Paris Olympic 2024 : ४४ वर्षांनंतर सुवर्ण जिंकण्याचा ध्यास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
Paris Olympic 2024
Paris Olympic 2024

 

टोकियोमध्ये ऑलिंपिक पदक पटकावण्याचा दुष्काळ संपवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये सलग दुसरे पदक पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

त्यानंतर आता ४४ वर्षे उलटून गेली तरीही भारतीय पुरुष हॉकी संघाला एकही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. भारतीय पुरुष हॉकी संघ यंदा पदकाचा रंग बदलण्यासाठी हॉकीच्या मैदानात उतरेल यात शंका नाही. भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलामीचा सामना आज (ता. २७) न्यूझीलंडशी होणार आहे.

भारतीय हॉकी संघाचा ब गटात समावेश आहे. या गटात मागील ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेते बेल्जियम, बलाढ्य ऑस्ट्रेलिया यांच्यासह अर्जेंटिना, न्यूझीलंड व आयर्लंड या देशांचाही समावेश आहे. अ गटामध्ये नेदरलँड्‌स, जर्मनी, ग्रेटब्रिटन, स्पेन, फ्रान्स व दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील सर्वोत्तम चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत.

हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. भारताच्या या संघात ११ ऑलिंपिक पदकविजेते खेळाडू आहेत. जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, राजकुमार पाल व संजय हे पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये खेळणार आहेत. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश पॅरिस ऑलिंपिकनंतर निवृत्त होणार आहे. हरमनप्रीतची सेना श्रीजेशला कायमस्वरूपी लक्षात राहील, अशी 'सुवर्ण'भेट देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसू शकेल.

खेळाडू व जबाबदारी
पी. आर. श्रीजेश अखेरची स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे गोलरक्षक म्हणून तो ठसा उमटवेलच. कर्णधार हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमीत, जर्मनप्रीत सिंग व संजय या हॉकीपटूंच्या खांद्यावर बचावाची जबाबदारी असणार आहे.
मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद मधल्या फळीत चमक दाखवतील. ललीत उपाध्याय, मनदीप सिंग, गुर्जंत सिंग, अभिषेक व सुखजीत यांच्यावर गोल करण्याची जबाबदारी असणार आहे. हरमनप्रीत हा जगातील सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे पेनल्टी कॉर्नर मिळाल्यास त्याच्याकडे गोल करण्याची संधी असेल.

हॉकी खेळाची गटवारी
अ - नेदरलँड्‌स, जर्मनी, ग्रेटब्रिटन, स्पेन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका
ब - भारत, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, आयर्लंड

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या लढती
२७ जुलै - न्यूझीलंड
२९ जुलै - अर्जेंटिना
३० जुलै - आयर्लंड
१ ऑगस्ट - बेल्जियम
२ ऑगस्ट - ऑस्ट्रेलिया

 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter