भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप गाजवला. आता त्याला याचं मोठं फळ मिळण्याची शक्यता आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने मोहम्मद शमीला 2023 चा अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी विशेष शिफारस केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने मोहम्मद शमीचे अर्जुन पुरस्कारांच्या यादीत नाव समाविष्ट करावे यासाठी खास विनंती केली आहे. मूळ यादीत मोहम्मद शमीचे नाव नव्हते. मात्र वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शमीसाठी बीसीसीआयने आता खास विनंती केली आहे.
मोहम्मद शमी हा वर्ल्डकपमधील पहिले चार सामने बेंचवर होता. मात्र त्याला संधी मिळताच त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. तो बघता बघता वर्ल्डकप 2023 मधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने फक्त 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद शमीची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहून बीसीसीआयने त्याची अर्जुन पुरस्कार 2023 साठी खास शिफारस केली आहे. आता केंद्र सरकारची समिती यावर काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी
मोहम्मद शमीने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 64 कसोटी 101 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 229 विकेट्स, वनडेत 195 तर टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या साखळी फेरीतील सामन्या त्याने 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल गाठली.
काय आहे अर्जुन पुरस्कार
अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारकडून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्कारांची सुरवात 1961 मध्ये करण्यात आली. पंधरा लाख रुपये, अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांत जागतिक स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्त दाखवणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.