पॅरिस पॅरालिंपिक : भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 8 d ago
भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नवदीप सिंग,ब्राँझपदक पटकावणारी सिमरन शर्मा व तिचे प्रशिक्षक अभय सिंग
भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नवदीप सिंग,ब्राँझपदक पटकावणारी सिमरन शर्मा व तिचे प्रशिक्षक अभय सिंग

 

पॅरिस : भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले. भारताने या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात एकूण २९ पदकांवर मोहोर उमटवली. यामध्ये सात सुवर्ण, नऊ रौप्य व १३ ब्राँझपदकांचा समावेश आहे. नवदीप सिंग याने शनिवारी मध्यरात्री भालाफेकीत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तसेच सिमरन शर्मा हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक पटकावले.

पुरुषांच्या भालाफेक एफ ४१ या क्रीडा प्रकारात इराणच्या सदेग सयाह याने ४७.६४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, मात्र या स्पर्धेदरम्यान विवादास्पद झेंड्याचे तो प्रदर्शन करीत होता. यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आले. भारताच्या नवदीप सिंग याने ४७.३२ मीटर भाला फेकून रौप्यपदक आपल्या नावावर केले होते, मात्र इराणचा खेळाडू सदेश हा अपात्र ठरल्यामुळे नवदीपच्या रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर झाले. भारताला त्याने पॅरालिंपिकमधील सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. चौनच्या सून पेंग याने ४४.७२ मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावले.

पॅरिस पॅरालिंपिकमधील भारतीय विजेते
सुवर्णपदक : अवनी लेखरा (नेमबाजी), नितेशकुमार (बॅडमिंटन), हरविंदर सिंग (तिरंदाजी), सुमीत अंतिल, धरमबोर चैत, प्रवीणकुमार व नवदीप सिंग (सर्व अॅथलेटिक्स). 
रौप्यपदक: मनीष नरवाल (नेमबाजी), निशादकुमार, योगेश कथुनिया,अजितसिंग यादव, शरदकुमार, सचिन खिलारी व प्रणव सुरमा (सर्व
अॅथलेटिक्स), टी. मुरुगेसन व सुहास यथिराज (बॅडमिंटन). 
ब्राँझपदक : मोना अगरवाल, रुबिना फ्रान्सिस (दोन्ही नेमबाजी), प्रीती पाल (दोन पदके), दीप्ती जीवानजी, मरियप्पन थांगवेलू, सुंदर सिंग गुर्जर, होकातो सेमा, सिमरन शर्मा (सर्व अॅथलेटिक्स), मनीषा रामदास व नित्या सिवन (दोन्ही वंडमिंटन), कपिल परमार (ज्युदो), शीतल देवी- राकेशकुमार (तिरंदाजी)

चीन, ग्रेटब्रिटन, अमेरिकेचे वर्चस्व
पॅरिस पॅरालिंपिकमध्ये चीन, ग्रेटब्रिटन व अमेरिकेचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले. चीनच्या खेळाडूंनी २२० पदकांसह पहिले स्थान पटकावले. ग्रेटब्रिटनच्या खेळाडूंनी १२४ पदकांसह दुसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या खेळाडूंनी १०५ पदकांची कमाई करताना तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली.

भारत १८व्या स्थानी
भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये २९ ऐतिहासिक पदके पटकावली. यामध्ये सात सुवर्णपदकांचा समावेश आहे. शिवाय भारतीय खेळाडूंनी नऊ रौप्यपदके व १३ ब्राँझपदकेही जिंकली. भारतीय संघ पदकतालिकेत १८व्या स्थानावर राहिला.

सिमरनला ब्राँझपदक
भारताच्या सिमरन शर्मा हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक पटकावले. तिने २४.७५ सेकंदात शर्यत पूर्ण करीत तिसरा क्रमांक पटकावला. ओमारा ड्युरैड हिने २३.६२ सेकंदात शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. पाओला पेरेझ हिने २४.१९ सेकंदात शर्वत पूर्ण करताना रौप्यपदकावर नाव कोरले.

पूजा ओझाकडून निराशा
भारताच्या पूजा ओझा हिला पॅरिस पॅरालिंपिकच्या अखेरच्या दिवशी निराशेला सामोरे जावे लागले. तिला कॅनोईंग या क्रीडा प्रकारातील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटातून अव्वल तीन खेळाडूंना पुढे चाल मिळाली. त्यामुळे तिला शर्यतीमधून बाहेर यावे लागले.