राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ प्रदान

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 5 h ago
मनू भाकर, डी. गुकेश आणि सुरेश कुसळे
मनू भाकर, डी. गुकेश आणि सुरेश कुसळे

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन व द्रोणाचार्यसह इतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २०२४मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंना यावेळी गौरवण्यात आले. काल (शुक्रवार १७ जानेवारी) राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय खेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विश्‍वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश, पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर यांच्यासह अनेक खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. 

राष्ट्रपती मुर्मु यांनी या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यश आणि प्रगतीमध्ये खेळाडूंचे मोठे योगदान असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. तसेच खेळाडूंना त्यांच्या पुढील कामगिरीसाठी प्रोत्साहन दिले. 

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २०२४मध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाची मान उंचवणाऱ्या काही खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत दोन पदक जिंकणारी मनु भाकर,  विश्‍वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश, भारतीय हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

मनू भाकरने पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत दोन पदक जिंकली आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वच स्तरावरून कौतुक झाले होते.

हरमनप्रीत सिंगने भारतीय हॉकी संघाला सलग दुसरे कांस्य पदक मिळवून दिले आहे. तर १८ वर्षीय गुकेश हा सर्वात कमी वयाचा विश्‍वविजेता ठरला. त्याने गेल्या वर्षी बुद्धिबळ ओलंपियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्ण जिंकण्यात मदत केली.
 
हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील खेळाडूला गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या शानदार आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.

द्रोणाचार्य पुरस्कार
पॅरा नेमबाजी या क्रीडा क्षेत्रातील कोच सुभाष राणा, नेमबाजी कोच दीपाली देशपांडे, हॉकी कोच संदीप सांगवान, बॅडमिंटन कोच एस. मुरलीधरन आणि फुटबॉल कोच अरमान्‍डो एग्‍नेलो कोलाको यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अर्जुन पुरस्काराने सन्मानित 32 खेळाडू
ज्योती यराजी (ॲथलेटिक्स), अन्नू रानी (ॲथलेटिक्स), नीतू घंघास (बॉक्सिंग), स्वीटी बोरा (बॉक्सिंग), वंतिका अगरवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जरमनप्रीत सिंग (हॉकी), सुखजीत सिंग (हॉकी), राकेशकुमार (पॅरा तिरंदाजी), प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स), जीवानजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स), अजीत सिंग (पॅरा ॲथलेटिक्स), सचिन खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स), धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स), प्रणव सूरमा (पॅरा ॲथलेटिक्स), होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स), सिमरन शर्मा (पॅरा ॲथलेटिक्स), नवदीप सिंग (पॅरा ॲथलेटिक्स), नितेशकुमार (पॅरा बॅडमिंटन), थुलासिमती मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन), नित्या श्री सिवन (पॅरा बॅडमिंटन), मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन), कपिल परमार (पॅरा ज्युडो), मोना अगरवाल (पॅरा नेमबाजी), रुबीना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी), स्वप्नील कुसाळे (नेमबाजी), सरबज्योत सिंग (नेमबाजी), अभय सिंग (स्क्वॉश), साजन प्रकाश (जलतरण), अमन सेहरावत (कुस्ती) या ३२ खेळाडूंना २०२४च्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter