'या' स्पर्धेतून मोहम्मद शमी करणार पुनरागमन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 Months ago
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी

 

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २०२३ वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळतानाच दिसलेला नाही. या वर्ल्ड कपमध्ये त्याने सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याच्या टाचेच्या दुखापतीने डोकं वर काढलं. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर गेला.

या दुखापतीमुळे त्याला या वर्षाच्या सुरुवातीला शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली, ज्यामुळे त्याला आयपीएल २०२४ आणि टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धाही खेळता आली नाही. पण आता तो दुखापतीतून सावरला असून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असं असतानाच आता तो क्रिकेट न खेळून जवळपास वर्ष होत आल्याने तो पुनरागमन कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तो १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल अशी चर्चा होती. पण आता असे समजत आहे की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये सामना खेळले. याशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

जय शाह यांनी एका मुलाखतीत बोलताना आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ तयार आहे, असं सांगितलं. ते म्हणाले, 'आमचा संघ आधीपासूनच पूर्ण तयार आहे. आम्ही जसप्रीत बुमराहला काही वेळासाठी विश्रांती दिली आहे. मोहम्मद शमीही तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. आता ही एक अनुभवी खेळाडू आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू फिट आहेत.'

जय शाह यांनी असंही सांगितलं की शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल कारण तो अनुभवी असून त्याची भारताला गरज भासणार आहे.

पीटीआयने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार शमी ऑक्टोबरमध्ये रणजी ट्रॉफी खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर तो १९ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करू शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनापूर्वी तो रणजी खेळून मॅच प्रॅक्टिस मिळवू शकतो. त्यामुळे रणजी ट्रॉफीमधील एक किंवा दोन सामने खेळून तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळू शकतो. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जाऊ शकतो.