असल्याने हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता होती. पण भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७९ धावांनी विजय मिळवला आणि साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढला. यासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.
या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी २० षटकात १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १९.२ षटकात ११८ धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडला पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही.
इंग्लंडकडून ऍलेक्स हेमंडने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याने या ३५ धावा ३५ चेंडूत केल्या. त्याच्या व्यतिरिक्त इंग्लंड कोणालाही फार खास काही करता आले नाही. भारताकडून राधिक प्रसादने शानदार गोलंदाजी करताना १९ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी भारतीय संघाने फलंदाजी केली होती. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९७ धावा केल्या. भारताकडून योगेंद्र भदोरियाने सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ही वादळी खेळी केली. याशिवाय माजिद मरग्रेने १९ चेंडूत ३३ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीतही ऍलेक्स हेमंड चमकला. त्याने ३० धावात २ विकेट्स घेतल्या.
भारताने या स्पर्धेत ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान, इंग्ंलड, श्रीलंका यांना पराभूत केले होते. पाकिस्तानला दोनदा भारताने या स्पर्धेत पराभूत केले होते. तसेच श्रीलंकेलाही भारताने दोनदा हरवलं.
मात्र इंग्लंडने भारताला दुसऱ्या सामन्यात पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत पुन्हा भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते. अखेर अंतिम सामन्यात भारतानेच बाजी मारली.
विक्रांत केणी याने या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने मिळवलेल्या या यशाचे सध्या देशभरातून कौतुक होत आहे. भारतीय संघाने विजेतेपद जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशनही केले.