Paris Olympic 2024 : भारतीय तिरंदाज साधणार अचूक निशाणा?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारतीय तिरंदाज यंदा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताचे सहाही तिरंदाज पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरले असून २०१२ लंडन ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. तिरंदाजीतील पाचही प्रकारांतील स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या भारतीय तिरंदाजांकडून यंदा पदक जिंकण्याच्या मोठ्या आशा व्यक्त केल्या जात आहेत. १९८८मध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय तिरंदाजांना ऑलिंपिकमध्ये अद्याप एकही पदक पटकावता आलेले नाही. यंदा तिरंदाजांचा बाण अचूक लक्ष्य साधतो का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महिला व पुरुष या दोन्ही वैयक्तिक विभागातील पात्रता फेरी गुरुवारपासून सुरू होणार आहे.

भारतीय तिरंदाजी संघात तरुणदीप राय व दीपिकाकुमारी हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. दोघांचेही हे चौथे ऑलिंपिक आहे. भारताच्या पुरुष संघामध्ये तरुणदीपसह महाराष्ट्राचा प्रवीण जाधव व युवा खेळाडू धीरज बोम्मादेवरा याचा समावेश आहे. प्रवीण याच्याकडे टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. धीरज याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. एवढेच नव्हे तर अंतल्या येथे झालेल्या विश्‍वकरंडकात त्याने टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या इटलीच्या मॉरो नेसपोलीला पराभूत ब्राँझपदक पटकावले आहे. दीपिकाकुमारी ही भारताची सर्वात अनुभवी महिला तिरंदाज. आई बनल्यानंतर तिने १६ महिन्यांच्या कालावधीत शांघाय येथे झालेल्या विश्‍वकरंडकात (स्टेज वन) रौप्यपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी केली.
 
बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कोरियन खेळाडूंचे आव्हान तिला यंदा परतवून लावावे लागणार आहे. महिला विभागात दीपिकासह अंकित भकत व भजन कौर या दोघींचाही समावेश आहे. दोघींनी मिळून आशियाई स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले होते. तसेच, विश्‍वकरंडकातही (स्टेज फोर) त्यांनी ब्राँझपदक जिंकण्याची किमया करून दाखवली होती.

उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडणार?
भारतीय तिरंदाजांना ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा अद्याप ओलांडता आलेला नाही. प्रत्येक ऑलिंपिकमध्ये हीच कथा पाहायला मिळते. २००० मधील सिडनी ऑलिंपिक याला अपवाद होता. कारण सिडनी ऑलिंपिकसाठी भारतीय तिरंदाज पात्रच ठरले नव्हते. मागील टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पुरुष तिरंदाजांनी सांघिक विभागात, तसेच मिश्र विभागात व दीपिकाकुमारीने वैयक्तिक विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती; पण त्यांना पुढे जाता आले नाही. यंदा पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र न ठरलेल्या देशांच्या यादीत पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांत भारताने क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला व पॅरिसचे तिकीट निश्चित केले.

पात्रता फेरी कशी असणार?
गुरुवारपासून सुरू होणारी पात्रता फेरी भारतीय तिरंदाजांसाठी महत्त्वाची असणार आहे. अव्वल दहा क्रमवारीत स्थान मिळाल्यास भारतीयांना पुढल्या फेरीत तुलनेने कमकुवत आव्हान असणार आहे. यामध्ये ५३ देशांतील १२८ तिरंदाज सहभागी होणार असून प्रत्येक खेळाडू टार्गेटच्या दिशेने ७२ बाण सोडतील. या फेरीत दमदार कामगिरी केल्यास पुढला प्रवास थोडासा सोपा होईल.

पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज
पुरुष - धीरज बी., प्रवीण जाधव, तरुणदीप राय
महिला - दीपिकाकुमारी, भजन कौर, अंकिता भकत

क्रीडा महोत्सवाआधी विवाद
पॅरिस ऑलिंपिक सुरू होण्याआधी भारतीय तिरंदाजी संघाला धक्का बसला. कोरियन प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे भारतात परतावे लागले आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेनेच आपली अधिस्वीकृती नाकारल्याची टीका बेक यांनी या वेळी केली.

एवढेच नव्हे तर उच्चस्तरीय प्रदर्शनीय संचालक संजीव सिंग यांनाही सहायक स्टाफमध्ये स्थान मिळाले नाही. यानंतर कॅनडाच्या खेळाडूशी अयोग्यप्रकारे सामोरे गेल्याचा आरोप असलेले अरविंद यादव यांची भारतीय तिरंदाजी संघाचे फिजियो म्हणून निवड करण्यात आली आहे.

जी व्यक्ती विवादात अडकली आहे, त्या व्यक्तीची निवड केल्यामुळे आता चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. बेक यांच्या अनुपस्थितीत सोनम भुतिया (आर्मी), पूर्णिमा महतो (टाटा) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय तिरंदाजांना ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. कोरियन प्रशिक्षक सोबत नसल्यामुळे भारतीय तिरंदाज बलाढ्य कोरियन खेळाडूंचे आव्हान कसे परतवून लावताहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter