भारताचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाकडून पुनरागमन करणार कधी हा प्रश्न जवळपास गेल्या वर्षभरापासून विचारला जात आहे. शमीने भारतासाठी अखेरचे क्रिकेट नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळले आहे.
म्हणजे संपूर्ण २०२४ वर्ष शमी भारतीय संघातून बाहेर होता. पण आता १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत तरी शमी दिसणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, शमीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओने भारतीय संघासह चाहत्यांनाही दिलासा दिला आहे.
शमीने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आबे. तो पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'अचूकता, वेग आणि जिद्द, जगावर राज्य गाजवण्यासाठी सज्ज!'
त्याचा हा व्हिडिओ आणि कॅप्शन पाहाता आता तो भारतीय संघाकडून पुन्हा खेळण्यास सज्ज असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता २२ जानेवारीपासून भारताला इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे मालिकाही खेळायची आहे. त्यामुळे जर शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवायचे असेल, तर बीसीसीआय निवड समिती त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठीही भारतीय संघात स्थान देऊ शकतात. जेणेकरून मोठ्या स्पर्धेपूर्वी त्याला लय मिळवण्यास मदत मिळेल.
शमीच्या टाचेवर गेल्यावर्षाच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून तो पूर्ण पणे बरा झाला होता. त्याने नोव्हेंबरमध्ये रणजी ट्रॉफीतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध सामना खेळताना ४३ षटके गोलंदाजी केली होती. त्यानंतर तो सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतही ९ सामने खेळला.
मात्र बऱ्याच दिवसांनी इतकी गोलंदाजी केल्यानंतर त्याच्या गुडघ्याला सुज आल्याचे बीसीसीसीआये काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. याचमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही बोलवण्यात आले नव्हते. त्याला गुडघ्याच्या दुखापतीतून तंदुरुस्त होण्यासाठी काही काळ जाईल, असे बीसीसीआयने सांगितले होते.
पण आता तो तंदुरुस्त झाल्याचे दिसत आहे. त्याने नुकतेच विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेतही आत्तापर्यंत दोन सामने खेळलेत, ज्यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता तो जर पूर्ण तंदुरुस्त असेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचा अहवाल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने दिला, तर त्याची निवड भारतीय संघात होऊ शकते.
शमीचे पुनरागमन भारतीय संघाला यासाठीही दिलासादायक आहे की सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरीस बुमराहला पाठीची दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेलं नाही.
परंतु, तो आत्ता दुखापतीतून सावरत असताना शमी जर भारतीय संघाकडून खेळणार असेल, तर भारतासाठी ती आनंदाची बातमी असेल. सुदैवाने जर बुमराहचीही दुखापत गंभीर नसली आणि तो २-३ आठवड्यात तंदुरुस्त होणार असेल, तर बुमराह आणि शमी एकत्र चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसू शकतात.