भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर गेले आहे. कर्नाटक व मध्य प्रदेश या दोन संघांविरुद्धच्या रणजी करंडकातील लढतींसाठी बंगालच्या संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये मोहम्मद शमीला निवडण्यात आलेले नाही.
बंगालचा संघ येत्या बुधवारपासून सुरू होत असलेल्या रणजी करंडकातील लढतीत कर्नाटकशी लढणार आहे. त्यानंतर १३ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या लढतीत बंगालच्या संघासमोर मध्य प्रदेशचे आव्हान असेल. मोहम्मद शमी याच्यासह अभिमन्यू ईस्वरन, अभिषेक पोरेल, मुकेशकुमार, आकाश दीप यांचीही बंगालच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. काही खेळाडू भारत अ संघामधून ऑस्ट्रेलियात मालिका खेळत आहेत.
दरम्यान, मोहम्मद शमी याने नेटमध्ये सराव सुरू केला. तंदुरुस्त असल्याचेही त्याच्याकडून सांगण्यात आले, मात्र पुरेशी तंदुरुस्ती राखण्यात शमी अपयशी ठरला आहे असं सांगत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.
साहाची निवृत्तीची घोषणा
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. ४० वर्षीय बंगालचा हा पठ्या यंदाचा रणजी मोसम संपल्यानंतर निवृत्त होणार आहे. रिद्धिमान साहा याने भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तीन शतके व सहा अर्धशतकांसह १३५३ धावा केल्या असून ९२ झेल व १२ यष्टिचीत करण्यातही त्याला यश मिळाले आहे.