भारत-अ विरूद्धच्या पहिल्या डावात भारत-ब संघाची अवस्था ७ बाद ९७ धावा अशी असताना असताना मुंबईच्या मुशीर खानने २२७ चेंडूंमध्ये १०५ धावांची नाबाद खेळी केली आणि भारत ब संघाला पहिल्या दिवसअखेर २०२ धावांवर पोहोचवली.
कर्णधार अभिमन्यू इस्वरनला या सामन्यात फारशी चांगली करता आलेली नाही. सलामीवीर यशस्वी जैसवाला ५९ चेंडूंमध्ये ३० धावा करून माघारी परतला. मुशीरच्या शतकानंतर त्याचा भाऊ सर्फराज खानने स्टँडमध्ये उभे राहून भावनिक सेलिब्रेशन केले आहे. त्या दोघांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ BCCI ने पोस्ट केला आहे.
सर्फराज आणि मुशीरने आपला देशांतर्गत क्रिकेटमधील प्रवास सोबत केला असून सर्फराजने मुशीरचा खेळ जवळून पाहिला आहे. त्यामुळे भावाच्या शतकानंतर त्याचे भावनिक सेलिब्रेशन सहाजिक आहे.
मुशीर खानला आजच्या डावात नवदीप सैनीची साथ मिळत असून सैनी ७४ चेंडुंमध्ये २९ धावांवर खेळत आहे.त्यामुळे उद्या या दोघांची जोडी भारत-ब संघासाठी किती धावसंख्या उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील मुशीरची कारकीर्द
१९ वर्षीय मुशीर खानने डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईसाठी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत त्याने शतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याने या शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले आणि नाबाद २०३ धावा पूर्ण केल्या.
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध त्याने आणखी एक शतक झळकावले, त्यावेळी त्याने १३६ धावा केल्या. आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत, मुशीरने ७ सामने आणि ११ डावांमध्ये एकूण ६२७ धावा केल्या आहेत.